ब्रेकिंग न्यूज़

कॅनडाची बियांका अँड्रिस्कू चॅम्पियन

>> अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद हुकले

कॅनडाच्या बियांका अँड्रिस्कू हिने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे कारकिर्दीतील २४वे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे सेरेनाचे स्वप्न भंग पावले.

सामना सुरू झाल्यापासून बियांकाने सेरेनाच्या अनुभवाची तमा न बाळगता आपला नैसर्गिक आक्रमक खेळ केला. सेरेनाचे प्रत्येक फटके तितक्याच दिमाखाने परतावून लावत बियांकाने सामन्यात आघाडी घेतली आणि बघता-बघता पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसर्‍या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. तिने या सेटमध्ये आपला अनुभव पणाला लावून नवख्या प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकला पण बियांकाने आपली लय कायम राखत दुसरा सेटही जिंकला.

एकवेळ दुसर्‍या सेटमध्ये बियांका ५-१ अशी आघाडीवर होती. सहाव्या गुणासाठी ती ४०-३० अशी भक्कम स्थितीतही होती. परंतु, सेरेनाने या गुणासह एकूण चार गुण घेत दुसरा सेट रंगतदार बनवला. स्वतःची सर्व्हिस राखतानाच बियांकाची सर्व्हिस पुन्हा एकदा भेदत सेरेनाना सेट ५-५ असा बरोबरीत आणला. सर्व पाठिराखे सेरेनाच्या नावाचा उच्चार करत तिला पाठिंबा देत असल्याने बियांकाने काहीवेळ आपले कानदेखील बंद केले. बियांकाने यानंतर सलग दोन गुण घेत सामना व विजेतेपद आपल्या नावे केले. संपूर्ण सामन्यात सेरेनाने तब्बल ३३ टाळता येण्यासारख्या चुका केल्या तर बियांकाने केवळ १७. हाच फरक विजेता व उपविजेता ठरविण्यास पुरेसा ठरला.

१९६८ साली व्यावसायिक खेळाडूंसाठी युएस ओपनची दारे उघडल्यानंतर मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरून पहिल्याच प्रयत्नात विजेतेपदाला गवसणी घालणारी बियांका ही पहिली महिला खेळाडू ठरली. या विजयासह बियांका अँड्रिस्कूने कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. १९ वर्षीय बियांका ही मारिया शारापोवानंतरची सर्वात तरूण ग्रँडस्लॅम विजेती ठरली. प्रतिष्ठेच्या मोठ्या स्पर्धांमधील सेरेनाचा हा अंतिम फेरीतील सलग चौथा पराभव ठरला. तर युएस ओपनमध्ये तिला सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.