ब्रेकिंग न्यूज़

कॉंग्रेसची जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट ः पंतप्रधान

कॉंग्रेसकडून मांडल्या जाणार्‍या जीएसटीच्या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका निवडणूक प्रचार सभेवेळी खिल्ली उडवली. कॉंग्रेसची जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टुपिड थॉट’ अशा शब्दात मोदी यांनी कॉंग्रेसची संभावना केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विविध सभांमधून या विषयावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करीत असतानाच मोदी यांनी ही खिल्ली उडवली आहे.

कॉंग्रेसच्या संकल्पनेतील जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के कर आकारणी झाली असती. त्याचवेळी सिगारेट व मद्यावरही १८ टक्के एवढाच कर लागला असता. परिणामी सिगारेट व मद्य स्वस्त झाले असते. जीवनावश्यक वस्तू व मद्य यांना एकच कर लावणे हे तर्कदृष्ट्या योग्य आहे काय असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेस नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटले. त्यामुळे कॉंग्रेसने जीएसटीला विरोध करणे साहजिक आहे. मात्र एवढी वर्षे कॉंग्रेसने जनतेचा लुटलेला पैसा मला त्यांना परत मिळवून द्यायाचा आहे, असे मोदी म्हणाले.