ब्रेकिंग न्यूज़

किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण आराखड्याच्या मसुद्यावर जनसुनावणी

>> ७ जुलैला ताळगाव व फातोर्ड्यात सुनावणी

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे (जीसीझेंडएमए) किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याच्या (सीझेंडएमपी) मसुद्यावर येत्या ७ जुलै रोजी जिल्हा पातळीवर पणजी व मडगाव येथे जन सुनावणी घेतली जाणार आहे. नागरिकांनी या आराखड्याच्या मसुद्याबाबत येत्या ३० दिवसात सूचना, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जीसीझेडएमएचे सदस्य सचिव रवी झा यांनी केले आहे.

७ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ यावेळेत दोन्ही ठिकाणी जन सुनावणी घेतली जाणार आहे. उत्तर गोव्यातील जन सुनावणी ताळगाव येथील सामाजिक सभागृहात आणि दक्षिण गोव्यातील जन सुनावणी फातोर्डा मडगाव येथील रवींद्र भवनात घेतली जाणार आहे.

चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने सीआरझेड अधिसूचना २०११ च्या नुसार गोव्यातील किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. संस्थेने हा मसुदा राज्य सरकारला सादर केला असून राज्य सरकारने किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविला आहे. जीसीझेडएमएच्या ६ जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या २०३ व्या बैठकीत या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना, आक्षेप जाणून घेणे तसेच जन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी हा संपूर्ण मसुदा प्राधिकरणाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालये, उपजिल्हाधिकारी कार्यालयात, तालुका आणि संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच, पेडणे, म्हापसा, साखळी, मुरगाव, कुडचडे, कुंकळ्ळी, काणकोण येथील नगरपालिकांच्या मुख्याधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे. या मसुद्यासंबंधी नागरिकांनी ३० दिवसात सूचना, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.