ब्रेकिंग न्यूज़

कालिदासप्रतिभेचा मानदंड ः मेघदूत

  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

‘मेघदूत’ हे काव्य हा कालिदासप्रतिभेचा मानदंड आहे. कारण येथे त्याच्या प्रतिभाधर्माचे सर्व पैलू फुली फुलून आलेले आहेत. ‘मेघदूत’मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’चा संदर्भ मनात बाळगून कालिदासाच्या स्मरणयात्रेचा तो क्षण मानावा यात त्याच्या प्रतिभेची महत्ता अधोरेखित होते.

भारतीय काव्यसृष्टीतील कालिदासाच्या प्रतिभेची महत्ता आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्वसूरींनी समर्पकपणे ती अधोरेखित केलेली आहे. ‘उपमा कालिदासस्य’ असे जे म्हटले गेले आहे ते सार्थ आहे. त्याच्या उपमासौंदर्याला उपमा नाही हेच खरे. ‘प्रसन्नराघव’कर्ते जयदेव यांनी ते अधिक साक्षेपाने आणि अधिक नीटसपणे सांगितले आहे ः
यस्याश्चोरश्चिकुर निकुरः कर्णपूरो मयुरो|
भासो हासः कविकुलगुरुः कालिदासो विलासः|
हर्षो हर्षो हृदयवसतिः पञ्चबाणस्तुबाणः|
केषां नैषा कथय कविताकामिनी कौतुकाय॥
‘कविकुलगुरू कालिदास हा कविताकामिनीचा विलास आहे’ हे जयदेवाचे अवतरण भारतीय मनाने शिरोधार्य मानलेले आहे; शिवाय त्याच्या प्रतिभेला विश्‍वमान्यता लाभलेली आहे. ‘मालविकाग्निमित्रम्’, ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ ही त्याची तीन नाटके. ‘कुमारसंभवम्’ आणि ‘रघुवंश’ ही त्याची महाकाव्ये, तसेच ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ ही खंडकाव्ये त्याने लिहिली. पण ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ यांना रूढार्थाने ‘खंडकाव्ये’ ही संज्ञा देता येणार नाही. त्यांतील कथानकापेक्षा भावकाव्याची वीणच प्रामुख्याने नजरेत भरते. वैविध्यपूर्ण विभ्रमांचे हे सप्तरंगी इंद्रधनुष्य कालिदासाने निर्माण केले. ते अक्षय सौंदर्याचे आनंदनिधान आहे. कालिदासाने ‘कुमारसंभवा’च्या प्रारंभी हिमालयाचे वर्णन तन्मयतेने करताना त्याला पृथ्वीचा मानदंड म्हटले आहे. हे विधान स्वीकारून कालिदास हा भारतीय प्रतिभेचा मानदंड म्हणता येईल. त्यातही पुन्हा ‘मेघदूत’ हे काव्य हा कालिदासप्रतिभेचा मानदंड आहे. कारण येथे त्याच्या प्रतिभाधर्माचे सर्व पैलू फुली फुलून आलेले आहेत. ‘मेघदूत’मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’चा संदर्भ मनात बाळगून कालिदासाच्या स्मरणयात्रेचा तो क्षण मानावा यात त्याच्या प्रतिभेची महत्ता अधोरेखित होते.
‘मेघदूत’सारख्या उन्मेषशालिनी रूप प्रकट केलेल्या आणि अष्टांगांनी मोहरून आलेल्या काव्याविषयी नव्याने काय सांगावे असा मोठा प्रश्‍न पडतो. अनेकांनी समर्थपणे ते शतकानुशतकांपासून सांगून टाकलेले आहे. आपापल्या परीने त्याचा अर्थानुवाद आणि भावानुवाद करून कालिदासाचे ओथंबून आलेले भावजल आपल्या ओंजळीत घातलेले आहे. जे मुळातून सुंदर आहे त्यातील सौंदर्यस्थळे कशी शोधावीत?
रवींद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ बंधू द्विजेंद्रनाथ टागोर यांनी ‘मेघदूत’चा अनुवाद केला. खुद्द रवींद्रनाथांनी ‘मेघदूत’ ही भावपूर्ण कविता लिहिली. अन्य भारतीय भाषांत त्याचे कितीतरी अनुवाद झाले आहेत याची गणतीच करता येणार नाही. सहजगत्या हाती आलेल्या एका प्रातिनिधिक संहितेचा इथे उल्लेख करावा लागेल. ए. एल. संचोती यांनी ‘सर्वभाषाकालिदासीयम्’ हे पुस्तक जोधपूरहून संपादित केले आहे. यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बांगला, ओरिया, आसामी, मणिपुरी, सिंधी, उर्दू, पंजाबी आणि काश्मिरी या बारा भारतीय भाषांतून झालेले ‘मेघदूत’चे अनुवाद संकलित करण्यात आले आहेत. भाषाभगिनींच्या एकात्मतेचे कार्य यातून घडलेले आहे. मराठीत या दृष्टीने झालेले प्रयत्न तर लक्षणीय स्वरुपाचे आहेत. विस्ताराने मांडण्याचा तो विषय होईल. पण काहींचा उल्लेख करावा लागेल. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेल्या अनुवादापासून लोखंडे, दाढे, नानासाहेब गोरे, चिंतामणराव देशमुख, वसंतराव पटवर्धन, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर व शांता शेळके यांनी केलेल्या अनुवादांचा संदर्भ येथे मनात बाळगावा लागतो. कविवर्य वसंत बापट यांनी रसिल्या मनाने केलेला ‘मेघहृद’ हा भावानुवाद आठवावा.

असे कोणते रहस्य दडले आहे ‘मेघदूत’ काव्यात? सर्वांनाच त्याविषयी आकर्षण का वाटावे? पण काव्यातील कथानक तसे छोटेसेच. कुबेराचा सेवक असलेला यक्ष… त्याच्या सेवेमध्ये घडलेला प्रमाद…. त्याबद्दल त्याला प्रियेपासून घडलेला वर्षभर दुःखद विरह… सीतेच्या स्नानाने पावन झालेल्या जलाशयाच्या काठाशी आणि रामगिरी पर्वताच्या घनच्छायेत त्याने केलेला निवास आणि सहृदय मेघाच्या करवी त्याने आपल्या प्रियेपर्यंत पोचवलेला उत्कंठायुक्त संदेश याभोवती ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ या दोन भागांत हे काव्यकथानक गुंफलेले आहे… शृंगार हा त्यातील रस आहे… त्याचा परमोत्कर्ष इथे झालेला आहे… संभोग शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
मानवी संवेदना आणि निसर्गानुभूती यांची गळामिठी पडलेल्या या अम्लान काव्याकडे आज अनेक दृष्टिकोनातून पाहता येते. भिन्न भिन्न अभिरुची असलेले रसिक अनेक अर्थवलये त्यात पाहू शकतात… सशक्त शृंगारानुभूतीची अनुपम रूपकळा या काव्यात आहे. पण ही झाली एक बाजू… कालिदास रसज्ञ आहे, तसाच तो व्युत्पन्न आहे. त्याची भारतीयत्वाची मांड पक्की आहे. इवल्याशा कथानकाला कालिदासाच्या प्रतिभेचा स्पर्श होताच त्यातून आगळे-वेगळे स्फुरण निर्माण झाले आहे. या प्रेमकथेला दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा अशी अंतःप्रेरणा झाल्यामुळे पार्थिवतेच्या धरातलापासून अपार्थिवतेच्या आसमंतापर्यंत ती त्याने भिडवली आहे. यानिमित्ताने भारतीय भूप्रदेशाची परिक्रमा त्याने घडवून आणली आहे. सांस्कृतिक संचिताचा पैस त्याने समर्थपणे उलगडून दाखविला आहे.
प्रारंभीच कालिदासाने यक्षाच्या भावस्थितीचे वर्णन करताना त्याच्या क्लेशदायी अनुभूतीची पार्श्‍वभूमी विशद केली आहे.
कश्चित्कान्ता विरह गुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः|
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु॥
आषाढाच्या पहिल्या दिवशी तटभिंतीवर क्रीडातुर हत्ती टक्कर देण्यासाठी ठाकावा त्याप्रमाणे श्यामवर्णीय मेघ हिमशिखरावर वाकलेला आहे. या पर्युत्सुक क्षणी यक्षाची स्थिती कशी व्हावी? सखीच्या विरहामुळे तो कृश तर झालेलाच आहे. त्याच्या हातून सुवर्णकंकणे गळण्याच्या बेतात आहेत. तो भावव्याकुळ झालेला आहे. कालिदासाने त्याचे वर्णन केले आहे ः
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः|
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥
अमोघ शब्दकळा, अर्थसघनता आणि भावपूर्णता याचा त्रिपुटीसंगम या काव्यशिल्पात झालेला आहे. किंवहुना ‘मेघदूत’मध्ये जागोजागी तो आढळतो. त्या विश्रब्ध स्थळी थबकून पाहावेसे वाटते.
कौतुक आणि कुतूहल मनात जागवीत, कष्टी मनाने आसवे रोधीत यक्षाने मेघाकडे दृष्टी फेकली. मीलनाचे सुख अनुभवणार्‍यांनादेखील मेघाच्या दर्शनाने हुरहूर लागते. मग कंठाशी विळखा घालायला उत्सुक असलेल्या यक्षाची अवस्था काय झाली असेल बरे? पात्रांच्या मनात प्रवेश करून त्यांच्या भावना आणि संवेदना समजून घेण्याचे कालिदासाचे सामर्थ्य या शब्दांत आढळते ः
तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतो-
रत्नर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यो|
मेघालोके भवति सुखिनोऽ प्यन्यथावृत्ति चेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनी जने किं पुनर्दूरसंस्थे
श्रावण जवळ येताच आपली प्रिया आपल्या समीप असावी म्हणून मेघातर्फे आपल्या प्रियेला आपले कुशल कळवावे असा संकल्प यक्षाने केला आणि कुड्याची फुले वाहून प्रसन्न चित्ताने त्याने ती मेघाला वाहिली. मेघ आणि माणूस यांमधील फरक सांगून कामार्त माणसे कशी वागतात याचे चित्र कालिदासाने मोठ्या कौशल्याने रेखाटले आहे.
धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः
संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः|
मेघाची जन्मकहाणी सांगून अनेक रूपं धारण करण्याच्या त्याच्या शक्तीविषयी यक्षाने मुक्तकंठाने स्तुती केली आहे. ‘तापलेल्या जिवाची विरहव्यथा नाहीशी करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये असल्यामुळे माझा निरोप तू माझ्या सखीला कळव. शिवमस्तकी चंद्रकलेचे आल्हाददायी चांदणे जिथे विलसते त्या यक्षांच्या अलकानगरीत त्यासाठी जावे लागेल,’ असो तो सांगतो. वाट काढीत जात असताना माझी पत्नी एक एक दिवस मोजत काळ कंठीत थकलेल्या अवस्थेत दिसेल. स्त्रीहृदये ही जात्याच फुलाहून कोमल. परंतु विरहावस्थेतदेखील त्यांच्या हृदयातील आशातंतू बळकट असतो असे तो सांगतो. कालिदासाने हे वर्णन पुढील शब्दांत केले आहे ः
तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नी-
मव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यति भ्रातृजायाम्
आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशो ह्यङ्‌गनानां
सद्यःपाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्धि॥
त्यानंतरचे वर्णन त्याहून मोहक आहे. घनाच्या मनात नवे आशांकुर निर्माण करणारे आहे ः
मन्दं मन्दं नुदति पवनश्वानुकूलो यथा त्वां
वामश्वायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः|
गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः
सेविष्यते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः|
‘मंद मंद वारे तुला वाहून नेतील… अतिशय प्रेमाने जिवाचा सखा होऊन चातक डावीकडून येऊन तुला जवळ घेऊन गायला लागेल… गर्भाधानक्षण आठवून बगळ्यांच्या माळा आकाशात एकत्र येतील. नयनमनोहर रूपात असलेल्या तुला पाहून तत्परतेने तुझ्या सेवेसाठी हजर होतील.’
‘जिथे उतरणीवर श्रीरामाची वंदनीय पावले उमटली, तो पर्वतसखा भेटला असता त्याला पहिले आलिंगन दे. दीर्घ स्वरुपाच्या विरहानंतर मित्रभेटीचा हा दृद्य सोहळा अनुभवताना उष्ण आसवे गाळून तो आपल्या मनीचा प्रगाढ भाव व्यक्त करील.
हे मेघा, सोयीचा प्रयाणाचा मार्ग तुला आता सांगतो. ऐकण्यास योग्य असा निरोप तुला मागाहून सांगतो. जाता जाता ज्यावेळी तू दमशील तेव्हा तू गिरिशिखरांवर काही क्षण विश्रांती घे. विमल झर्‍यांचे पाणी पी.’
वाटेवरच्या रमणीय स्थळांची क्रमाक्रमाने यक्ष ओळख करून देतो. कालिदासाने केलेली ही मूळ वर्णने अतिशय वाचनीय आहेत. पूर्वमेघातील १८. छन्नोपान्त मुहूर्तं| २०. तस्यास्तिक्तै वनगजमदैर्वासितं वान्तवृष्टि| २१. मीपं दृष्द्वा हरितकपिशं केसरैरर्धरूढै| २३. पाण्डुच्छायोपवनवृतयः कैतकैः सूचिभिन्नै- २५. नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो- २६. विश्रान्तः सन्व्रजवननदीतीरजातानि निञ्च- या श्‍लोकांतील निसर्गवर्णने म्हणजे कालिदासाने सौंदर्यदृष्टीने टिपलेली क्षणचित्रे होत. त्याच्या उपमासौंदर्याचा येथे पदोपदी प्रत्यय येतो. शब्दन्यासाचे वैभव तितकेच विलोभनीय आहे.

उत्तरेकडे वळल्यावर उज्जयिनी नगरीचे वैभव कसे दिसेल याचे चित्र कालिदासाने रेखाटले आहे. तेथील नयनमनोहर सौध, पौरजनांच्या सुंदर ललना आणि त्यांचे चंचल कटाक्ष यांचेही वर्णन त्याने केले आहे. यांतील एक अप्रतिम श्‍लोक येथे उद्धृत करावासा वाटतो ः
वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः
निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु॥
– लाटा उठतात, पक्षी किलबिलतात, मेखलाच किंचित ढळवून जळात भोवरा निर्माण करील. छे! निर्विन्ध्या नदी आपल्या नाभीचे दर्शन घडवील. कामातुर त्या सरितेवर किंचित लवून रससेवन करील. रमणींचे लाडिक विभ्रम हे प्रणयाचे पहिले आश्‍वासन असते. उत्तरोत्तर चढत्या श्रेणीने प्रणयानुभूती प्रकट करणारी क्षणचित्रे कालिदासाने रंगविली आहेत. त्यांतील कोणती घ्यावीत आणि कोणती वगळावीत असा संभ्रम निर्माण होतो. वानगीदाखल थोडीच उदाहरणे येथे घेतली आहेत.
‘उत्तरमेघा’त विरहाच्या पार्श्‍वभूमीवरील यक्षपत्नीच्या भावावस्थेची चित्रे कालिदासाने उत्कटतेने रंगविली आहेत. शारीर सौंदर्याचा भाग त्यात आहेत. ते तत्कालीन काव्यसंकेतांना धरून आहे.
तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितरहिणीप्रेक्षणानिम्ननाभिः|
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां
या तत्र याद्युवतिविषये सृष्टिराद्यैव धातुः॥
– तिची तनू सडपातळ आहे. दात रेखिलेले आहेत. पक्व तोंडासारखे रसपूर्ण ओठ आहेत. कंबर बारीक आहे. नाभी सखोल आहे. भ्यालेल्या हरिणीसारखे तिचे डोळे आहेत. ती पृथुलनितंबा आहे. मंदगामिनी आहे. स्तनभाराने ती किंचित लवली आहे. स्त्रीरूपाची पहिलीच प्रतिमा विधात्याने तिच्या रूपाने येथे घडविलेली आहे. श्‍लोक क्र. २३, २४, २५, २६, २७ मध्ये तिच्या भावावस्थेचे वर्णन यक्ष मेघाजवळ करतो. २७व्या श्‍लोकात तिच्या मनातील उत्कंठा उत्कटतेने व्यक्त झाली आहे. यक्षपत्नी उंबरठ्यावर एक-एक फूल ठेवून दिवस मोजते. आपल्या विरहाचे किती महिने राहिले हे ती अजमावून पाहते. आपल्या पतीच्या सहवासाची चित्रे रेखाटून ती आपल्या कल्पनाविश्‍वात रमते. विरहावस्थेत प्रत्येक रमणी आपले मनोविनोदन अशाप्रकारे करीत असावी.

‘‘हे घना, कृश अंगाची प्रिया कशी तरी शरीर धारण करते. दुःखाचे कढ येताच शय्येवर स्वतःस लोटून देते. तिला नव्या सरींची आसवे ढाळताना पाहून तूही आसवे ढाळू लागशील. ज्यांच्या हृदयात ओलावा असतो ते मुळातच कनवाळू वृत्तीचे असतात.’’
‘‘हे घना, माझी प्रिया जर निद्रासुख घेत असेल तर तू तीन प्रहर प्रतीक्षा कर. आपले गर्जित विसर. स्वप्नभेटीत जर ती मीलनसुख घेत असेल तर गळामिठीचे स्वप्न भंगून तिच्या भुजलता सैल न होवोत.’’
आपल्या प्रियेला उद्देशून यक्ष म्हणतो, ‘‘देवदारवृक्षाचे कोमल किसलय पर्णपुटे हलकेच फुलवून हिमालयाहून दक्षिण प्रदेशात येतात, त्या तुषारांनी आर्द्र झालेल्या शीतल झुळकांना मी आलिंगन देतो. कारण त्यांना तुझ्या तनूचा स्पर्श अगोदर झालेला असणार.
मी स्वतःशी विचार करीत राहतो आणि स्वतःलाच धीर देतो. हे कल्याणी, तूही हृदयाशी कातर होऊ नकोस. सांग बरे, कधी कुणाला आत्यंतिक सुख अथवा दुःख लाभते का? जीवनाचे हे चक्र आहे. ते कधी खाली जाते; कधी वरती येते.’’
– प्रेमानुभूतीतील ही प्रगल्भ समज हाही कालिदासाच्या प्रेमविषयक तत्त्वज्ञानाचा स्थायिभाव आहे.
शेवटी यक्ष घनाला आर्जवाने सांगतो, सख्या, हे सारे तू माझ्या स्नेहासाठी करशील ना? अबोल राहून या आर्त चातकाला संतुष्ट करशील ना? आपल्या कृतीने प्रियजनांना तृप्त करणे हा सज्जनांचा स्वभाव नव्हे का?
मला कळते आहे अशी तुला विनंती करणे हे योग्य नव्हे. पण तुझ्या स्नेहशील करुणेने माझ्या मनोकामना तू पूर्ण करशील. जलभाराने लवलेल्या तू असा इष्ट मार्ग माझ्यासाठी धरावा. हे घना, अशाने विद्युत्सखीचा विरह माझ्यासारखा तुलाही न व्हावा ः
समानधर्मी मित्राला यक्षाने केलेली ही आर्त विनवणी हा कालिदासाच्या कल्पनाविलासाचा उत्कृष्ट नमुना आहे. चेतनगुणोक्ती अलंकाराचा परमोच्च बिंदू येथे गाठलेला आहे.
विश्‍वसाहित्यात अजरामर झालेले असे अभिनव काव्यशिल्प कालिदासाने निर्माण केले आहे. ‘मेघदूत’विषयी रवींद्रनाथ उद्गारतात ः
पावसाच्या मार्‍याखाली थकूनभागून
गेलेल्या, दीर्घच दीर्घ अशा आषाढाच्या संध्याकाळी
जेव्हा लोप पावतात चंद्रतारका; अशा समयी
प्रियेपासून दूर असलेल्या
कितीतरी एकाकी विरही जनांनी
किती काळपर्यंत
मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात बसून
मंदमंद गुणगुणली आहे
तुझी कविता
आणि तींत बुडवून टाकली आहे त्यांनी आपली
विरहवेदना!
तुझ्या काव्यातून ऐकू येतात मला त्या सर्वांचे कंठस्वर
समुद्रतरंगाच्या कलध्वनीप्रमाणे!
एका कविश्रेष्ठाच्या श्रेष्ठ काव्याला दुसर्‍या कविश्रेष्ठाने गुणग्राहकतेने, रसज्ञतेने आणि मर्मदृष्टीने दिलेली ही मानवंदना. तीदेखील कवितेतूनच. दोन प्रतिभावंतांच्या मनोमीलनाचा हा उत्कट क्षण. रसिकांसाठी आनंददायी!