कोणत्याही चौकशीस तयार : सुदिन ढवळीकर

सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून कार्य करताना कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत करण्यात आलेल्या कुठल्याही कामाच्या चौकशीला तयार आहे. चौकशीची ङ्गाईल सभागृहाच्या पटलावर ठेवावी. मात्र, जनतेला चुकीची माहिती दिली जाऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनुदानित मागण्यावरील चर्चेत बोलताना काल केले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्तीबाबत स्पष्टीकरण करावे. एजन्सीची नियुक्ती केल्यास स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होऊ शकतो, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील लोकांना सांगे येथून पाण्याचा पुरवठा केला जातो. तथापि, सांगे भागात पाण्याची समस्या आहे. सांगे भागातील लोकांची समस्या जाणून घेऊन नेत्रावळी, उगे – सांगे भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी योजना तयार आहेत. त्यांना गती द्यावी, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.