ब्रेकिंग न्यूज़

केटामाइन कनेक्शन

सत्तरीतील पिसुर्लेसारख्या आडवळणी गावी महसूल गुप्तचर खात्याच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून शंभर किलो केटामाइन हे अमली द्रव्य जप्त करण्याच्या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ माजणे साहजिक आहे. केटामाइनची विक्री गोव्यातील काही औषधालयांमध्ये होत असल्याचे सांगून त्याविरुद्ध कारवाईचे आदेश आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यापूर्वी दिलेले होते. मात्र, दैवदुर्विलास म्हणजे त्यांच्याच सत्तरीमध्ये अशा प्रकारचा कारखाना आता सापडला आहे. महसुल गुप्तचर खात्याची ही कारवाई केवळ गोव्यापुरती मर्यादित नव्हती. गोव्याबरोबरच पनवेल, तसेच मुंबईतील जोगेश्वरी आणि भिवंडीतही हे छापे मारले गेले आहेत आणि त्या सार्‍यातून एकूण सत्तावीस कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. म्हणजेच एका बड्या टोळीवरील ही धडक कारवाई आहे. यापैकी एक सूत्रधार हा रसायनशास्त्र विषयात पहिला आला होता, परंतु अमली पदार्थ व्यवसायासंदर्भात त्याला यापूर्वीही दोन वेळा अटक झालेली आहे. मुंबईतील जोगेश्वरीत ज्या जागेवर छापा मारला गेला ती जालंधरच्या एका व्यक्तीने भाड्याने घेतली होती. त्यामुळे पिसुर्लेतील गाळा एका पंजाबी गृहस्थाने भाड्याने घेतला होता या गाळा मालकाच्या म्हणण्याशी याचे धागे जुळतात. केटामाइन कारखाने चालवणार्‍यांच्या या टोळीमध्ये एक ब्रिटनवासीही आहे. म्हणजेच हे एका आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांच्या टोळीचे उपद्व्याप असू शकतात. पिसुर्ल्यातील कारखान्यामध्ये किती काळ हे केटमाइन बनवले जात होते व कशासाठी बनवले जात होते, अमली पदार्थ म्हणून त्याचा वापर होत होता की वैद्यकीय उपचारांसाठी हे आता तपासांतीच कळू शकेल. गोवा हे अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे एक केंद्र आहे यावर केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांनी यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. तरीही गोव्यात वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून टाकल्या जाणार्‍या छाप्यांमध्ये मात्र केवळ गांजाच कसा सापडतो हे मोठे गूढ आहे. या पार्श्वभूमीवर महसुल गुप्तचर खात्याची ही कारवाई कौतुकास पात्र आहे. त्यांना असलेल्या अधिकारानुसार स्थानिक पोलिसांना माहिती न देता ही कारवाई झाली आणि कारखाना सील करण्यात आला. यापूर्वी हरमलमध्ये छापा मारायला गेलेल्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला झाला होता आणि तेव्हा राजकीय दबावाखाली त्या अधिकार्‍यांविरुद्धच कसे गुन्हे नोंदवले गेले होते त्याची आठवण पिसुर्लेतील कारवाईने जागी झाली आहे. ज्या कारखान्यावर छापा टाकला गेला तो गाळा भारतीय जनता पक्षाच्या उत्तर गोवा सरचिटणिसांच्या नावे आहे. त्यांनी तो एका पंजाबी व्यक्तीला भाड्याने दिला होता आणि त्याने तेथे काय व्यवसाय चालवला आहे याची त्यांना कल्पना नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना काही माहिती नव्हती हे खरे असेल, परंतु औद्योगिक वसाहतीमधला गाळा स्वतः न वापरता अशा प्रकारे भाड्याने देता येतो का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे हेही नाकारता येत नाही. केटामाइनसारखा पदार्थ बेकायदेशीरपणे बनवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे केटामाइन गुंगी देण्यासाठी वापरले जात असले तरी अमली पदार्थ म्हणूनही त्याचा वापर होतो. गोव्यातील रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्रास वापरले जाणारे सीके – १ हे केटामाइन व कोकेनपासून बनवलेले असते असे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. गेल्या फेब्रुवारीत केरळमध्ये अशाच प्रकारे केटामाइनचा कारखाना सापडला होता, त्याचे धागेदोरे अफगाणिस्तान आणि श्रीलंकेपर्यंत आणि अगदी शस्त्रास्त्र माफियापर्यंत पोहोचले होते. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र माफिया हातात हात घालून वावरत असतात हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. मेक्सिकोमधील टोळ्या, रशियन टोळ्या त्यासाठी कुख्यात आहेत. अशा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा पर्दाफाश करणे हे खूप कठीण असते. चीनमध्ये बोसे नावाच्या एका गावी अमली पदार्थांची निर्मिती होत असे. तेथे छापा टाकायला तब्बल सहा वर्षे पूर्वतयारी करावी लागली होती. गोव्याची जगभरात एक सुंदर प्रदेश म्हणून आजवर ओळख होती. दुर्दैवाने आता ती अमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, कॅसिनो, मसाज पार्लर यांचे माहेरघर अशी बनत चालली आहे. प्रत्येक गोमंतकीयासाठी हे अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरगोष्टींविरुद्ध जनतेने एकदिलाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. आज गोव्याच्या रस्तोरस्ती, पुलांवर चित्रविचित्र ग्राफिटी दिसतात. अमली पदार्थ व्यवहाराच्या त्या सांकेतिक खुणा असू शकतात, परंतु त्याकडे बघते कोण? यापूर्वी अमली पदार्थ माफियांनी पोलिसांचा संबंधित विभागच कसा पोखरला होता आणि मालखान्यातील ‘माल’ पोलिसांकडूनच कसा विकला जात होता हे जनता विसरलेली नाही. अमली पदार्थांचे लोण आता आपल्या शाळा – कॉलेजांपर्यंत आलेले आहे. सरकारने या विषवल्लीसंदर्भात आता तरी जागावे. ड्रग माफियांविरुद्ध तपास यंत्रणांचे पाश कसावेत. ते तसे आवळले गेले नाहीत तर नजीकच्या भविष्यात अमली पदार्थांची ही विषवल्ली गोव्याच्या तरुणाईचा गळा आवळल्याविना राहणार नाही.