ब्रेकिंग न्यूज़

कॉंग्रेससमोर पर्याय मर्यादितच

  • ल. त्र्यं. जोशी

आज कॉंग्रेस पक्षात सुरु असलेल्या हालचाली कुणाला नाटक वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल पण कसाही विचार केला तरी ‘कॉंग्रेससमोर आज अतिशय मर्यादित पर्याय आहेत’ या निष्कर्षाप्रतच यावे लागणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड पराभवानंतर आज कॉंग्रेस पक्षात सुरु असलेल्या हालचाली कुणाला नाटक वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल, पण कसाही विचार केला तरी ‘कॉंग्रेससमोर आज अतिशय मर्यादित पर्याय आहेत’ या निष्कर्षाप्रतच यावे लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या निवडणुकीत मोदींचा एवढा नेत्रदीपक विजय होईल हे कुणालाच वाटत नव्हते. अगदी मोदीसमर्थकांनाही नाही. पहिल्या दोन फेर्‍यांनंतर तर त्यांना पराभवाची धास्तीसुध्दा वाटत होती. कुणी पहिल्या दोन वा तीन फेर्‍यांमधील भाजपाच्या यशाचे प्रमाण व उर्वरित फेर्‍यांमधील यशाचे प्रमाण याचा तुलनात्मक अभ्यास केला तर तथ्य दृष्टीस पडू शकेल, पहिल्या दोन फेर्‍यांमधील वस्तुस्थिती कॉंग्रेसच्या आशा पल्लवित करणारी कशी होती, हे सूचित करण्यासाठीच मला हे अधोरेखित करायचे आहे.

तिसर्‍या फेरीपासून वातावरण बदलले. त्याचा प्रत्यय मोदींना आला व तेव्हापासून त्यांनी जे आक्रमण सुरु केले ते शेवटपर्यंत कायम ठेवण्यात यश मिळविले, म्हणून हा निकाल आला. त्यात मोदींच्या परिश्रमांचे जेवढे योगदान आहे, तेवढेच कॉंग्रेसच्या मूर्खपणाचेही योगदान आहे. ते कसे हे मी गेल्या आठवड्यात सांगितले आहे. तरीही जनमत चाचण्यांचे येणारे परिणाम मोदींना एवढ्या प्रचंड प्रमाणात विजय मिळेल हे दाखवत नव्हते. दरम्यान माध्यमांची भूमिकाही मोदीविरोधाकडेच कलत होती. ती मोदींना प्रसिध्दी देत होती, पण त्यांच्या विरोधात वातावरण कायम राहील याची काळजीही घेत होती. त्यामुळे राहुल गांधींचा आत्मविश्वास वाढत होता व हे सगळे आपल्या ‘चौकीदार’ मोहिमेचे यश आहे असे समजून तो मुद्दा ते तारसप्तकात वाजवत होते.कॉंग्रेसचे प्रवक्ते तर मोदी आणि भाजपाला खाऊ की गिळू करीत होते. सगळे वातावरण चुरशीच्या लढतींचेच होते.

गेल्या निवडणुकीत भाजपाला उत्तर व पश्चिम भारतात कमालीचे यश मिळाल्याने व त्याच पट्‌ट्यात विरोधी ऐक्याचा निर्देशांक वाढलेला दिसल्याने तेथे भाजपाची पिछेहाट होईल आणि कॉंग्रेस वा तिसरी आघाडी बाजी मारुन जाईल असे चित्र निर्माण करण्यात माध्यमे यशस्वी झाली होती. सपा – बसपा यांनी गोरखपूर व अलाहाबाद पोटनिवडणुकीत मिळविलेल्या यशाने भाजपाला उत्तरप्रदेशात तीसच्या वर जागा द्यायला कुणीही तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर जेव्हा त्या मंडळींचा एवढा प्रचंड पराभव झाला, त्यामुळे वैफल्य येणे स्वाभाविकच होते.

विशेषत: मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर व एबीपी नेल्सनसारख्या संस्थांनी भाजपा व विरोधक यांच्यात ‘नेक टू नेक’ संघर्ष झाला असल्याचा संकेत दिल्यानंतर विरोधकांना चेव आला नसता तर ते नवल ठरले असते. त्यामुळे ते एवढे आक्रमक बनले होते व त्यासाठी त्यांनी निर्वाचन आयोगाला असे लक्ष्य केले होते की, ते मतमोजणी तरी शांततापूर्ण वातावरणात होऊ देतील की, नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यातच बिहारमधील उपेन्द्र कुशवाह नावाच्या नेत्याने रक्तपाताची भाषा वापरल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

खरे तर मतमोजणीच्या वेळी अपेक्षेप्रमाणे ‘नेक टू नेक’ लढती झाल्या असत्या तर तसेही घडणे अशक्य नव्हते, पण भाजपाचाच विजय होणार हे मतमोजणीच्या पहिल्या तीन टप्प्यांतच स्पष्ट झाल्याने विरोधकांनी काढता पाय घेतला व पुढील प्रकार टळला. अर्थात उपेंद्र कुशवाह यांच्या भूमिकेचा कॉंग्रेस पक्षाने तात्काळ जाहीर इन्कार केल्याने शांततापूर्ण मतमोजणीचे श्रेय त्या पक्षाकडेही जाते हे नाकारता येणार नाही. पण त्यामुळे विराधकांच्या दृष्टीने मोदींचा एवढा प्रचंड विजय त्यांच्यासाठी अनपेक्षित होता या वस्तुस्थितीत फरक पडत नाही. त्यावरून विरोधकांमध्ये किती प्रचंड प्रमाणात वैफल्य आले असेल याची कल्पना आपण करु शकतो व त्याच अंगाने कॉंग्रेसमधील घडामोडींचे आकलनही होऊ शकते.

खरे तर कॉंग्रेसची आजची अवस्था ‘समोर अंधारच अंधार पसरला आहे’ अशी झाली आहे. त्यांना या पराभवाचे नीट आकलनही होऊ शकत नाही आणि खुल्या मनाने मोदींना त्यांच्या यशाचे श्रेय देण्याची दानतही त्यांच्याजवळ नाही. औपचारिकता म्हणून त्यांनी पराभव स्वीकारला असेलही पण जेव्हा ते कालांतराने पुन्हा तलवारी उपसून बाहेर पडतील तेव्हा मोदींचा विजय किती बोगस होता, कपटमार्गाने मिळविला होता, त्यात इव्हीएमचे किती योगदान होते, हे रसभरीत वर्णन करुन सांगायला विसरणार नाहीत.

त्यांचे दुर्दैव असे आहे की, आज ते तेही सांगू शकत नाहीत. अक्षरश: किंकर्तव्यमूढ अशी त्यांची अवस्था झाली आहे. कॉंग्रेसला सतरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १८० जागांवर खातेही उघडता येणार नाही याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. त्यामुळे निकाल जाहीर होताच राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटला असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. आम्ही पराभवाची चिकित्सा करीत आहोत, त्याची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहोत एवढे दाखविणे फक्त त्यांच्या हातात होते व ते तेच करीत आहेत. कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक, राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनामा, त्यांची परोपरीने विनवणी, त्यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदभार वाहण्यास दिलेली मान्यता ह्या सगळ्या औपचारिकता पार पाडणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा पराभूत म्हणूनच त्यांना लोकांसमोर यावे लागेल, जे त्यांना परवडणार नाही.

खरे तर कॉंग्रेसच्या या पराभवासाठी केवळ आणि केवळ राहुल गांधीच जबाबदार आहेत. कारण त्यांनी स्वत:च प्रचारमोहिम स्वत:च्या नियंत्रणात ठेवून सामूहिक जबाबदारीला तिलांजली दिली होती. सगळे काही सुरजेवाला, दिव्या स्पंदना यांच्यासारख्या तरुणतुर्कांच्या हातात सोपविण्यात आले होते.

वास्तविक निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मोदीकेंद्रित होणार नाही, मोदी विरुध्द राहुल अशी तर होणारच नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. पण ती मोदीकेंद्रित करुन त्यांनी मोदींची इच्छाच पूर्ण केली. कारण राहुल गांधींना त्यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत कायम ठेवायचे होते. ते मोदींच्या पथ्यावर पडले आणि मग त्यांनी मागे पाहिलेच नाही. त्यातच सॅम पिट्रोडा, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या वावदुकांची भर पडली. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ‘आधीच मर्कट तया’सारखी परिस्थिती निर्माण झाली. हे सगळे राहुलमुळे घडले याबद्दल कुणाही कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या मनात शंका नाही. पण राहुलशिवाय पर्यायही दिसत नाही अशी त्यांची गोची झाली आहे.
मुळात विचार केला तर आज निर्माण झालेली परिस्थिती स्वस्थ लोकशाहीसाठी पोषक आहे असे म्हणता येणार नाही. कारण दमदार आणि जबाबदार विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाहीला अर्थच प्राप्त होऊ शकत नाही. पण तसा विरोधी पक्ष निर्माण करणे स्वत: विरोधी पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. विरोधी पक्ष जर आपण सत्तेवर बसण्यासाठीच जन्माला आलो आहोत असा दुराग्रह धरणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याशिवाय जनतेजवळ अन्य पर्याय राहत नसेल तर त्यातून आज जे घडले त्याशिवाय दुसरे काही घडूच शकत नाही. योगायोगाने वा विरोधी पक्षांच्या करणीने नेमके तेच या निवडणुकीत घडले आहे. एक तर ते पुरेशा जबाबदारीने वागले नाहीत. आपल्या संघटनात्मक व वैचारिक ऐक्याची ग्वाही जनतेला देऊ शकले नाहीत आणि प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे ही कोणत्याही सत्तारुढ पक्षाची जबाबदारी असू शकत नाही. त्यामुळे त्यांना या स्थितीतूनच पुढचा मार्ग काढावा लागणार आहे.

तसे पाहिले तर भाजपा, भाकपा आणि माकपा हे तीन पक्ष वगळले तर भारतात पक्ष म्हणावेत अशा राजकीय संघटनाच नाहीत. एकेकाळी कॉंग्रेसला तसे स्वरुप होते पण सत्ताप्राप्तीनंतर त्याने पक्ष म्हणून आपली रचनाच केली नाही. १९४७ पूर्वी ते स्वातंत्र्यप्राप्तीचे एक आंदोलन होते त्यानंतर ते सत्ताप्राप्तीचे आंदोलन बनले एवढाच काय तो फरक.कॉंग्रेसनेही पक्ष बनण्यासाठी विशेष कष्ट घेतले नाहीत. कदाचित त्यांना त्याची गरजही पडली नसेल. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाची पुण्याई संपेपर्यंत त्यांची चलती राहिली. पं. जवाहरलाल नेहरु, अल्प काळासाठी कां होईना लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्यांच्या हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या काळात राजीव गांधी यांच्यासारखे नेतृत्व मिळत गेले. नंतर ती स्वाभाविकपणे संपली. नरसिंहरावांनी काही प्रमाणात प्रयत्न करुन पाहिला पण त्यांना सोनियांनी कधीच साथ दिली नाही. त्या राहुलला पुढे आणण्याचा खटाटोपच तेवढा करीत राहिल्या. परिणामी आज कॉंग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर ते आहे पक्ष बनण्याचे. राहुल गांधी जेव्हा त्या आव्हानाचा विचार करतात तेव्हा ते गर्भगळीत होतात व राजीनाम्याशिवाय त्यांच्याजवळ अन्य पर्याय असत नाही.

कॉंग्रेससोडून अन्य पक्षांचा विचार केला तर त्या केवळ शीर्षस्थ नेत्यांच्या कौटुंबिक मालमत्ता बनल्या आहेत.त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची नामावली नजरेसमोर आणली तर अधिक बोलण्याची गरजच राहत नाही. राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास १९६७ पर्यंत आपल्याकडे जशी एकपक्षप्रधान राजकीय व्यवस्था होती तशी २०१४ नंतर पुन्हा निर्माण झाली आहे व २०१९ मध्ये तिलाच पुढची चाल मिळाली आहे. १९६७ ते १९९९ पर्यंतचा काळ हा संमिश्रतेच्या राजकारणाचा काळ होता. २००४ ते २०१३पर्यंत त्याला जीवदान मिळाले होते. तसे आजही राजकारण संमिश्रतेचेच आहे पण तरीही त्याचे एकपक्षप्रधान स्वरुप नाकारता येत नाही. २०१९ मध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसला नाही एकपक्षप्रधानतेकडे पण संमिश्रतेच्या राजकारणाकडे जाता आले असते पण त्याने ती संधीही गमावली आहे.

या प्रतिपादनावरुन विरोधी पक्षांसमोर व विशेषत: कॉंग्रेस पक्षासमोर केवढे प्रचंड आव्हान उभे आहे याची कल्पना येऊ शकते. त्यातही चुका करणारे नेतृत्व सत्तापक्षाकडे असते तर त्यांचे काम तुलनेने सोपे झाले असते पण त्यांच्या दुर्दैवा्रने सरकारचे नेतृत्व मोदींकडे आले. ते स्वत: चुका करीत नाहीत आणि कुणाच्या चुका सहनही करीत नाहीत. ‘मारता कम मगर घसीटता अधिक’ असा त्यांचा खाक्या आहे. शिवाय त्यांच्यासोबत तळागाळापर्यंत पोचलेले सुसंघटित असे मनुष्यबळ आहे. त्या स्थितीला जर आपल्याला कॉंग्रेस पक्षाला न्यायचे असेल तर काय करावे लागेल याचा विचारही राहुल गांधी करु शकत नाहीत. ती त्यांची क्षमताच नाही. ‘ये नेता नही बन सकता’ असे बैतूलचे माजी खासदार गुफराने आजम यांनी सोनियाजींना परोपरीने सांगून पाहिले. पण त्यांना बाहेरची वाट दाखविण्यात आली. आजही त्यापेक्षा वेगळे घडू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देणे व केव्हा तरी परत घेणे एवढाच पर्याय त्यांच्यासाठी उरतो.

अर्थात ही स्थिती दीर्घकाळ राहू शकत नाही. ती तशी राहिली तर कॉंग्रेस पक्षच संपून जाईल. त्याच्यासाठी परिस्थिती किती गंभीर आहे एवढेच सूचित करण्याचा हा प्रयत्न. निसर्गाचा नियमच असा आहे की, पोकळीला त्यात स्थान असू शकत नाही. तरत आणि तिरत राहणे एवढीच त्याची नियती आहे. ते करता करता बर्म्युडा ट्रँगलपर्यंत पोचलात तर सारेच संपले. ते कुणालाही नको आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, या गांभीर्याची कॉंग्रेसला जाणीव आहे काय व त्यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी आहे काय? राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या संदर्भात त्या पक्षात घडत असलेल्या घटना मात्र तसे सूचित करीत नाहीत. गांधी परिवाराशिवाय कॉंग्रेसला कुणीही तारु शकत नाही अशी भावनाच त्यातून प्रकट होते. पराभवानंतरच्या पहिल्याच कार्यकारिणी बैठकीत राजीनामा देताना व नवा नॉनगांधी अध्यक्ष निवडण्याचे आवाहन करतांना राहुल गांधी यांनी ‘व्हाय वुई’ असा प्रतिप्रश्न केल्याचे समोर आले आहे. त्यातून त्यांना हेच सूचित करायचे आहे की, ‘कॉंग्रेसला वाचविण्याचा ठेका काय गांधी परिवारानेच घेतला आहे? आम्ही मोदींचे तडाखे सहन करणार आणि तुम्ही राज्यांचे मुख्यमंत्री होऊन, मुलांना तिकिटे मिळवून त्यांच्या विजयासाठी धडपडणार आणि मजा मारणार? हे चालायचे नाही. पक्षाला नॉन गांधी नेता मिळाला पाहिजे’. दुदैव हे आहे की, त्यांचे ते आव्हान स्वीकारण्याची कुणाही कॉंग्रेसवाल्याची तयारी नाही. हिंमतही नाही. ते गांधी परिवाराचीच अजीजी करणार, राहुलला राजीनामा मागे घेण्यास बाध्य करणार, राहुललाही कॉंग्रेसाध्यक्षपदाचे कवच हवेहवेसेच वाटणार. पण तोपर्यंत ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे सर्वकाही करणे आवश्यक आहे आणि तेच हल्ली सुरु आहे.