कॉंग्रेसचे पाच आमदार फुटण्याच्या मार्गावर

>> विश्वजीत राणे यांचा गौप्यस्फोट

पणजी व वाळपई मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजप आरामात जिंकणार असून दोन्ही ठिकाणी किमान ८ ते १० हजार मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा करून कॉंग्रेस पक्षाचे पाच आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तथा वाळपईतील भाजपचे उमेदवार विश्‍वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेस पक्षाला पुढील १० वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.
वाळपई मतदारसंघात आपण ४५० कोटींची विकासकामे केलेली आहेत. वाळपई मतदारसंघाचा विकास झालेला नाही अशी ओरड करणार्‍यांनी पणजीत बसून आरोप करण्याऐवजी वाळपईत येऊन हा विकास पहावा आणि नंतरच बेताल वक्तव्ये करावी असा सल्ला आरोग्यमंत्री राणे यांनी दिला. वाळपई मतदारसंघात अद्ययावत इस्पितळ, बसस्थानक, मार्केट प्रकल्प, पालिका इमारत, सभागृह, जलशुद्धीकरण प्रकल्प आदींची उभारणी आपण केली. आणखी ६५ कोटी रु.ची कामे मंजूर झालेली आहेत. त्यात पंचायत इमारत, उसगाव येथे सुशोभीकरण, मार्केट प्रकल्प, दीड हजार लोकांची बसण्याची सोय होऊ शकेल एवढे सभागृह आदी विकास प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांबरोबरच आपण वाळपई मतदारसंघातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात नोकर्‍या व रोजगार मिळवून दिल्याचेही राणे म्हणाले.
मोदी व पर्रीकर सक्षम नेते
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सक्षम नेते असून विकास फक्त भाजपच करू शकतो, असेही राणे यांनी यावेळी नमूद केले. आमदारकीच्या १५ वर्षांच्या काळात रवी नाईक यांनी उसगावचा विकास केला नाही. उसगाव हे तेव्हा फोंडा मतदारसंघात होते, असे राणे म्हणाले. रवीनी फोड्याकडेच लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.