कृतघ्नता

सीमा सुरक्षा दलाच्या २९ बटालियनमधील एक जवान तेजबहादुर यादव याने बीएसएफच्या जवानांना देण्यात येणारा अपुरा नाश्ता आणि निकृष्ट जेवण यावर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आणि ते व्हायरल होताच संपूर्ण देश त्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असले, तरी सीमा सुरक्षा दलाकडून सदर जवानाचेच चारित्र्यहनन सुरू असून त्याच्या तक्रारीला बेदखल करण्याची धडपड चाललेली दिसते, लष्कर किंवा निमलष्करी दलांमध्ये शिस्तीला अपरिमित महत्त्व असल्याने या कृत्याला शिस्तभंग मानून बहुधा या जवानावर कारवाई करण्याचा प्रयत्न होईल, परंतु त्याने जी तक्रार केली आहे ती गंभीर स्वरूपाची आहे आणि त्याची सखोल शहानिशा होणे आवश्यक आहे. सरकार लष्करी आणि निमलष्करी दलांसाठी भरपूर सामुग्री पाठवते, पण वरचे अधिकारी परस्पर खुल्या बाजारात ती विकून टाकतात असा अत्यंत गंभीर आरोप तेजबहादुरने केलेला आहे. तेजबहादुर बेशिस्तीने वागायचा, दारू प्यायचा, कामावर गैरहजर राहायचा वगैरे ठपके त्याच्यावर आता अधिकारीवर्गाने ठेवलेले असले तरी तक्रारदार मनोरुग्ण आहे म्हणणार्‍या अधिकार्‍यांना तसे असेल तर सीमेवर सशस्त्र पहारा द्यायला त्याला कसे पाठवले याचे उत्तर आधी द्यावे लागेल. निवृत्ती जवळ आल्याने त्याला पाठवले वगैरे थातुरमातूर स्पष्टीकरणे बीएसएफने दिलेली असली तरी त्यामुळे तक्रार ज्या मूळ विषयाबाबत आहे, त्याला काही बगल देता येणार नाही. आम्ही जवान पहाटे सहा ते संध्याकाळी पाच अशी अकरा – अकरा तास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, बर्फाळ वातावरणात, वादळा – पावसात सेवा बजावतो, पण आम्हाला अत्यंत अपुरे व निकृष्ट दर्जाचे जेवण आणि नाश्ता दिला जातो. त्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागते अशी तक्रार या जवानाने केली आहे. सतत दहा दिवस केवळ हळद आणि मीठ टाकलेली पातळ डाळ आणि रोटी हेच जेवण आणि पराठा आणि चहा हाच नाश्ता मिळत असल्याचेही यादव या व्हिडिओत सांगतो. हे जर खरे असेल तर जवानांसाठी पाठवली जाणारी कोट्यवधींची शिधासामुग्री जाते कुठे? ती अधिकारी हडप करतात की स्वयंपाकी खुल्या बाजारात विकतात? सीमा सुरक्षा दलातील भ्रष्टाचाराचे काही दाखले मध्यंतरी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात होणार्‍या घुसखोरीसंदर्भात उघडकीस आले होते. भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आणि जवानांच्या मेहरबानीने सीमेपलीकडून अमली पदार्थ कसे पाठवले जातात याचेही काही दाखले समोर आले होते. त्यामुळे लष्कर किंवा निमलष्करी दले म्हणजे सगळे काही पावित्र्याचे पुतळे असे मानण्याचे कारण नाही. लष्करामध्ये देखील अब्जावधींचे घोटाळे घडलेले आहेत. देशाचा माजी नौदलप्रमुख लाचखोरीच्या आरोपावरून सध्या तुरुंगात गेलेला आहे. त्यामुळे सैन्य दले असली तरी शेवटी नाना प्रकारच्या वृत्ती – प्रवृत्तीची ही माणसेच असल्याने देशाचा मानबिंदू असलेल्या सैन्यदलांना बदनाम करण्यास एखादा कुजका आंबा पुरेसा ठरतो. त्यामुळे खरोखरच सीमा सुरक्षा दलाच्या अन्नसामुग्रीची खुल्या बाजारात विक्री होत असेल तर त्यासंबंधी कठोर कारवाई झाली पाहिजे. सीमा सुरक्षा दल देशावर होणारे हल्ले सर्वप्रथम आपल्या छातीवर झेलत असते. अलीकडे असे तेवीस हल्ले बीएसएफने परतवले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या चौदा बटालियन आज सीमेची डोळ्यात तेल घालून अहोरात्र राखण करीत आहेत. या जवानांना खरोखरच अशा प्रकारचा निकृष्ट नाश्ता व जेवण दिले जात असेल, तर त्यासारखी कृतघ्नता दुसरी नसेल. जवानांचा फुका अभिमान भाषणांतून व्यक्त करण्यापेक्षा या जवानांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची आज खरी गरज आहे.