किशोरवयीन मुला-मुलींची वाढ व विकास…

0
2871

– डॉ. सुषमा कीर्तनी, नवजात, बालक व किशोर तज्ज्ञ, मळा, पणजी

टीन एजर्स किंवा किशोरवयीन ही संज्ञा १० ते १९ वर्षांपर्यंतच्या वयातील मुला-मुलींसाठी वापरली जाते. ग्रीक शब्द ‘ऍडोलेसियर’ या शब्दापासून हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे वाढ होणे किंवा विकास होणे. यामध्ये मुलामुलींच्या शरीराच्या आकारात, शरीर रचनेत तसेच मानसिक आणि सामाजिक क्रियांत गतीने बदल होत असतात.

किशोरवय तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना सुरू होतं. याच वेळेस दुसरे लैंगिक अवयवांचा विकास होतो. किशोरवय हे तीन भागांमध्ये विभागले जाते… सुरुवातीची, मध्यम आणि उशिरा (अर्ली, मिडल आणि लेट) किशोरवय! सुरुवातीचे १० ते १३ वर्षे, मध्यम १४ ते १६ वर्षे आणि उशिरा म्हणजे १७ ते १९ वर्षे. आपल्या देशात किशोरवयीनांचे प्रमाण २२% आहे. हे खरोखर प्रचंड प्रमाण आहे. बालरोगतज्ज्ञांच्या दृष्टीने ही किशोरवयीन मुले कोणत्याच जगात बसत नाहीत… ‘‘नो मॅन्स लँड’’ म्हणजे बालरोग विभाग आणि प्रौढ वैद्यकशास्त्र.
किशोरवयीनांची वाढ आणि विकास यांची व्याख्या खालील गोष्टींमध्ये करता येईल…
१. शारीरिक वाढ, २. शरीररचनात्मक वाढ (फिजिॉलॉजिकल), ३. लैंगिक वाढ, ४. सामाजिक विकास आणि ५. ज्ञान आणि शैक्षणिक विकास.
मुलींचे तारुण्य लवकर सुरू होते. स्तनांच्या विकासाबरोबर त्यांचे वयात येणे सुरू होते. बर्‍याच माता आपल्या मुलींना एका स्तनामध्ये वेदना होते किंवा सूज आहे म्हणून डॉक्टरांकडे घेऊन येतात. हीच तारुण्याची सुरुवात होण्याची खूण आहे. मुलींची उंची वाढण्यास ९ व्या वर्षापासून सुरुवात होते व दर वर्षाला त्यांची जवळपास ८ ते ९ सेंटीमीटर उंची वाढते. मुलांची उंची त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षांपासून सुरू होते आणि ती १८ वर्षांपर्यंत वाढते. उंची ही पहिले हात आणि पावलांपासून सुरू होऊन, नंतर दंड आणि पोटर्‍या आणि नंतर कंबर आणि छाती अशा क्रमाने वाढते. ही अनियमित होणारी वाढ किशोरांना बेडौल रूप देते. किशोरवयीनांची वाढ १५ ते २० टक्क्यांनी त्या काळात वाढते. वजन तर दुप्पट होते, जवळपास ४०% वाढते. इस्ट्रोजन हे वाढीसाठी उत्तेजक संप्रेरक (हॉर्मोन) असल्यामुळे मुलींमध्ये ही वाढ लवकर सुरू होते. हेच सर्व बदल मुलांमध्ये घडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टेस्टरोन मुलांच्या शरीरात साठू द्यावे लागते, म्हणून त्यांची वाढ थोडी उशिरा दिसू लागते.
किशोरवयाच्या सुरुवातीच्या काळात सिबॅशिअस ग्रंथी (घामाच्या ग्रंथी) उत्तेजित होतात म्हणून त्या काळात मुरूम किंवा पिम्पल्स येतात. यावेळी लॅरीन्क्स, फॅरीन्क्स आणि फुफ्फुसांची गतीने वाढ होते त्यामुळे मुलांच्या आवाजातही फरक पडतो, थोडा घोगरा, किंवा जाड होतो म्हणजेच आवाज फुटतो, असे म्हणतात. हृदयाच्या आकारातही वाढ होते, रक्तदाब वाढतो. चयापचय क्रियेचा (बेसिक मेटॅबोलिक रेट) दरही वाढतो. हिमोग्लोबीन आणि रक्ताचे प्रमाणही वाढते. तसेच दुसरे लैंगिक वैशिष्ट्ये म्हणजे मुलांच्या दाढी व मिशीवरील केसांची वाढ होते, मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते, पुरुषांचे जननेंद्रिय वाढते व काखेमध्ये केस वाढू लागतात, चेहर्‍यावरील केस वाढतात व घामाच्या ग्रंथी क्रियाशील होऊन चेहर्‍यावर मुरूम येऊ लागतात.
किशोरवयीन मुलांना त्यांची एक स्वतंत्र ओळख बनवाविशी वाटते. आपण कोण आहोत… हे समाजाला दाखवण्याची जणू स्पर्धाच त्यांच्यात सुरू असते. ते आपल्या कुटुंबाशी जुळलेले राहू इच्छितात आणि त्याच वेळेस आपली स्वतःची ओळखही निर्माण करण्यास धडपडत असतात. जेव्हा त्यांच्या किशोरवयाची सुरुवात असते तेव्हा ते आपल्या शारीरिक बदलांचाच विचार करीत असतात. ते आपल्याच लिंगाच्या व्यक्तींसोबत आरामात राहू शकतात. याच वेळी पालकांपेक्षा मित्र त्यांना जवळचे वाटतात. जेव्हा ते १४ वर्षांचे होतात आणि मध्यम किशोरवयात पोहोचतात, ते आपल्या वाढ झालेल्या नवीन शरीरासोबत आरामात असतात. त्यांचे मूड (मनःस्थिती) क्षणाक्षणाला बदलतात, ते दिवास्वप्न पाहण्यातच दंग राहतात, त्यांच्या झोपण्याच्या सवयी, तसेच जास्त करून खाण्याच्या सवयी बदलतात आणि याच गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये आणि पालकांमध्ये संघर्ष निर्माण होतो. पालकसुद्धा त्यांच्या वागण्यामुळे चिंतीत असतात. ही मुले खूपच आत्मकेंद्री बनतात आणि त्यांचे विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दलचे आकर्षणही वाढते. लैंगिक प्रयोग, ड्रग्ज, दारूचे व्यसन, वाहन गतीने चालवणे, रात्र-रात्रभर बाहेर राहणे, दादागिरी करणे इत्यादी गोष्टींत वाढ होते.
उशिराच्या किशोरवयात मुलं जास्त ध्येयावर लक्ष्य केंद्रित करतात आणि कुटुंबापासून स्वतंत्र होतात. लैंगिकता, शरीर प्रतिमा आणि लिंगभेद हे ठळकपणे समोर येतात.
किशोरवयीनांमध्ये निर्माण होणार्‍या प्रमुख समस्या- मुलींमध्ये – १. अकाली प्रौढता (प्रिकॉशस प्युबर्टी) –
म्हणजे दुसर्‍या लैंगिक गुणधर्मांची वाढ वयाच्या ८ व्या वर्षाच्या आधीच होणे.
२. मासिक पाळीची अनियमितता –
अ) मासिक पाळी न येणे.
ब) मासिक पाळीच्या वेळी वेदना असणे.
क) मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव जाणे.
३. स्तनांच्या तक्रारी –
अ) लहान स्तन, ब) स्तन लहान-मोठे असणे आणि
क) स्तनाग्रांमधून स्राव बाहेर येणे.
मुलांमध्ये – १. अकाली प्रौढत्व, २. प्रौढत्व लांबणे आणि ३. स्तन मोठे होणे किंवा गायनॅकोमास्टिया.
किशोरवयीनांचा आहार ः-
योग्य आणि पौष्टीक आहार किशोरवयीन मुला-मुलींच्या जीवनासाठी, शारीरिक वाढीसाठी, मानसिक विकास आणि आरोग्यासाठी आणि चांगल्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असतो. गतीने होणारी वाढ ही आहाराची जास्त मागणी करत असते. अयोग्य आहारामुळे वाढ खुंटते आणि लैंगिक परिपक्वताही होत नाही. मुलींमध्ये तर याचे संपूर्ण भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त स्निग्ध पदार्थांविषयी आवड निर्माण होते व शारीरिक व्यायाम कमी होतो ज्यामुळे पुढे स्थूलता येऊन विविध रोगांना जसे मधुमेह, उच्चरक्तचाप, कोलोन कॅन्सर आणि लकवा(स्ट्रोक) आमंत्रण मिळते. जागतिक स्तरावर स्थूलता ही एक समस्या आहे. स्थूल बालक हा स्थूल तरूण असतो आणि नंतर स्थूल प्रौढ असतो. भारतात स्थूल बालकांचेे प्रमाण ५.६ ते २४% इतके आहे. स्थूल तरूणांमध्ये पुढे मानसिक व सामाजिक समस्या निर्माण होतात जसे न्यूनगंड, नैराश्य, चिंता आणि वैद्यकीय दुष्परिणाम जसे उच्च कोलेस्ट्रॉल, करोनरी वाहिन्यांचे रोग, आमवात आणि अवेळी मृत्यू.
मुलांना १० ते १२ वर्षाच्या वयात २४०० ऊष्मांकांची गरज असते व ती १५ व्या वर्षापर्यंत २६०० इतकी होते व १८व्या वर्षापर्यंत २८०० कॅलरीज होते.
जेव्हा की त्याच वयाच्या मुलींना २२००, २३०० आणि २२०० उष्मांकांची अनुक्रमे गरज असते. तसेच या वयात प्रथिने, लोह आणि कॅल्शिअमची आवश्यकताही जास्त प्रमाणात असते. मुलींमध्ये जास्त प्रमाणात मासिक पाळीचा स्राव होत असल्यामुळे प्रत्येक महिन्यात लोहाची गरज वाढत जाते म्हणजेच दर दिवसाला १५ ग्रॅम लोहाची गरज असते.
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये डाएटचे फॅड असते. कधी ते क्रॅश डाएट, कधी फक्त स्नॅक्स तर कधी फूड फॅड असे सुरू असते. नाश्ता चुकविण्याची मनःस्थिती जास्त असते. मुली जास्त जेवणं चुकविण्याची शक्यता असते. जंक फूड खाण्याची फॅशन जास्त आहे ज्यामध्ये पौष्टीक अन्न कमी खाण्यात येते. तरुण मुले-मुली फळांचे रस जास्त प्रमाणात सेवन करतात ज्यामध्ये साखरेचे परिणाम जास्त असते. म्हणून पालकांनी या मुला-मुलींच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवे. तसेच या वयात स्लिम अँड ट्रीम राहण्याचे फॅड मुलींमध्ये जास्त प्रमाणात असते. आपण जाड तर होणार नाही ना म्हणून मुली जेवण घेण्याचे टाळत असतात. पण त्यामुळे पुढे त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच वयाची ही वर्षे आईवडील तसेच मुला-मुलींकरिता चिंतेचीच असतात.
क्रमशः