ब्रेकिंग न्यूज़
काम सुरू झाल्यानंतर मागण्यांवर विचार

काम सुरू झाल्यानंतर मागण्यांवर विचार

>> आमदार नीलेश काब्राल यांची ट्रकमालकांना ग्वाही

>> सहकार्य करण्याचे आवाहन

आधी काम सुरू होऊ द्या, नंतर ट्रक मालकांनी सादर केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेकडे लक्ष देऊ, अशी ग्वाही कुडचड्याचे भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन देऊनही फक्त ५० रुपयांच्या फरकासाठी ट्रकवाल्यांनी स्वतःच्याच पोटावर गदा आणली आहे. जे विरोधक त्यांना भडकावत आहेत ते त्यांना काहीही मदत करणार नाहीत. उलट त्यांना त्रासातच घालणार आहेत हे ट्रकवाल्यांनी लक्षात घ्यावे व सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

नीलेश काब्राल यांनी कोडली येथील वेदांताची खनिज वाहतूक सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. यामुळे आंदोलन करणार्‍या ट्रक मालकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याविरुद्ध जनमत तयार झाल्याचे वृत्त पसरले आहे.

त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना आमदार काब्राल यांनी काल पत्रकारांशी बोलताना वरील वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी ट्रकमालक संघटनेचे शिष्टमंडळ आपल्याकडे आले होते. त्यावेळी १२.५० पैसे दर व ५८ रुपये प्रति लिटर डिझेल दर या दरात वाहतूक सुरू करण्याचे ठरले होते. वाहतूक सुरू झाल्यानंतर डिझेल दर उतरवण्यासंबंधी आपण स्वतः मुख्यमंत्री व सेझा कंपनीशी बोलणी करीन. तसेच मागण्या मान्य करून घेण्यासाठी ट्रक मालकांसोबत आहे, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले होते. त्यांनीही आपला प्रस्ताव मान्य केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव कंपनीला सादर करण्यात आला होता. पण त्यानंतर हा विषय वाढवण्यात आला असून हे योग्य नाही. त्यामुळे लोकांचेच नुकसान होत आहे हे काही नेत्यांना समजत नसल्याचे दुःख होत आहे, असे काब्राल म्हणाले.

आपण लोकांबरोबर आहे म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलो. ट्रक मालकांनाही माझा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना मी थेट भेटून स्पष्टीकरण देऊ शकतो. पण विरोधकांनी उगाचच विषयांतर करून लोकांच्या पोटावर आड येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. खाणी सुरू व्हाव्यात व लोकांना त्यांची रोजीरोटी उपलब्ध व्हावी या एकाच उद्देशाने आपण ट्रक पाठवले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्रकवाल्यांच्या समस्या सोडवण्याचे हरतर्‍हेने प्रयत्न केले आहेत. खाणबंदी काळात मासिक भत्ता, कर्ज फेडीसाठी सवलत आदी अनेक योजना ट्रकमालकांसाठी पर्रीकरांनी राबवल्या. पण आज फक्त ५० रुपये फरकासाठी आंदोलन करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.