कुत्सित

  •  दत्ताराम प्रभू-साळगावकर

सर्वसाधारणपणे बोलणं किंवा सांगणं हे सरळ, स्वच्छ असावं. बोलण्याला अर्थ असतो, महत्त्व असतं व प्रसंगी पत्थ्यही असतं, नव्हे असावंच. शब्द उधळण्यासाठी नसतात.

बोलणं म्हणजे काय? जे आपण आपल्या मुखकमलातून उच्चारतो ते बोल; त्याला सांगणं म्हटलं तरी चालेल. बोलणं आणि सांगणं एकच. सर्वसाधारणपणे बोलणं किंवा सांगणं हे सरळ, स्वच्छ असावं. बोलण्याला अर्थ असतो, महत्त्व असतं व प्रसंगी पत्थ्यही असतं, नव्हे असावंच. शब्द उधळण्यासाठी नसतात.

बोलणं कसं असतं? काहींचं सरळ, उघड, प्रांजळ, खाचखळगे नसलेलं. शुद्ध पाण्याला रंग नसतो तसं! काहींचं सहज, म्हणजे मनात कसला विशिष्ट हेतू किंवा किंतू न बाळगता बोललेलं. काहींचं सरळच्या अगदी उलट म्हणजे वाकडं. त्यातून फक्त वाईटच अर्थ निघतात. काहींचं तोकडं म्हणजे अर्धवट, पूर्ण सांगायचं नाही, ऐकणार्‍यांनी काय ते समजावं. थोड्यांचं तिरकस म्हणजे टोचणारं. सरळ-वाकडं नसेल, तोकडंही नसेल. पण एक प्रकारच्या न दिसणार्‍या तीक्ष्ण बाणासारखं. या सगळ्या प्रकारात अतिशय वाईट, ते म्हणजे कुत्सित, कुजकं. त्याला एक प्रकारचा घाण ‘वास’ येतो. असलं बोलणं लागतं, टोचतं, अपमानकारक असतं. अशा सर्वप्रकारच्या बोलण्याचे अनुभव आपल्याला येत असतात, येत राहतात. स्वभावाचे असे अनेक पैलू असतात तसाच कुत्सितपणा हा पण एक पैलू आहे!

एक चारजणांची चौकडी होती. चारीजण जवळजवळ चार दिशांतून आलेले. प्रत्येकाचं खाणंपिणं, चालरीत काहीशी वेगवेगळी; पण चार ठिकाणांहून आलेले म्हणजे ‘चांडाळ-चौकडी’ निश्‍चितच नव्हती जरी लोकांना वाटत असली तरी! कधीकधी मी पण त्या चौकडीत सामील व्हायचो. त्यांची एक बसायची ठराविक जागा होती. त्याला ‘अड्डा’ म्हटलं तरी चालेल. ‘अड्डा’ हे नाव थोडंसं विचित्र; कारण ‘अड्डे’ हे विशिष्ट कामांसाठी असतात. पण यांचा अड्डा हा विरंगुळ्यासाठी, एकत्र येऊन मनोरंजनाच्या चार गप्पा मारण्यासाठी. कधीकधी त्यांच्या अड्‌ड्यावर एक इसम यायचा. बसून त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी नव्हे तर उभ्या-उभ्यानेच आपल्या ‘बाता’ मारण्यासाठी. मोठेपणा, मिजास, ‘मी’पण मिरविण्यासाठी. टाईमपास म्हणून त्याचं बोलणं ऐकून घेण्यासारखं. एके दिवशी आम्ही बसलेलो असताना तो हजर झाला. आमचं जेवणखाण या विषयावर बोलणं चाललं होतं. आपापसात बोलताना गोष्टी कुठच्या कुठे पोहोचतात. गप्पा संपवून उठायच्या वेळी आपण कशाची सुरुवात केली व शेवटी कशावर बोललो यावर विचार केला तर आपण कसेकसे वाहत गेलो त्याचा पत्ता लागेल. सुरुवातीचा विषय व शेवटचा विषय यांचा संबंधच नसतो. तर जेवणाचा विषय आल्यावर हा मिजासखोर गप्प कसा बसेल? म्हणाला, ‘मी आज दुपारी काय काय जेवलो ते सांगतो. आमचं जेवण नेहमीच मांसाहारी. बाबा समुद्रावर सकाळी फिरायला गेले होते. बरोबर त्याचवेळी मासेमारी करून आलेली होडी किनार्‍यावर आली. त्यातला मोठ्यातला मोठा विस्वण बाबानी उचलला. कृपा करून त्याची किंमत मात्र विचारू नका.’’

‘‘आम्ही कुठे विचारली किंमत?’’
‘‘विचारू नका एवढ्यासाठी की, ती तुमच्या जमाखर्चात बसणारी नाही. तुम्हारे बस की बात नहीं!’’ पुढे… ‘‘त्या विस्वणाची तळलेली कापं, काल रात्री माझ्या भावानं घरी येताना माशांच्या जेटीवरून आणलेले ताजे फडफडीत मासे रात्र झाली म्हणून फ्रीजमध्ये टाकलेले त्यांची आंबट-तिखट अशी आमटी, फ्रिजमध्ये कोळंबी होती, त्यांचं मसालेदार चमचमीत ‘सुकं’, गाजर-टोमॅटो कोशिंंबीर, ताज्या नारळाची जाडबरी सोलकडी. मुखशुद्धीसाठी थंडगार पुडिंग. सांगा, असलं जेवण कितीजणांच्या घरी असतं? तुमचं काय; रेड्यानी रांधलं व म्हशीनी खाल्लं असं (!)’’
आपला मोठेपणा गाताना दुसर्‍यांना कमीपणा देणं हाच कुत्सितपणा. रेड्यानी रांधलं व म्हशीनी खाल्लं असं म्हणायची गरज होती का?
असाच एक ‘हरामी’ मनुष्य होता. चांगला शिकलेला पण होता. फक्त दुसर्‍यांच्या कुचेष्टा, कुचाळक्या, त्यांना नावं ठेवणं याच्यातच समाधान. दुसर्‍यांबद्दल बोलताना त्यांचा उल्लेख त्यांच्या बापाच्या नावाने, भाषेवरून, गावावरून व तोही कुत्सितपणे करायचा. अजून त्याला सव्वाशेर भेटला नव्हता म्हणून माजला होता. गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो तर म्हणायचा, ‘ते वाजवतात की खाजवतात?’ असले संगीताचे कार्यक्रम आवडत नसतील तर जाऊच नये; मग त्यांनी वाजवू दे नाहीतर खाजवू दे! असा हा कुत्सितपणाचा कहर. एक संन्याशी वृत्तीचा मनुष्य होता. गावात फिरायचा. कोणाला कसला त्रास नाही; मुखी रामनाम. या कुत्सितानं त्याला एके दिवशी विचारलं, ‘‘तुम्ही संन्याशासारखे राहता, फिरता तर रानावनात जाऊन का राहात नाही?’’ त्यानं चोख उत्तर दिलं, ‘‘मी राहतो, फिरतो ते रानच व तुझ्यासारखे लोक हे त्या वनातले पशू!’’
तोंडात मारल्यागत गप्प बसला.

एक मनुष्य असा होता की त्याला कोणी ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’, नववर्षाच्या शुभेच्छा ‘हॅपी न्यू इयर’ म्हणून दिल्या तर त्याला ‘शेम टू यू’ म्हणून उत्तर द्यायचा. ‘सेम’च्या ऐवजी कुत्सितपणे ‘शेम’ असा शब्द वापरायचा. कारण काय तर म्हणे आम्हाला परदेशी, विशेषतः इंग्रजी शिष्टाचार नकोत. ‘सेम’च्या ऐवजी ‘शेम’ शब्द वापरणं हा निव्वळ कुत्सितपणाच.

अशा या लोकांना असला नष्टपणा करून काय मिळतं? मिळतं, जरूर मिळतं. असला मदांधपणा सर्वकाळ पचत नसतो कधीतरी जिरतोच; अपमानीतांचे शाप लागणारच. कारण ‘अति तेथे माती’ हा इशारा अजूनतरी कालबाह्य झालेला नाही!