ब्रेकिंग न्यूज़

केवलं इतिहासमूर्ती

  • जनार्दन वेर्लेकर

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ हे जरी खरे तरी त्यांच्या मायभूमीने आपल्या या सुपुत्राची मरणोत्तर का होईना दखल घ्यायला हवी असं तीव्रतेने वाटू लागलं. माझ्या घोर अज्ञानाचं प्रायश्‍चित्त घ्यायला हवं म्हणून सरांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली…

 

१९व्या शतकातला महाराष्ट्रातील प्रबोधनाचा कालखंड हा ज्यांचा ध्यासविषय ते प्रा. जे. व्ही. नाईक हे गोव्याचे सुपुत्र हे त्यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांमुळे मला पहिल्यांदाच कळले आणि एकाच वेळी माझ्या मनात त्यांच्याविषयी अभिमान दाटून आला. तसा त्यांच्याविषयी मी पूर्ण अनभिज्ञ होतो हे कळून मनोमन शरमिंदा झालो. ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ हे जरी खरे तरी त्यांच्या मायभूमीने आपल्या या सुपुत्राची मरणोत्तर का होईना दखल घ्यायला हवी असं तीव्रतेने वाटू लागलं. माझ्या घोर अज्ञानाचं प्रायश्‍चित्त घ्यायला हवं म्हणून सरांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली…

दक्षिण गोव्यात सांगे तालुक्यातील सावर्डे हे खेडेगाव. येथील आज आनंदवाडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात १४ मे १९३४ रोजी एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात नाईकसरांचा जन्म झाला. त्यांचे नाव जगन्नाथ विश्राम नाईक. कौटुंबिक शॉर्टफॉर्म- जग्गू. वडील किराणा मालाचे छोटे दुकानदार. काळ पोर्तुगीज राजवटीचा. दुष्काळ-टंचाईमुळे साखर, केरोसिन आदी जीवनावश्यक वस्तूंचं रेशनिंग असल्यामुळे फोंडा तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेल्या कापशे या ग्रामीण परिसरात हे दुकान थाटले होते. आईवडील, दोन भाऊ व पाच बहिणी असे सरांचे एकत्र कुटुंब. सरांचा मोठा भाऊ गणपत आधी शिक्षणासाठी मुंबईत गेलेला. सरांचं प्राथमिक शिक्षण मराठी चौथी इयत्तेपर्यंत गावातच झालं. मडगाव शहरात न्यू ईरा हायस्कूलमध्ये अकरावी अर्थात त्या काळची मॅट्रिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर एक वर्ष त्यांच्या शिक्षणात खंड पडला. आर्थिक चणचणीमुळे दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपणारा नव्हता. सरांची वर्षभराची घालमेल व प्रतीक्षा संपता संपता गणपत पदवीधर झाला. त्याला नोकरी मिळाली. आनंदाच्या भरात त्याने वडिलांना लकडा लावला- जग्गूला मुंबईत पाठवा. आणि सरांच्या भावी शिक्षणाची पायवाट मुंबईने तिळा उघडल्यामुळे राजरस्त्यात परिवर्तीत झाली. सरांनी या संधीचे सोने केले. आपल्या आवडत्या इतिहास संशोधन या शाखेत सैद्धांतिक, मूलभूत आणि मौलिक स्वरूपाचे प्रावीण्य संपादन करून आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचे पांग फेडले. त्यांच्या वाटेवर खचितच फुलांच्या पायघड्या अंथरल्या नव्हत्या; मात्र आपणा सर्वांचे आवडते गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या भावगीताचे हे शब्द गुणगुणत सरांनी ही सुसह्य केली असावी.
वाटेवर काटे वेचीत चाललो|
वाटले जसा फुला-फुलांत चाललो॥
मुंबईत खालसा आणि जयहिंद या दोन महाविद्यालयांत शिक्षण, हे घेत असताना ‘कमवा आणि शिका’ हा मंत्र आचरून पत्करलेल्या नोकर्‍या, खोताचीवाडी ते फोर्ट अशी भ्रमंती व सरतेशेवटी एल्फिन्स्टन महाविद्यालयात रु. १६८ पगारावर सहाय्यक लेक्चरर म्हणून अद्यापनाची लाभलेली संधी हे त्यांच्या वाटचालीचे सुरुवातीचे टप्पे म्हणा वा थांबे. मात्र थांबला तो संपला या विचारावर ते ठाम असल्यामुळेच त्यांना संशोधनाचे विश्‍व खुणावत राहिले.

सरांच्या संशोधनपर लेखनामुळे ते महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचे भाष्यकार म्हणून सुविख्यात झाले. १९व्या शतकात बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इलाख्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात जी वैचारिक, सांस्कृतिक जडणघडण झाली त्या दुर्लक्षित इतिहासावर आपले सर्व लक्ष त्यांनी एकवटले. या कालखंडाचे शिल्पकार होते महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, रामकृष्ण भांडारकर तसेच अ. का. प्रियोळकर, लोकसंख्या नियंत्रक व लैंगीक शिक्षणाचे पुरस्कर्ते र. धों. कर्वे, भाऊ दाजी लाड, दादोबा व द्वारकानाथ पांडुरंग तर्खडकर बंधू, भाऊ महाजन हे पत्रकार आणि प्रकाशक. १८२५ ते १८९० या कालखंडात महाराष्ट्राच्या समाजप्रबोधनाच्या या शिल्पकारांवर सरांनी भारावून नव्हे तर साधार आणि समरसून लिहिले. ‘परमहंस सभा’ या विषयावर तर त्यांनी पहिल्यांदा लिहून या दुर्लक्षित चळवळीवर महाराष्ट्राचे व उर्वरित देशाचे लक्ष वेधले. संशोधनासाठी प्राथमिक अस्सल कागदपत्रांवर भर, व्यक्तिकेंद्री नव्हे तर विचारकेंद्री मांडणीमुळे व्यक्तिस्तोम, मूर्तिपूजेची टाळलेली निसरडी वाट आणि इतिहासाचं विश्‍लेषण वर्तमानकालीन नजरेतून करण्याची त्यांची वैचारिक बैठक यामुळे महाराष्ट्राचा चालता-बोलता ज्ञानकोश अशी त्यांची कीर्ती दूरवर पसरली.

नामदार गोखले आणि न्यायमूर्ती रानडे यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्वाचा सरांवर मोठा प्रभाव होता. महात्मा ज्योतिबा फुले हे शुद्र समजल्या गेलेल्या जातींच्या महाराष्ट्राच्या एकोणिसाव्या शतकातील विद्रोही चळवळीचे प्रमुख तत्त्ववेत्ते आणि पहिले प्रभावशाली नेते हे त्यांचे निरीक्षण, विष्णूशास्त्री चिपळूणकर हे प्रतिगामी हिंदू विचारप्रणालीचे प्रवक्ते हे त्यांचे वर्णन तर प्रतिगामी हिंदूंना सामान्य सुधारकांपेक्षा भांडारकर अधिक धोकादायक वाटत ही त्यांची तिरकस प्रतिक्रिया. तसेच लोकमान्य टिळकांनी भारताला कार्ल मार्क्सची ओळख करून दिली व त्यांच्यावर मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या भूमिकेचा प्रभाव होता हे पुराव्यांसह केलेले प्रतिपादन त्यांच्या तर्कनिष्ठ आणि विश्‍लेषणात्मक मांडणीची काही उदाहरणे.

सरांच्या समविचारी- समानशील प्रभावळीत ते जे.व्ही. या आध्याक्षरांनी सुपरिचित होते. इंडियन हिस्ट्री कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले. हे त्यांच्या अथक साधनेचे साफल्य- सार्थक होते. या बहुमानाने ते सुखावले होते. आय.आय.टी. पवई येथे या कॉंग्रेसचे अधिवेशन आयोजित करताना त्यांनी एकट्याने केलेली पायपीट त्यांची दमछाक करणारी होती. मात्र या घरच्या कार्याने ते मोहरले होते. कोलकात्याच्या राजा राममोहन लायब्ररीच्या मंडळावर त्यांची दोनदा नियुक्ती झाली होती. मुंबईतील प्रतिष्ठेच्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. विद्यापीठ अनुदान आयोग, मणीभवन गांधी संग्रहालय, नॅशनल बुक ट्रस्ट तसेच शास्त्री इंडो-कॅनेडियन इन्स्टिट्यूटचे फेलो म्हणून या संस्थांशी ते निगडीत होते. मुंबईतील त्यांची विश्रामस्थाने मुंबई विद्यापीठाची राजाबाई टॉवर लायब्ररी, समोव्हार कॅफे आणि व्हेयसायड् ईन हॉटेल. जिंदादिल सरांना सामिष भोजन, उंची व्हाईन्स आणि मित्रांच्या- आपल्या निवडक विद्यार्थ्यांसमवेत गप्पांच्या मैफली रंगवणे त्यांच्या संशोधनाइतकेच प्रिय होते. मित्रांच्या गराड्यात त्यांचा सभासंंमेलनातील साहेबीपणा, निटनेटक्या पोशाखातील वावर, चेहर्‍यावरील गांभीर्य ही आवरणे गळून पडायची. ते मैत्रीचे भुकेले होते हे डॉ. मनीषा टिकेकर आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आपल्या या सुहृदावर लिहिलेल्या लेखांवरून मला जाणवले आणि आपली उपजत सुशेगाद वृत्ती जोपासताना आमच्या या गोवेकराने इथल्या मातीचा वाण आणि गुण हरवू दिला नाही याचे मला कौतुक वाटत राहिले. सरांना भेटता-ऐकता-न्याहाळता आले नाही याचे शल्य मनात दाटून आले.
आमच्या गोमन्त विद्या निकेतन, मडगाव या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या विचारवेध व्याख्यानमालेच्या पहिल्याच वर्षी २००१ साली डॉ. भालचंद्र मुणगेकर तर २००४ या चौथ्या वर्षी डॉ. मनीषा टिकेकर या सहभागी झाल्या होत्या. २२ जुलै २०१९ या दिवशी सोमवारी सरांचं वयाच्या ८५ व्या वर्षी अल्प तरीही जीवघेण्या आजाराने निधन झालं. मनीषाताईंचा फोन माझ्या टेलिफोन डायरीत टिपलेला आढळला. लागलीच फोनवरून त्यांना लेख वाचल्याचे- आवडल्याचे सांगितले व धारिष्ट करून नीलाताईंशी मी बोलू का, त्यांचा फोन नंबर मला द्याल का? अशी आर्जवी विनंती केली. त्यानी तत्परतेने माझी इच्छा पूर्ण केली. नीलाताई सरांच्या पत्नी. धैर्य एकवटून त्यांना भ्रमणध्वनीवरून साद घातली- ‘मी गोव्याहून बोलतोय. सरांवर लिहिलेले लेख वाचले. दोघांनीही सुरेख लिहिलंय. सर गोव्याचे, त्यामुळे त्यांच्याविषयी ममत्व वाटलं. ऊर अभिमानाने भरून आला. प्लिज एक्सेप्ट माय हार्टफेल कंडोलन्सस.’ असं मराठी-इंग्रजीमिश्रित पण मनापासून बोललो. पलीकडून शब्द ऐकू आले. मलाही तुमच्याशी बोलून बरं वाटलं. ‘तुमचं नाव, तुम्ही काय करता? मुंबईत आलात तर आमच्या घरी या.’ त्यांच्या निखळ आपुलकीने मी आश्‍वस्त झालो.

नीलाताई उच्चविद्याविभूषित. गणित आणि संख्याशास्त्र या दोन्ही विषयांत वेगवेगळी एम.एस्‌सी. केलेल्या. अनेक वर्षे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी अध्यापन केलेले. त्याही मूळ गोव्याच्या. पूर्वाश्रमीच्या नीला पालेकर. मूळगाव उत्तर गोव्यातील हडफडे. मात्र त्यांचा जन्म आणि वास्तव्य मुंबईत. सरांचे सगळे कुटुंब उच्चविद्याविभूषित. शर्मिला, गौरी, श्रद्धा या तीन मुली आणि पुत्र उदयन. शर्मिला आणि श्रद्धा आणि सरांचे दोन्ही जावई अमेरिकेत स्थायिक. गौरी-उदयन यांचे वास्तव्य मुंबईत. ही माहिती मला कशी मिळाली याचीही कथा सांगायला हवी.

आनंदवाडी-सावर्डे हे माझ्या मामाचे गाव. म्हणून तो परिसर मला परिचयाचा. डॉ. यतिन रायकर हा माझा मामेभाऊ. सरांचे गोव्यातील नातलग या भागात असतील असा माझा कयास. म्हणून यतिनकडे फोनवरून चाचपणी केली आणि प्राचार्य दिनकर नाईक यांचे वास्तव्य सावर्ड्याला आहे याचा थांग मला लागला. ते इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक. त्यांना कैक वर्षांपूर्वी पाहिल्याचं मला अंधुक आठवायला लागलं. त्यांचे कुटुंबीय यतिनचे पेशंट. त्यामुळे प्राचार्यांचा फोन नंबर यतिनकडून सहज उपलब्ध झाला. उत्कंठेने प्राचार्यांशी फोनवर बोललो आणि पुन्हा एकदा माझा कयास बरोबर ठरला. ‘सरांचा मी भाचा. त्यांच्या घरी राहूनच मी मुंबईत शिकलो. त्यांच्यामुळेच इतिहास या विषयाची आवड माझ्या मनात निर्माण झाली. ते एवढ्या तडकाफडकी जातील असं मला वाटलं नव्हतं. ते हॉस्पिटलमध्ये आपल्या पायांनी चालत गेले. त्याआधी आम्ही फोनवर बोललो होतो. नेहमीप्रमाणे दिलखुलास बोललो. मला मुंबईला ये असं आमंत्रण दिलं. मी म्हटलं, मला आर्थरायट्रीसचा त्रास आहे, तेव्हा तुम्हीच गोव्याला या असं मी उलट निमंत्रण दिलं. येत्या ऑक्टोबरमध्ये नक्की येईन म्हणून त्यांनी संभाषण आटोपतं घेतलं. फोन ठेवण्यापूर्वी प्राचार्यांनी मला सुखद आश्‍चर्याचा धक्का दिला. म्हणाले, नीलाताई कालच माझ्याशी फोनवर बोलल्या. ‘गोव्यातील एकाने आपणाशी संपर्क साधला. नाव नीट लक्षात राहिलं नाही.’’ तर त्यांनी अस्मादिकांची चौकशी केली होती.

प्राचार्यांशी अदमासपंचे मी संपर्क साधल्यामुळे आता आकाश निरभ्र झाले होते. प्राचार्यांनीच सरांच्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती मला पुरवल्यामुळे माझ्या या लेखाला आकार आणि आधार लाभायचा होता.
पु. ल. देशपांडे यांनी त्यांचे आवडते गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे वर्णन ‘गाण्यात राहणारा माणूस’ या शब्दांत केले आहे. इथे सरांचे वर्णन ‘इतिहासात रमलेले सर’ असे केले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. अशी माणसे आमच्यासारख्यांना कायम आदर्शवत आणि गुरुस्थानी असतात. सद्गुरूंचा महिमा असा आहे-
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरूं तं नमामि
आमच्या गावात एक दत्तमंदिर आहे. आरतीनंतर मंदिरात हे स्तवन आळवण्याचा परिपाठ आहे. स्तवनाची सुरुवात अशी-
अपराध क्षमा आतां केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे
अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे