केजरीवाल वि. किरण

चार दिवसांपूर्वीच भाजपामध्ये आलेल्या किरण बेदी यांना दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारीच नव्हे, तर थेट मुख्यमंत्रिपदाची दावेदारी पक्षाध्यक्षांनी बहाल केली आहे. अरविंद केजरीवाल यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी पक्षाला एक तुल्यबळ चेहरा हवा होता आणि किरण बेदी यांच्या रूपाने भाजपला तो आता मिळाला आहे. किरण बेदी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात जरी होत्या, तरी त्या आजवर राजकारणात नव्हत्या. त्या आणि केजरीवाल एकेकाळचे आंदोलनातील सहकारी असले, तरी आम आदमी पक्षाची स्थापना होऊ घातली तेव्हा त्यांनी त्याऐवजी अण्णांची साथ देणे पसंत केले होते. त्यामुळे आता भाजपमध्ये जाताना त्यांच्या डोक्यावर जुने राजकीय ओझे नाही. भाजपने ज्यांना गेल्यावेळी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले होते, ते डॉ. हर्षवर्धन आता केंद्रीय मंत्री आहेत. बेदी यांना आकस्मिकरीत्या पुढे आणून थेट डोक्यावर बसवल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये सुप्त नाराजी असली, तरी बेदी यांना थेट पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा असल्याने आणि आज भाजपवर या जोडगोळीचा एकछत्री अंमल असल्याने बेदी यांच्याविरोधात ब्र काढण्याची कोणत्याही नेत्याची प्राज्ञा नाही. जो काही विरोध आहे, तो आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आडून व्यक्त करण्यातच ते समाधान मानतील, कारण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांची काय स्थिती झालेली आहे याचे ते सर्व साक्षीदार आहेत. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या धुमाळीत बेदी यांच्यासारख्या ‘पॅराशूट सीएम’ साठी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते कितपत तळमळीने वावरतील याची धाकधूक असल्याने बेदी यांना केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभी करण्याची जोखीम पक्षाने घेतलेली नाही. त्याऐवजी त्यांना कृष्णानगरसारख्या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून उभे करण्यात आलेले आहे. केजरीवाल यांच्या विरोधात पक्षाने नुपूर शर्मा नावाच्या एका वकील तरुणीला उभे केले आहे. काल केजरीवालांचा दणदणीत रोड शो झाला. गमतीचा भाग म्हणजे खरे तर ते मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरायला जाणार असल्याने हे शक्तिप्रदर्शन होते. पण थांबत थांबत आणि भरपूर मीडिया फुटेज मिळवत निघालेली ‘आप’ ची ही मिरवणूक पोहोचेपर्यंत उशीर झाला. आता ते तो उद्या भरणार आहेत. खरे तर गेल्या निवडणुकीनंतर अशाच प्रकारच्या बालिशपणामुळे केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे हसे झाले होते. मुख्यमंत्रिपद मिळालेले असताना रात्री रस्त्यावर झोपणे काय, ४९ दिवसांत राजीनामा देणे काय, त्यातून केजरीवाल यांची छबी मलीन झाली आणि मध्यमवर्गीय जनतेच्या मनातून ते उतरले. मात्र, दिल्लीच्या तळागाळातील सामान्य जनतेमध्ये केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाबाबत बरीच सहानुभूती अजूनही आहे, हे दिसते आहे. त्यामुळे आम आदमी पक्षानेही या मतदारांवरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. स्वस्त पाणी, वीज, शिक्षण, रोजगार अशी आश्वासने केजरीवालांनी त्यांना दिली आहेत. यावेळी दिल्लीची खरी लढत आप आणि भाजप यांच्यातच होईल. कॉंग्रेस निवडणुकीआधीच तिसर्‍या स्थानी फेकली गेली आहे आणि पक्षनेतृत्वाने आधीच आपला पराभव जणू मान्य करून टाकला आहे. एबीपी – नीलसनच्या सर्वेक्षणातूनही हेच चित्र समोर आले आहे. केजरीवाल यांची पळपुटेपणाची छबी त्यांना या निवडणुकीतही काही प्रमाणात मारक ठरू शकते आणि किरण बेदी यांचे पक्षातील उपरेपण त्यांनाही तापदायक ठरू शकते. भाजपसाठी दिल्लीची निवडणूक ही कमालीची प्रतिष्ठेची बनलेली आहे. किरण बेदी यांना पक्षात आणण्याचे पाऊलही पक्ष कोणतीही धोरणात्मक कमतरता राहू देऊ इच्छित नाही हेच सूचित करते. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांच्या हालचालीही सुरू आहेत. नुकतेच दिल्लीत ख्रिस्ती धर्मस्थळांची विटंबना करण्याचे काही प्रयत्न घडले. परिवारातील कडव्या नेत्यांची बेताल वक्तव्ये अल्पसंख्यकांमध्ये भाजपविषयी पुन्हा एकदा असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते. त्यामुळे विकास आणि सुशासनाच्या मार्गावरून सुसाट निघालेली भाजपची गाडी घसरू नये याची दक्षता पक्षनेत्यांना कसोशीने घ्यावी लागेल. केजरीवालांचा आम आदमी पक्ष गेल्या वेळची लोकप्रियता कायम राखू शकलेला आहे का याचाही या निवडणुकीत कस लागेल.