ब्रेकिंग न्यूज़

काणकोण, फोंडा टॅक्सी संघटनांचाही गोवा माईल्सविरोधात आंदोलनाचा इशारा

गोवा सरकार गोवा माईल्स टॅक्सी असोसिएशनच्या नावाखाली गोव्यातील टॅक्सी चालकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत असून येत्या मंगळवार पर्यंत वाहतूक संचालक निखिल देसाई यांची बदली केली नाही आणि गोवा माईल्स टॅक्सी असोसिएशनला हद्दपार केले नाही तर जिंकू किवा मरू हा नारा देत रस्त्यावर येण्याचा इशारा अखिल गोवा टॅक्सी युनियनने तारीर राजबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात घेतलेल्या काणकोणच्या टॅक्सी युनियनच्या बैठकीच्या वेळी दिला. काणकोणचे आमदार इजिदोर ङ्गर्नांडिस या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खास उपस्थित होते.

गोव्याचे टॅक्सी चालक पर्यटकांना लुटतात असा जो आरोप आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी केलेला आहे तो निखालस खोटा असून तशा प्रकारची तक्रार आतापर्यंत एकाही पर्यटकाने केलेली नाही. गोंय आणि गोयकारपण हे सद्याचे सरकार विसरले असून बहुमताच्या जोरावर घेतलेला निर्णय गोवा सरकारला महागात पडेल असे सांगून वेळ पडल्यास आपल्या कुटुंबाला रस्त्यावर आणावे लागेल आणि काणकोण ते पेडणे पर्यंत पसरलेल्या ३२ हजार टॅक्सी चालक रस्त्यावर येतील असा इशारा अखिल गोवा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष चेतन देसाई यानी यावेळी दिला.

या आंदोलनाला गोव्यातील काळे-पिवळे टॅक्सी चालक, मोटार सायकल पायलट असोसिएशन आणि नागरिकांचा पाठिंबा असून मुख्यमंत्र्यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी यावेळी पिवळया टॅक्सी चालक असोसिएशनचे सुनिल आनंद नाईक यानी केली. आपण नेहमीच सर्वसामान्य आणि गरिब व्यक्तींच्या मागे राहिलेलो असून या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा असेल असे आमदार इजिदोर ङ्गर्नांडिस यांनी स्पष्ट केले. या बैठकीला तारीर, पाळोळे परिसरातील २०० टॅक्सी चालक उपस्थित होते.

फोंडा टॅक्सी संघटनेचाही इशारा

गोवा माईल्स टॅक्सी सर्व्हिसला सरकारने दिलेले पाठबळ व त्यातून मूळ गोमंतकीय टॅक्सी चालकांवर होणार्‍या अन्यायावर बोट ठेवून काल फोंडा टॅक्सी संघटनेने पत्रकार परिषदेतून गोवा माईल्स व सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला. फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेला रुपेश कांबळी, संदेश नाईक, जुझे फर्नांडिस, दिनेश नाईक, बाबुराव नाईक, श्रीकांत गावकर, कृष्णा नाईक, चिरंजीव राव, रामदास नाईक, विश्वास गावस, मनोहर नाईक, राजेंद्र वेंगुर्लेकर, आदी उपस्थित होते.
अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष बबन सावंत यांनी सांगितले की, सरकारने गोवा माईल्स टॅक्सी सर्व्हीसला दिलेले पाठबळ हे पूर्णपणे चुकीचे व गोमंतकीय व्यावसायिकांवर घाला घालण्यासारखे आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून टॅक्सी व्यवसायात गोमंतकीय बांधव आहे. नोकर्‍या मिळत नसल्याने या व्यवसायात युवा शिक्षित उमेदवारही सहभागी झालेले आहेत. अशातच सरकारने बाहेरील कंपन्यांना समर्थन देऊन गोमंतकीयांच्या पोटावर पाय दिला आहे. म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा माईल्सबाबतचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असेही ते म्हणाले. बबन सावंत यांनी सांगितले की, गोवा माईन्सला आमचा पूर्णपणे विरोध अहे. सरकारी गॅझेटपेक्षाही आम्ही प्रवाशांकडून माङ्गक म्हणजे ९०० रुपये भाडे घेतो. तरीही आमच्यावर पर्यटकांची लूट होण्याचा आरोप केला जातो.