ब्रेकिंग न्यूज़

कुंकळ्येकर, वेलिंगकर यांचे उमेदवारी अर्ज

>> पणजी विधानसभा पोटनिवडणूक

गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज येथील निवडणूक अधिकार्‍यांकडे काल सादर केले. पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे बाबुश मोन्सेर्रात, आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. पोट निवडणुकीसाठी एकूण १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

उमेदवारांच्या अर्जांची छाननी दि. ३० एप्रिल रोजी केली जाणार आहे. २ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे. पोट निवडणुकीसाठी १९ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार कुंकळ्येकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री नीलेश काब्राल, उत्पल पर्रीकर व इतरांची उपस्थिती होती. भाजपचे कुंकळ्येकर यांनी उमेदवारी सादर करण्यापूर्वी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी गोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवारीवरून मतभेद
नाहीत : कुंकळ्येकर
उमेदवारीवरून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उत्पल पर्रीकर आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी कार्यरत झाले आहेत, असे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले. पणजीतील मतदारांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सकारात्मक कौल दिला होता. पणजीतील मतदार गेली २५ वर्षे भाजपवर विश्वास ठेवत आहेत. यापुढेही मतदारांचे सहकार्य लाभेल असे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

वेलिंगकरांच्या उमेदवारीचा
परिणाम नाही : मुख्यमंत्री
गोसुमंचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्या उमेदवारीचा भाजपच्या मताधिक्यावर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपचे उमेदवार कुंकळ्येकर गतनिवडणुकीच्या तुलनेत दुप्पट मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

राजकारण शुद्ध करण्यासाठी
रिंगणात : सुभाष वेलिंगकर
गोव्यातील राजकारण भ्रष्टाचार, गैरव्यवहारमुळे गलिच्छ बनले आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे, असा दावा गोसुमंचे पक्षप्रमुख वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पणजीत भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.