किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडमुळे अडथळे ः पर्यटनमंत्री

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली गोव्याला पर्यटनासंबंधीची साधनसुविधा उभारण्यासाठी २०० कोटी रु. एवढा निधी मिळालेला आहे. मात्र, सीआरझेडकडून राज्यातील किनार्‍यांवर शौचालये, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, लॉकर्स आदी साधनसुविधा उभारण्यासाठी ना हरकत दाखला मिळत नसल्याने राज्यातील किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास अडथळे येत असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल विधानसभेत दिली.

स्वदेश दर्शन योजनेखाली कोणकोणत्या किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडने ना हरकत दाखले दिले आहेत, असा सवाल आमदार विल्फ्रेड डिसा यांनी केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना कांदोळी, कळंगुट आदी सोडल्यास अन्य कुठल्याही किनार्‍यावर अशी कामे करण्यास सीआरझेडने ना हरकत दाखला दिलेला नाही. त्यामुळे वरील दोन्ही किनारे सोडल्यास अन्य ठिकाणी साधनसुविधा उभारणे शक्य झाले नसल्याचे आजगावकर यांनी नजरेस आणून दिले.

यावेळी बोलताना आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले, की सीआरझेड व राष्ट्रीय हरित लवाद हात धुवून गोव्याच्या मागे लागले आहेत. अन्य राज्यांना परवाने मिळतात. गोव्याला मात्र मिळत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की गोव्यात ३ हजार बिगर सरकारी संघटना आहेत. गोवा सरकारने कोणतीही विकासकामे करण्याचा निर्णय घेतला की या संघटना विरोध करून ही विकासकामे बंद पाडतात. किनार्‍यांवर पर्यटकांसाठी ज्या साधनसुविधा हव्या आहेत त्या उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.