कुठ्ठाळी-वेर्णा महामार्ग रात्री ते सकाळपर्यंत बंद

कुठ्ठाळी-वेर्णा महामार्ग रात्री ते सकाळपर्यंत बंद

>> रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत वाहतुकीस निर्बंध

नव्या झुवारी पुलावर कमानी बसवण्याचे काम तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करता यावे यासाठी काल २४ जूनपासून कुठ्ठाळी ते वेर्णा या दरम्यानचा महामार्ग रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत कुठ्ठाळी ते वेर्णा दरम्यानचा महामार्ग रात्री ११ ते सकाळी ८ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी काल सांगितले.

रोज सकाळी ७ नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून रात्रौ ११ पर्यंत वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, रात्रौ ११ नंतर बंद करून सकाळी ७ पर्यंत बंद ठेवला जाईल. १५ ऑक्टोबरपर्यंत अशा प्रकारे हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने रात्रौ ११ नंतर प्रवास करणार्‍या वाहनांची प्रचंड गैरसोय होणार आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब आदींना अपवादात्मक प्रसंगी हा मार्ग खुला ठेवण्यात येईल.

टायटन जंक्शनकडून
वाहतूक वळवणार
वेर्णे येथील टायटन जंक्शनपासून वाहतूक वळवण्यात येणार असून ती एमईएस कॉलेज, झुवारीनगर, विमानतळ जंक्शन, दाबोळी चिखली जंक्शन, कुठ्ठाळी जंक्शन या मार्गाने नेण्यात येईल. केवळ रात्री ११ नंतरच ही वाहतूक वळवण्यात येईल. दिवसा मात्र वाहतूक सध्याच्याच मार्गाने चालू राहील. त्यामुळे गोमंतकीय नागरिकांना त्रास होणार नसल्याचे साबांखाने म्हटले आहे.

रुग्णवाहिका, अग्निशामक
दलासाठी महामार्ग खुला
रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब आदींना अपवादात्मक प्रसंगी हा मार्ग खुला ठेवण्यात येईल.