ब्रेकिंग न्यूज़
कृष्णलीला ः जीवनाचा प्रवास, आरोग्याचा मंत्र

कृष्णलीला ः जीवनाचा प्रवास, आरोग्याचा मंत्र

  •  डॉ. मनाली पवार

‘श्रीकृष्ण’ हा एक ‘आदर्श अवतार’. तसेच कृष्णाचा जन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान याकडे फक्त कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की श्रीकृष्णाने प्रत्येक कृतीमधून आपल्याला आरोग्याचा संदेश दिलेला आहे.

आज खरी गरज आहे ती मुलांना श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या कथा सांगून निसर्गाच्या सान्निध्यात नेण्याची! झाडे लावण्यास प्रवृत्त करण्याची! पशु-पक्ष्यांवर प्रेम करायला शिकवण्याची व संगीत हे ताण घेऊन स्पर्धेत जाण्यासाठी नसून आत्मिक सुखासाठी असते याची जाण करून देण्याची!!

गोकुळाष्टमीच्या उत्साहाची घराघरांत आतुरतेने आजही वाट पाहिली जाते. आजही श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्णलीला, श्रीकृष्णाचे भागवत पारायणे, प्रवचने भारतात तसेच काही अन्य देशांतही प्रचलीत आहेत. आजही गोकुळाष्टमी उत्सवाचे स्वरूप देऊन साजरी केली जाते. कृष्णचरित्राचे जर आपण अवलोकन केले तर आपल्याला असे जाणवेल की कृष्णाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ज्ञान आहे व पूर्ण जीवनशैली म्हणजे आरोग्याचा मंत्र होय. मग तो कंसाचा वध असो, कालियामर्दन असो, द्रौपदीवस्त्रपूरण असो वा गोपीवस्त्रहरण. या वरवर पाहता आपल्याला कथा जरी वाटत असल्या तरी त्या नुसत्या कथा नसून ते एक अध्यात्म आहे, जे सर्वसामान्य जनतेसाठी व लोककल्याणासाठी आहे. त्याचा उपयोग उद्योगव्यवसाय संवर्धनासाठी व लोकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहे. ‘कंसवध’ म्हणजे दृष्ट प्रवृत्तींचा नाश, षड्‌रिपुंचा नाश. आपण षड्‌रिपुंवर जर विजय मिळवला तर आपली आध्यात्मिक प्रगती होईल व प्रत्येकजण सगळ्या अडथळ्यांना तोंड देत उत्तम, आनंदमय आयुष्य जगेल. कालियामर्दन म्हणजे जलशुद्धिकरणासाठी श्रीकृष्णाने रचलेला खेळ. याकडे कथेच्या दृष्टीने न पाहता आज गरज आहे डोळस व्हायची. आज आपण पाण्यात कचरा, विष्ठा, मेलेली जनावरे, फॅक्टरी- कंपनीमधील केमिकल्स अशा विविध अशुद्धी सोडतो व हा अशुद्धीरुपी कालिया आपल्या आरोग्याचे, निसर्गाचे लचके तोडत आहे. अशा कालियामर्दनासाठी आज एक श्रीकृष्णजन्माची नाही तर कितीतरी श्रीकृष्णरुपी जन्मांची गरज आहे.

द्रौपदीवस्त्रपूरण म्हणजे स्त्रीयांप्रती असलेला सन्मान व स्त्रियांची प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी. आपण ही जबाबदारी पार पाडत आहात का? आज अगदी आठ महिन्यांच्या बालिकेपासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत पुरुषांच्या क्रुरकर्मांचे शिकार होत आहेत, असे का? गोकुळाष्टमी म्हणजे नुसत्या दह्याहंड्यांच्या स्पर्धा नव्हेत. त्यांच्या कथांतून, लिलांतून बोध घेणे होय.

गोपिकांची वस्त्रे लपवणे या श्रीकृष्णाच्या नुसत्या खोड्या नसून त्यात अध्यात्माचा फार मोठा ज्ञानाचा गाभा आहे. जोपर्यंत आपण आत्म्यावर चढवलेले मुखवटे काढत नाहीत, तोपर्यंत आपल्याला परमात्मदर्शन घडत नाही.

‘श्रीकृष्ण’ हा एक ‘आदर्श अवतार’. तसेच कृष्णाचा जन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान याकडे फक्त कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की श्रीकृष्णाने प्रत्येक कृतीमधून आपल्याला आरोग्याचा संदेश दिलेला आहे….

* सुप्रजा जन्माला येण्यासाठी आयुर्वेदाने ‘गर्भसंस्कार’ सांगितले आहेत. ‘गर्भसंस्कार’ म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वी मातेच्या आचार- विचार, आहार याद्वारे सुप्त रुपांत गर्भावर होणारे संस्कार. देवकी व वासुदेव यांना कंसाने तुरुंगात टाकल्यामुळे या दोघांनीही आपले पूर्ण जीवन ईशचिंतनात घालविले. प्रजेचे संकट दूर करून रक्षण करणारे अपत्य आपल्या पोटी जन्माला येणार अशी श्रद्धा व विश्‍वास ठेवून ज्या अपत्याला जन्माला घातले तो म्हणजे श्रीकृष्ण.
श्रीकृष्ण म्हणजे सर्वसामान्यांप्रमाणे राहून अगदी गल्लीतल्या मुलांमध्ये खेळणारा, आपल्याहून मोठ्या गोप-गोपिकांमध्ये रममाण होणारा, गोकुळासारख्या गावावरची संकटे दूर करणारा, जुलमी राजांना दंड देऊन तेथील प्रजेला भीतिमुक्त करणारा, स्त्रीची प्रतिष्ठा जपणारा, प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता अर्जुनाकडून त्याचे कर्तव्य करवून घेणारा, दही-दूध-लोण्याच्या सेवनाने उत्तम शरीरसौष्ठ्य व स्वास्थ्य लाभलेला पुत्र. कुळाला अभिमान ठरावा असा श्रीकृष्ण, मग तो मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाच्या पोटी जन्माला यावा असे वाटणे साहजिकच आहे. यासाठी गर्भवतीच्या शयनकक्षात श्रीकृष्णाचे एखादे सुंदर चित्र असावे, आपल्याला श्रीकृष्णासारखे अपत्य व्हावे अशी इच्छा संपूर्ण गर्भारपणात ठेवल्यास, तसा गर्भावर संस्कार होतो व तसेच घडते.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे गर्भधान संस्कार हा शरीरशक्ती उत्तम असलेल्या ऋतूत म्हणजे हेमंत-शिशिर ऋतूत व्हावा, असे सांगितले आहे. उत्तम बल असलेल्या व त्रिदोष साम्य असलेल्या महिन्यात म्हणजे कार्तिक, मार्गशीर्षमध्ये गर्भधान झाल्यास श्रीकृष्णासारखे श्रावणात अनेक श्रीकृष्ण जन्माला येतील, हेच जणू गोकुळाष्टमी सांगत असेल.

* श्रीकृष्णाचे बालपण म्हणजे आज मुलांनी काय खावे, कसे रहावे, कसे वागावे याचे जणू प्रात्यक्षिकच होय. अगदी लहान वयापासून कृष्ण, बलराम, इतर गोकुळात राहणार्‍या बाळ-गोपाळांसमवेत गाईंना चारण्यासाठी वनात घेऊन जात असे. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने पाहता असे म्हणता येईल की मुलांनी मोकळ्या हवेत खेळावे- बागडावे. आजकाल मुलांमध्ये खेळण्याची वृत्तीच संपली. मुले चार भिंतीत कैद आहेत व खेळाचे स्वरुप पूर्णपणे बैठे झाले आहे. टी.व्ही. लॅपटॉप व मोबाईल यापलीकडे विश्‍व राहिलेले नाही. परिणामी लहान वयातच लठ्ठपणा, आळशीपणा, मंदपणा, अस्थमासारखे कफाचे आजार. एका बाजूने स्पर्धा तर दुसर्‍या बाजूने ताण हे सर्व टाळण्यासाठी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने एक नवा धडा आपल्या बाळकृष्णांना द्या.
– श्रीकृष्णाचा आदर्श मुलांना समजावून सांगा.
– मुलांना मोकळ्या हवेत जाण्याची मुभा द्या. मातीशी समरस होऊ द्या.
– त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढू द्या. पुरेशा प्रमाणात मैदानी खेळ खेळू द्या.
– प्राण्यांवर, झाडांवर प्रेम करण्याची सवय लावा.

* बाळकृष्ण म्हटले की आठवतो तो ‘माखनचोर’. लहानपणी कृष्ण इतर बाळगोपाळांसमवेत गोपींच्या घरी जाऊन दही-लोणी फस्त करीत असे. ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. म्हणजेच मुलांनी खेळकर, उत्साही आणि ताकदवान बनण्यासाठी लहानपणी दूध, लोणी, तुपासारख्या गोष्टी सेवन कराव्यात ही त्यामागची खरी योजना आहे. आजच्या मॅगी नुडल्स, पिझ्झा, बर्गर, केक इत्यादी हा मुलांचा आहार असू नये. उत्तम आरोग्य व बुद्धिमत्तेसाठी दूध, दही, ताक, लोणी व तूप असा आहार असावा.

बाळकृष्णाच्या गोष्टींमधून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे- ‘शेअरिंग’. कृष्णाला दही- लोणी आवडत असे पण म्हणून तो एकटाच कधीही खात नसे. तर आपल्यासोबत असलेल्या बोलगोपाळांना अगोदर वाटून नंतर शिल्लक राहिलेले स्वतः खायी ही गोष्ट लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखी आहे.
श्रीकृष्णाच्या चित्रांमध्ये नेहमी गाईचीही प्रतिमा असते. एवढे महत्त्व गोमातेला आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार पाहता गायींपासून जे दूध मिळते ते पूर्णान्न होय व पंचगव्य हे औषध स्वरूप होय. गाईपासून तयार होणार्‍या दूध, दही, तूप, गोमूत्र व गोमय या पाच द्रव्यांना मिळून ‘पंचगव्य’ म्हणतात. पंचगव्य शरीरशुद्धीसाठी तसेच कफदोष संतुलित करण्यासाठी वापरले जाते. आयुर्वेदिक पंचगव्यापासून बनवलेले तूप ‘पांचगव्य-घृत’ हे पांडुरोग, ताप, कावीळ, अपस्मार, दमा, मानसिक विकार इत्यादीमध्ये औषध स्वरुपात वापरले जाते. रोजच्या रोज पंचगव्य नाही वापरलं तरी चालेल, पण दूध, ताक, लोणी, तूप यांचा आहारात जरूर समावेश करावा. कारण दुधामुळे जीवनशक्ती वाढते, ताकद वाढते, तारुण्य टिकून राहते, हाडे बळकट होतात. आज-काल मुलं दुधच पीत नाही. परिणामी कमजोर हाडे, अशक्तपणा, मंदपणा व सतत हात-पाय दुखण्याची तक्रार. श्रीकृष्णाचे बालपण पूर्ण गाईबरोबर दुधात गेले व आपल्या मुलांचं चहा, कॉफी, आईस्क्रीम व थंडपेये.

ताक – दूधाला चांगले विरजण लावले की दही तयार होते. हे दही घुसळून त्यातील लोणी वेगळे केले की ताक शिल्लक राहते. हे ताक उत्तम पाचक आहे. बर्‍याच रोगांमध्ये जसे अर्श, उदरसारख्या रोगांमध्ये याचा विशेष उपयोग होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये या रोगांत ताकाची विशेष प्रशस्ती केली आहे.

लोणी – ताजे लोणी चवीला गोड, पचायला हलके, वीर्याने शीत मलप्रवृत्ती बांधून घेण्यास मदत करते. मेधावर्धक आहे. लहान मुलांनी रोज १-२ चमचे घरचे ताजे लोणी खावे. ‘बटर व चीज’ नव्हे! हा.. लोण्याने मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो, ताकद वाढते, आकलन शक्ती वाढते.

तूप- लोणी कढवून तयार केलेले तूप तर सर्वांसाठीच हितकारक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले साजूक तूप रसायन गुणांनी युक्त असते. अग्नी प्रदीप्त करते. म्हणूनच घरातील लहानांच्या तसेच मोठ्यांच्याही आहारात दूध, ताक, लोणी व तूप यांचा समावेश अवश्य करावा. म्हणजेच फक्त गोपालकाल्यापुरताच दही-दुधाचा उपयोग न करता रोज आहारातही दूध-ताक इत्यादी सेवन करणे आवश्यक आहे.
श्रीकृष्णाच्या बाललीलांचा विचार करता असे जाणवते की श्रीकृष्ण नेहमी सवंगड्यांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात राहात असे. वृक्ष, झाडे, वेली, पशु, पक्षी व नद्याखोर्‍यात त्याची जवळीक असायची. संगीतप्रेमी म्हणजे बासरीच्या धूनमधून संपूर्ण परिसर प्रफुल्लित व्हायचा. कुठलाच मानसिक ताण नाही. आज स्पर्धेच्या युगात मुले मात्र सारखी तणावाखाली वावरत असतात. आज खरी गरज आहे ती मुलांना श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या कथा सांगून निसर्गाच्या सान्निध्यात नेण्याची! झाडे लावण्यास प्रवृत्त करण्याची! पशु-पक्ष्यांवर प्रेम करायला शिकवण्याची व संगीत हे ताण घेऊन स्पर्धेत जाण्यासाठी नसून आत्मिक सुखासाठी असते याची जाण करून देण्याची!! प्रत्येक पालकाने श्रीकृष्णकथा या नुसत्या कथा म्हणून न घेता, मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी उपयोग करून मुलांना प्रोत्साहन द्यावे.
तसेच श्रीकृष्णाच्या कथांमध्ये मनुष्याच्या विकासाचे जडण-घडण लपलेले आहे. तसेच गोकुळाष्टमीचा प्रसादही आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा आहे. गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून ‘गोपालकाला’ दिला जातो. त्यात तांदळापासून बनवलेले मऊ पोहे व दह्याच्या मिश्रणापासून बनवलेला असतो. तांदूळ मुळात पचायला हलके. पोह्यामध्ये थोडीशी रूक्षता असते पण पोह्यात घातलेल्या दह्यामधील स्निग्धतेने तो कोरडेपणाही दूर होतो. सोबत घातलेल्या मीठ व गुळामुळे ते रुचकर होतात व पचायला सुलभ होतात. श्रावण महिन्यात तसा पाऊस अधिकच असल्याने जठराग्नी मंद असतो. म्हणून पावसाळ्यात मंद झालेल्या पचनशक्तीला मानवेल असा हा प्रसाद आहे. गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी असा गोपालकाला प्रसाद म्हणून अवश्य सेवन करावा. पूर्ण श्रावण महिन्यात असे दही-पोहे अधुन-मधून खाल्ले तरी चालते.

तसेच गोकुळाष्टमीला काही प्रदेशात शेवग्याच्या पाल्याची भाजी खाण्याचीही प्रथा आहे. त्याचेही कारण म्हणजे पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असतो. तसेच जंतुसंसर्गही होत असतात, पोटातही जंत होण्याचे प्रमाण पावसाळ्यात वाढलेले असते. शेवगा हा उत्तम पाचक आहे व कृमीनाशक आहे तसेच मलसारक आहे. म्हणूनच गोकुळाष्टमीपासून पुढे ही भाजी खाण्याची प्रथा असावी.

चला तर मग या गोकुळाष्टमीला आपल्या बालगोपाळांना- मग ती मुलगी असो अथवा मुलगा, त्यांना नुसते राधा-कृष्णाच्या वेषात नटवून फोटो काढू नका तर आपली मुलं ही प्रत्यक्ष कृष्णच आहे असे गृहीत धरून आनंद साजरा करा. श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांना जोपासा व स्वतःमध्येही श्रीकृष्णाचे गुण बिंबवण्याचा प्रयत्न करा.