केंद्राच्या धोरणानुसारच मडगावमधील जिल्हा इस्पितळ पीपीपी तत्वावर

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणेंची माहिती

मडगाव येथील दक्षिण जिल्हा इस्पितळ सार्वजनिक व खासगी तत्त्वावर (पीपीपी) चालवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणानुसार घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

एमसीआयच्या वैद्यकीय महाविद्यालय स्थापना नियम १९९९ मधील कलम २ (५) (२) नुसार सरकारी इस्पितळ सार्वजनिक व खासगी तत्त्वावर स्थापन करता येत असल्याचे राणे यावेळी म्हणाले व त्यानुसारच ते पीपीपी तत्त्वावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वरील ३०० खाटांचे इस्पितळ खासगी कंपनी, ट्रस्ट अथवा सोसायटीकडे सोपवताना एक सामंजस्य करार करण्यात येणार असून तो जास्तीत जास्त ३३ वर्षांचा असेल अथवा लिजवर ९९ वर्षांचा असू शकेल, असे राणे यांनी नमूद केले. हे करताना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी ज्या सरकारी जागा असतात त्या अबाधित ठेवल्या जातील. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या इस्पितळात रुग्णांनाही सेवा देण्यात येईल, असे राणे म्हणाले.

पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय तसेच इस्पितळाचा दर्जा वाढणार असून त्याचा फायदा राज्यातील लोकांनाच मिळणार असल्याचे ते म्हणाले.

चोडणकरांचा आरोप निराधार
वरील प्रकरणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, अशी संतप्त मागणीही त्यांनी यावेळी केली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व महाविद्यालय पीपीपी तत्त्वावर स्थापन करण्यासाठी आपण फिक्सिंग केले आहे हा चोडणकर यांचा आरोप निराधार असून तो दिशाभूल करणारा असल्याचे ते म्हणाले. आपण आरोग्यमंत्री आहे म्हणून आपणाला हवे तसे करून असे फिक्सिंग करता येत नसल्याचे ते म्हणाले. सरकारकडे निधीची कमतरता असते तेव्हा पीपीपी तत्त्वावर प्रकल्प उभे करावे लागतात. मोप येथील विमानतळ असाच उभारण्यात येत आहे. उद्या मडगाव येथे मोठे बस टर्मिन्स उभारायचे झाल्यास तेही तसेच उभारावे लागणार असल्याचे राणे म्हणाले.

गोवा फॉरवर्डकडून
नोकर्‍या नाहीत
गोवा फॉरवर्ड पक्षाकडे तीन मतदारसंघ आहेत. पण या तिन्ही मतदारसंघांमध्ये या पक्षाचे आमदार एकाही युवक-युवतीला नोकरी देऊ शकले नसल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.