ब्रेकिंग न्यूज़
कुडतरीतील तरुणी रिवणमध्ये मृतावस्थेत

कुडतरीतील तरुणी रिवणमध्ये मृतावस्थेत

>> खूनाच्या संशयावरून युवकास अटक

मायणा-कुडतरी येथील वेलन्सिया फर्नांडिस (वय ३०) या तरुणीचा अज्ञाताने गळा दाबून खून करून तिचा मृतदेह वाणशी-रिवण येथील निर्जन ठिकाणी झुडपात टाकून दिल्याने त्या भागात काल मोठी खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले असून पोलिसांनी संशयावरून शैलेश वेळीप (वय ३५) या रिवणमधील युवकास अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की मडगाव येथील एका आस्थापनात वेलन्सिया फर्नांडिस ही मायणा-कुडतरी येथील युवती कामास होती. गुरुवारी (दि. ६) ती संध्या. ६ वा. कामावरून घरी जाण्यास निघाली होती. आपण शॉपिंग करून घरी परतणार असल्याचे तिने घरच्यांना फोनवरून सांगितले होते. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी रात्री उशिरा मायणा-कुडतरी पोलिसांना ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. तिच्या मोबाईलवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही.
मात्र काल शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी ७.३० वा. वाणशी-रिवण येथील फातिमा हायस्कूलनजीक निर्जन ठिकाणी रस्त्याच्या बाजूला झुडपात एका तरुणीचा मृतदेह तेथून जाणार्‍यांना दिसून आला.

याविषयी केपे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून श्‍वानपथक आणून तपासकाम सुरू केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक सेराफीन डायस, निरीक्षक रॉय उपस्थित होते. आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वेलन्सियाच्या कुटुंबियांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली.