ब्रेकिंग न्यूज़

कॅसिनो पर्यटनाचा भाग, बंद करणे अशक्य : मुख्यमंत्री

गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅसिनो आवश्यक असून सरकार ते बंद करू शकत नाही अथवा पूर्णपणे त्यांना हटवू शकत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल गोवा पर्यटन विकास महामंडळात अनौपचारिकरीत्या पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत गोवा पर्यटन विकास महामंडळाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी वरील उद्गार काढले.

पर्यटन म्हटले की अन्य गोष्टींबरोबरच पर्यटकांना कॅसिनोसारखी सेवाही उपलब्ध करून द्यावी लागते, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत राहण्यासाठी व कारभार चालवण्यासाठी काही गोष्टी हव्या असतात. कॅसिनो अनेक वर्षे आहेत व ते पूर्णपणे हटविता येणार नाहीत. सध्या तरी कॅसिनो हे गोव्याच्या पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग बनला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रामीण पर्यटन, वन्यजीव पर्यटन, वैद्यकीय पर्यटन यावर भर देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. श्रीमंत पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी किनार्‍यांवरील साधनसुविधांमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. बोंडला प्राणी संग्रहालयाकडेही जास्तीत जास्त पर्यटक जातील याकडे लक्ष देण्याची गरज असून हणजुणे धरण हे सुद्धा एक चांगले पर्यटन स्थळ बनू शकते असे ते म्हणाले.

सोपटेंनी पदभार स्वीकारला
यावेळी बोलताना दयानंद सोपटे म्हणाले, की आपल्या नियुक्तीचा आदेश आजच आला व आपण तात्काळ ताबा घेतला. महामंडळासाठी आपल्या वेगवेगळ्या योजना असून त्या मार्गी लावण्यास आपणाला दोन महिन्यांचा काळ लागणार असल्याचे ते म्हणाले.
जे महामंडळ मिळाले त्यावर तुम्ही समाधानी आहात काय, असे विचारले असता आपण समाधानी असल्याचे सोपटे यांनी सांगितले. मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी दयानंद सोपटे यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाचा राजीनामा दिला होता.