कोरोनाची भीती मनातून काढून टाका ः डॉ. गोम्स

  • मुलाखत श्री. श्याम गावकर

‘कोरोना’च्या वाढत्या प्रसारानिशी जनमानस धास्तावले आहे. परंतु व्यक्तिगत खबरदारी घेऊन कोरोनाचा संसर्ग बर्‍याच अंशी रोखता येऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. गोव्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील एक अग्रणी डॉ. एडविन गोम्स यांची ही विशेष मुलाखत…

प्रश्‍न १ ः कोविड-१९ संसर्गाची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. ही भीती नाहीशी होण्यासाठी डॉक्टर काय करावं?
उत्तर ः कोविड-१९ संबंधी सध्या भीतिचे वातावरण सर्वत्र दिसून येते. सर्वसामान्य लोक का घाबरलेत, तर हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने एकाकडून दुसर्‍याला लागण होते. हा संसर्गात्मक फैलाव रोखण्यासाठी तीन गोष्टींना प्रत्येकाने महत्त्व देण्याची गरज आहे. पहिली गोष्ट- आपले हात प्रत्येकाने सकाळी, दुपारी व रात्रीच्या वेळी साबणाने चांगल्या प्रकारे धुतले पाहिजेत. दुसरी गोष्ट- मध्यंतरी समजा माणूस घराबाहेर पडला, त्याने बाहेर एखाद्या वस्तूला हात लावला तर लगेच सॅनिटायझर हाताला लावणे उपयुक्त ठरते. बाजारात मिळणार्‍या सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने करण्याची गरज आहे.
तिसरी गोष्ट- सोशल डिस्टंसिंग. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे घराबाहेर प्रत्येकाने दोन व्यक्तींमध्ये अंतर राखण्याची गरज आहे. बाहेर गर्दीमध्ये न जाता घरीच राहण्याला पसंती द्यावी. आवश्यकता भासल्यासच घरातून बाहेर पडावे.

प्रश्‍न २ ः एखाद्या माणसाच्या मनात कोविड-१९च्या भीतिमुळे स्वतःला लागण झाल्याचे दिसल्यास त्याने काय करावे?
उत्तर ः गोव्यात पावसाला धडाक्यात सुरुवात झालेली आहे. गोमंतकातील पाऊस म्हटला की थंडी ही आलीच. अशावेळी लोकांनी घाबरू नये. गोव्यात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांवर व्यवस्थितपणे उपचार सुरू आहेत. जमेची बाब म्हणजे गोव्यात या महामारीने एकही रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही. पावसाळ्यात थंडी-ज्वर येण्याचे प्रमाण अधिक असल्याने एखाद्या व्यक्तीस समजा थंडी झाली असेल, ज्वर आला असेल किंवा घसा दुखण्याचे प्रकार आढळून आल्यास त्यांनी लगेच सरकारी इस्पितळात जाऊन तपासणी करण्याची गरज आहे. त्याठिकाणी लागलीच कोविड-१९ची चाचणी करण्यात येईल व तीन ते चार तासांमध्ये तुमचा अहवाल तुम्हाला मिळेल. समजा तुम्ही पॉझिटिव्ह निघालात तर घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुमच्या रक्षणार्थ सदैव कोविड इस्पितळात कार्यरत आहोत. कुणालाही काहीही होणार नाही. फक्त लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. खास करून वयोवृद्ध लोकांनी, अशी लक्षणे दिसून आल्यास स्वतःचा तपास करून घेण्याची अत्यंत गरज आहे.

प्रश्‍न ३ ः कोविड-१९ हा संसर्गात्मक असल्याने एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश होतो हे सर्वज्ञात आहे. मात्र त्या तर्‍हांविषयी थोडे सांगा.
उत्तर ः आम्ही देवाचे विशेष आभार मानायला हवेत. कोविड-१९चा फैलाव आम्ही दक्ष राहिल्यास सहज रोखू शकतात. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण जेव्हा विनामास्क खोकला काढतो, त्यावेळी त्याच्या तोंडाद्वारे पडलेली थुंकी एक हात पुढे जाऊन जमिनीवर पडते. जमिनीवर पडल्यानंतर ६ ते ८ तास ते किटाणू तिथेच असतात व नंतर मरून जातात. पण तेच किटाणू एखाद्या सरफेसवर पडले किंवा टाईल्सवर पडल्यास ते २४ तासांपर्यंत जिवंत राहतात. त्यामुळेच अशा किटाणूंना आळाबंद करण्यासाठी प्रत्येकाने आपला चेहरा मास्कने झाकण्याची अधिक आवश्यकता आहे.

प्रश्‍न ४ ः कोविड-१९ इतरांना कशाप्रकारे त्रासदायक ठरते?
उत्तर ः कोविड-१९ हा संसर्गात्मक रोग असल्याने प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. हा संसर्ग आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असून थंडी, खोकल्यापासून दूर राहण्याची गरज आहे.

प्रश्‍न ५ ः कोविड इस्पितळात आपण अत्यंत चांगल्या प्रकारे रुग्णांची देखभाल करता. त्यांच्यावर उपचार झाल्यावर त्यांचा अहवाल ज्यावेळी निगेटिव्ह येतो त्यावेळी अशा रुग्णांना कोविड- इस्पितळातून घरी पाठविले जाते. मात्र अशा व्यक्तींना म्हणा अथवा सोसायटीमध्ये वेगळ्या नजरेने पाहिले जाते, असं का?
उत्तर ः खरं म्हणजे, कोविड इस्पितळातून बरे होऊन बाहेर जाणार्‍या व्यक्ती या खर्‍या अर्थाने डायमंड असतात. त्यांना संशयाच्या नजरेने पाहू नका. इस्पितळातून बाहेर पडणार्‍या व्यक्ती या सर्वसामान्य व्यक्तींएवढ्याच निरोगी असतात. त्यांना आधार देण्याची गरज आहे.
खरं तर, एक डॉक्टर या नात्याने मी सरकारचे विशेष आभार व्यक्त करतो कारण सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचारांसंबंधी शिकण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांना वेळ मिळाला. या काळात सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांनी विशेष मेहनत घेऊन, उपचारासंबंधी अभ्यास करून योग्य तोडगा काढण्यास मदत झाली. त्यासाठी गोवा सरकार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री श्री. विश्‍वजीत राणे, आरोग्य सचीव व सचिवालयातील सर्व अधिकारी आरोग्य संचालनालय व पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रश्‍न ६ ः वैद्यकीय दृष्टीकोनातून लॉकडाऊन काळ कसा फायदेशीर ठरला?
उत्तर ः खरं म्हणजे, लॉकडाऊन हा प्रकार म्हणजे सरकारची ब्रिलियंट आयडिया. त्याचा खूपच फायदा झाला. या काळात – रुग्णांची विभागणी करून तपासणी करण्याला वाव मिळाला. उदा. थंडी आणि खोकला असणार्‍या रुग्णांवर कोणते उपचार करावेत? कोविड पॉझिटिव्ह प्रभागातून आलेल्या रुग्णांना कशा प्रकारे हाताळावे? लक्षणे असलेल्या रुग्णांना कोणती औषधे द्यावीत? लक्षणे नसलेल्या रुग्णांवर कोणता इलाज करता येईल.. हे ठरविण्यासाठी लॉकडाऊनचा काळ फारच फायदेशीर ठरला. इतर सहकार्‍यांसोबत चर्चा करून तपासणी करण्याची दिशा ठरविण्यासाठी हा लॉकडाऊनचा काळ फारच उपयुक्त ठरला. मात्र एका गोष्टीचा खास उल्लेख मला करावा लागतो तो म्हणजे इन्फॉर्मेशन एपिडेमिक, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सोशल प्लॅटफॉर्मवरून अनेक चुकीचे संदेश फॉर्वर्ड केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यासाठी व्हॉट्‌सऍप व इतर माध्यमांचा वापर हा सकारात्मक स्वरूपात झाल्यास फायदेशीर ठरेल. चुकीचे संदेश डोळे बंद करून फॉर्वर्ड करण्याचे प्रकार भयावह आहेत.
दुसर्‍या एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख मला करावा लागतो आहे तो म्हणजे सायटोकाईन स्टॉर्म (उूींेज्ञळपश डींेीा). रुग्ण सायटोकाईन स्टॉर्ममुळे सिरीयस होतो. सायटोकाईन स्टॉर्म म्हणजे श्‍वास घेण्यात अडथळा निर्माण होणे (डहेीींपशीी ेष लीशरींहळपस). त्याची लक्षणे कोणती हे समजून घेण्यात लॉकडाऊनच्या काळाचा फायदा झाला. त्यावर कशा प्रकारे उपचार करता येईल यावर निर्णय घेण्यास वेळ मिळाला. रुग्णांवर अचूकपणे इलाज करण्यासाठी लॉकडाऊन काळाचा खूपच फायदा झाला.

प्रश्‍न ७ ः कोविड रुग्ण जे इस्पितळातून उपचार घेऊन बाहेर जातात, त्यांच्या आरोग्याविषयी थोडे सांगा.
उत्तर ः त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असते व त्यांनी कोविड इस्पितळात इतर रुग्णांच्या सेवेसाठी काम करण्याची तयारीही दर्शविलेली आहे.

प्रश्‍न ८ ः कोविड संदर्भात सध्या सगळीकडे वेगवेगळे विचारप्रवाह सुरू आहेत. त्यासंबंधी तुमचे मत?
उत्तर ः विचार करून डोक्याला अधिक त्रास देण्याची आवश्यकता नाही. हा संसर्ग थोडा जलद गतीने पसरतो त्यासाठी सरकारच्या गृहखात्याने घालून दिलेल्या आदेशांचे संतोतंत पालन करण्याची गरज आहे. सोशल डिस्टंसिंग सांभाळून एकमेकांशी बोलण्यात काही वाईट नाही. प्रत्येकाने शेजारधर्म पाळताना आपापल्या शेजार्‍यांची काळजी घेणे गरजेचे आहे व थोडा वेळ देवासाठी देण्याची गरज आहे. व तुमच्या आवतीभवती असणार्‍या ६५ वर्षांवरील वयोवृद्धांचा सांभाळ करा.

प्रश्‍न ९ ः डॉक्टर, याक्षणी आपण महान कार्य करत आहात. सरतेशेवटी गोमंतकीयांसाठी तुमचा संदेश काय?
उत्तर ः इन्फो-एपिडेमिकपासून चार हात दूर रहा. प्रत्येकाने प्रत्येक माणसाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे व डॉक्टर्सनी रुग्णांची व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज आहे. कोविड संसर्गाची भीती मनातून काढून टाका व सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.