ब्रेकिंग न्यूज़

काश्मीरात गोळीबाराच्या वृत्तांचे पोलिसांकडून खंडन

काश्मीर खोर्‍यात गोळीबाराच्या घटना घडल्याच्या काही प्रसार माध्यमांनी प्रसृत केलेल्या वृत्तांचे जम्मू काश्मीर पोलिसांनी काल खंडन केले. तसेच अशा खोडसाळ व हेतूप्रेरीत वृत्तांवर लोकांनी विश्‍वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी वरील आवाहन करताना स्पष्ट केले की गेल्या सहा दिवसात पोलिसांना एकसुध्दा गोळी झाडावी लागलेली नाही. जम्मूतील १० जिल्ह्यांमध्ये मोकळे वातावरण असून कोणतेही निर्बंध तेथे लागू नाहीत. जम्मूतील फक्त ५ गावांमध्ये काही निर्बंध आहेत. तेही लवकरच हटवले जातील. पोलीस महानिरीक्षक एस. पी. पानी यांनी एक व्हिडिओ संदेशात काश्मीर खोर्‍यात गोळीबाराच्या घटनांचे काही विदेशी माध्यमांनी दिलेले वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.