कॅफे कॉफी डे चे मालक बेपत्ता झाल्याने खळबळ

भाजप नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई तथा कॅफे कॉफी डे या प्रसिद्ध कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ हे मंगळुरू येथे जाण्यास निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. या वृत्तानंतर प्रशासकीय यंत्रणांनी सिद्धार्थ यांच्या शोधाची मोहीम सुरू केली. एनडीआरएफ, तटरक्षक दल, किनारी पोलीस या यंत्रणांना या कामाला जुंपण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार सिद्धार्थ यांना सोमवारी रात्री दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कोटेपुरा भागातील नेत्रावती नदीवरील पुलाजवळ काही लोकांनी पाहिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ सोमवारी बंगळुरू येथून सकलेशपूर येथे रवाना झाले होते. दरम्यान, त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मंगळुरूला जाण्यास सांगितले. या मार्गावरील नेत्रावती पुलाजवळ पोचल्यानंतर ते गाडीतून उतरले व आपण ‘वॉक’साठी जात असल्याचे व आपण परत येईपर्यंत ड्रायव्हरला तेथे थांबण्यास सांगितले. मात्र दोन तासांनंतरही ते न परतल्याने ड्रायव्हरने पोलिसांशी संपर्क साधला.