कुंदा

  •  पौर्णिमा केरकर

कुंदाचे कळे वर चढून काढायचे तर ते देवाचे थडगे! पाय कसा ठेवणार? त्याहीपेक्षा घरी जर कळले की मी थडग्यावरील फुले काढून माळली, तर मग मलाच भूतबाधा होईल या भीतीनेच तिथे जायला बंदी घातली जाईल. त्यामुळे कोणालाच मागमूस लागू न देता कधी दगडावर दगड ठेवून मी गरजेपुरते कळे काढून ते माळीत असे.

रानमोगरी, कुंदम, मालती, जंगली चमेली, कुना, माघ मलिका… अशा कितीतरी नावांनी लोकप्रिय असलेले फूल म्हणजे कुंदा! या फुलाला तर मी बालपणी ‘कुना’ याच नावाने ओळखायची. कुंदा आणि लांब कळ्यांची मोगरी या फुलात तसे बरेच साम्य आहे. फक्त मोगरीचा गंध सालंकृत, मन प्रसन्न करणारा. अगदी दुरूनही तो फुलला आहे याची जाणीव तिन्हीसांज झाली की पूर्वी घराघराला व्हायची. मोगरीसाठीचा मांडव हा घरच्या अंगणाची शोभा बनून सर्वांनाच तृप्ती द्यायचा.

मोगरी मुबलक मिळाली की मग बाकी कोणत्या फुलांची आठवण होत नसे. मोगरीचा वेल मांडवावर चढवता यायचा. पण कुनाचे तसे नाही. फांद्या जरी वेलीसदृश्य असल्या तरी त्या मोगरीच्या मानाने टणक. एकमेकांत गुंतत झुडूप बनून राहतात. पानांचा संभार तर एवढा भरगच्च की त्यातून फुललेली फुले काढणे तेवढेच कठीण होऊन जायचे. मोगरीची जागा ही घराचे खास आकर्षण असायचे. ते कळेसुद्धा तेवढेच निगुतीने काढले जायचे. आबाच्या अंगणातील मोगरी भरभरून फुलायची. ते कळे कधीतरी मला मिळतील माळायला, ही अंधुक आशा असायची. पण ते शक्य झाले नाही.

कळे घरातील आणि वाड्यावरील काही ठराविक महिलांना दिले जायचे. माझ्या वाट्याला मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी पडलेल्या फुलांचा सडा यायचा. पारिजात आणि मोगरी दोन्ही फुलं एकत्रित करून, त्यांच्या लांबलचक माळा करून त्या केसांत घालून दुधाची तहान ताकावर निभावून घेत असे. मोगरीचा सुवास जीवाला वेडं करायचा खरा, पण त्याची सहजपणे प्राप्ती मात्र बालपणी झाली नाही. या मोगरी फुलांची उणीव भरून काढली ती कुनाच्या कळ्यांनी.

हे झुडूप कोणी मुद्दामहून आपल्या अंगणात सौंदर्यवृद्धीसाठी लावले आहे असे चित्र काही दिसत नव्हते. उलट त्या झुडपाचा कुंपणासाठीच वापर जास्त केला जायचा. कुनाची झाडे मी खूप बघितली. त्यातील बरीचशी झुडपे ही कुंपण बनूनच वापरात यायची. देवपूजेला जर फुलांची कमतरता भासली तर मात्र ही फुले हमखास मदतीसाठी तत्पर असत. मला मात्र या फुलांचे अप्रूप नेहमीच वाटत आलेले आहे. कारण या फुलांनी मला मोगरीची लागलेली तहान भागवलेली आहे. बालपणात जेव्हा शेजार्‍यांच्या मांडवावर फुललेल्या मोगरी कळ्यांचा घमघमाट आमच्या घरापर्यंत पोहोचायचा तेव्हा मी त्या मांडवाखालून येरझार्‍या घालीत असे. सूपभर कळे बहरामुळे मिळायचे. घरातील महिला तर कळे फुलण्याअगोदरच त्याच्या फात्या
घालण्याच्या तयारीत असत. मला छोटीशी फाती मिळावी म्हणून फाती घालताना मी मदत करीत असे. पण त्या सर्वच फात्या वाड्यावरील, घरातील कोणाकोणाला द्यायच्या असत. लहान मुलांना त्याच्यात वाटाच नसे. अशावेळी मला साथ द्यायची ती कुना. लांब कळ्यांची मोगरीसारखीच दिसणारी पांढरीशुभ्र. कळे पानांच्या संभारात झुबक्यांनी यायचे. मोगरीचा सुगंध कुनाला नाही, मात्र कळ्यांची फाती करून माळल्यानंतर दुरून ती मोगरीच भासायची. कुनाचे झुडूप मी हेरून ठेवलेले होतेच. ते सर्वांना माहिती होतेच, पण सहजासहजी कोणीही त्यावरील कळे काढण्यास धजत नसत. कारण ज्या जागेवर हे झुडूप होते ती मुस्लिम पिराच्या थडग्याची जागा होती. आई न्हावयाची बाय, या थडग्यावर न चुकता तिन्हीसांजेला दिवा लावायची. बर्‍याच वेळा ही पणती लावण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात यायचे. त्यावेळेस माझी नजर या झुडपाकडे जायची. पण या झुडपाने स्वतःला थडग्यावर पसरून घेतलेले. कळे ऐन बहरात असलेले. डोळ्यांना दिसतात, पण खूप उंचीवर. हात काही पोहोचत नसे. वर चढून काढायचे तर ते देवाचे थडगे, त्यावर पाय कसा ठेवायचा हा गहन प्रश्न! त्याहीपेक्षा घरी जर कळले की मी थडग्यावरील फुले काढून माळली, तर मग मलाच भूतबाधा होईल या भीतीनेच तिथे जायला बंदी घातली जाईल. त्यापेक्षा घरी न सांगितलेच बरे असे ठरवून कोणालाच मागमूस लागू न देता कधी दगडावर दगड ठेवून तर कधी एखादी समवयीन मैत्रीणबरोबर असली की तिच्या पाठीवर चढून, नाहीतर हातात काठी घेऊन गरजेपुरते कळे काढून ते गुंफून माळीत असे. पिराच्या थडग्यासमोर जर मी पणती न चुकता लावते, तर मग त्या थडग्यावरील कळे काढून माळले तर भूतबाधा कशी होणार? या प्रश्नाचे उत्तर मी माझ्यापुरते शोधले होते. आणि कोणाला नकळत का असेना मी ते कळे काढून माळीत असे. मोगरीइतका नाही तरीही सौम्य सुगंध कुनाला यायचा.

मोगरी माळल्याचा आभास या फुलांनीच मला दिला. ते नितळ आनंदाचे क्षण मी नाही विसरू शकणार. आता वाढत्या वयाला कळून चुकले की कुनाची फुले आपल्या इथे जरी कडेकुशीला वाढणारी असली. कुंपणाची शोभा बनून राहिली. दगडांचा, कातळांचा, थडग्यांचा आधार घेत वाढू लागली तरीही देशाच्या काही प्रदेशात मात्र तिला मोठा सन्मान आहे. मणिपूर या नॉर्थइस्टकडच्या राज्यात या फुलाला वधूच्या बाजूने महत्त्वाचा मान दिला जातो. वधूच्या गळ्यातील हारात ही कुनाची फुले गुंफली जातात. लग्नात ही फुले इथले लोकजीवन अपरिहार्य मानते. ही फुले भगवान विष्णूची आवडती फुले आहेत असेही सांगितले जाते. ती जगातील विविध देशांत आढळतात. वैशिष्ट्यपूर्ण नावांनी तिला ओळखतात. आपल्या देशात तर तिची नावे प्रदेशपरत्वे बदलतात. लांब कळ्यांची कस्तुरी मोगरी तशीच ही कस्तुरी मल्लिका. तिचं असं खूप देखणं रूप मला उशिरानेच समजलं. लग्नानंतर मोगरी मनमुराद माळली. केसही दिसणार नाहीत एवढा गंधभार होता तो. स्वयंपाकघरात असताना माईच्या घराचा दुरिग दिसायचा. त्यावर दाटीवाटीने कुनाचे झुडूप वाढलेले. ते अस्ताव्यस्त पसरले होते. त्यावर ही माघ मालिका प्रसन्न हसताना दिसायची. यावेळी केसांत मोगरी आणि समोर कुना-कुंदम मल्लिकाशुभ्र कळ्या. एखाद्या तरुणीच्या दंतपंक्ती जर अशा सुंदर दिसल्या की त्यांना कुंदकळ्या म्हणून संबोधित केले जायचे. आजही या कुंदकळ्या हसत हसत स्वागताला सज्ज असतात. माईच्या घराचा दुरिग आता सिमेंट-कॉंक्रीटचा झाला.

साहजिकच कुंदकळ्या कोमेजल्या. कुनाची बालपणातली थडग्याची जागा अनुभवते. तिथे कुना कोठेच दिसत नाही. थडग्यावर गवताचे आवरण आले. थडगे दिसत नाही. बालपणातल्या आठवणी ज्या-ज्या जागांना जखडून होत्या त्या सगळ्याच कशा विस्मृतीत जात आहेत.
ही खंत मनाला सतावते खरी पण या कस्तुरी मालिकेचे विलोभनीय प्रसन्न हात्स्य खंतावाल्या जीवाला नवा उत्साह पुरविते.