कोरोनाचे राज्यात पुन्हा शतक पार

>> नवे ११२ रुग्ण; ९ वा बळी

राज्यात नवव्या कोरोना बळीची काल नोंद झाली असून नवीन ११२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मडकई, चिंबल, वास्को, मांगूर, शिरोडा, मडगाव, लोटली, मंडूर, कुंकळ्ळी, नेरूल, उसगाव आदी भागात नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ८६९ झाली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह ६६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २१५१ झाली असून १२७३ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल एका रुग्णाचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनामुळे बळींची संख्या ९ झाली आहे.

मडकईत नवीन ३ रुग्ण
राज्यात नवनवीन विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. फोंडा तालुक्यातील मडकईमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

इंदिरानगर, चिंबलात
नवीन ११ रुग्ण
इंदिरानगर चिंबल येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. चिंबलमध्ये नवीन ६ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ६० झाली आहे.

शिरोडा, उसगावात नवीन रुग्ण
शिरोडा येथे नवीन ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १३ झाली आहे. उसगाव येथे नवीन २ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ८ झाली आहे.

मंडूर, पिलार येथे नवीन रुग्ण
पिलार येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ४ झाली आहे. मंडूर येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या १६ झाली आहे.

नेरूल, खोर्लीत नवीन रुग्ण
नेरूल येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३ झाली आहे. खोर्ली म्हापसा येथील रुग्णसंख्या ३ झाली आहे.
मांगूर हिलमध्ये नवीन २ रुग्ण आढळून आले आहेत. तर, मांगूर हिल लिंकमध्ये नवीन १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सडा वास्को येथे नवीन ६ रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या ८४ झाली आहे.

बायणा येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ८७ झाली आहे. नवे वाडे वास्को येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ७३ झाली आहे. जुवारीनगर वास्को येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १११ झाली आहे. खारीवाडा येथे नवीन १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या ४३ झाली आहे.

उत्तर गोवा सत्र व जिल्हा न्यायालयाच्या नोंदणी विभागातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सदर महिला गेल्या शनिवारी कामाला आली होती. यामुळे न्यायालयाचे कामकाज स्थगित ठेवण्यात आले असून महत्त्वाची प्रकरणे जलद न्यायालयाकडे पाठविली आहेत.

कोरोनाचे १८ दिवसांत ९ बळी
राज्यात मागील १८ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. २२ जून रोजी कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली. मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षीय वृद्धाचे कोरोना विषाणूने निधन झाले. राज्यातील कोरोना बळी गेलेल्यामध्ये माजी मंत्री, मुरगावच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

कोरोनामुळे वास्कोत चौथा बळी
राज्यात कोविड -१९ महामारीने वास्कोत चौथा बळी घेतला. तर गोव्यात एकूण नऊ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. वास्को नवेवाडे येथील युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तो युवक कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे याची चौकशी सुरू झाली आहे. बुधवार दि. ९ रोजी मध्यरात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नवेवाडे येथील युवकाचा ताप आल्याने मृत्यू झाला. नंतर काही वेळातच त्याचा अहवाल आला असता तो कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले. नवेवाडे येथील युवक वास्को एफ. एल. गोम्स रस्त्याच्या बाजूस एका इमारतीत राहत होता. तो दाबोळी विमानतळावर टॅक्सीचा व्यवसाय करीत होता.