ब्रेकिंग न्यूज़

कव्हर स्टोरी (दोन पाने ४,५) पावसाळ्यात त्रास देणारा ‘अतिसार’

  • डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

‘अतिसार’ हा आजार वरवर साधा वाटणारा पण योग्य उपचाराअभावी मृत्यूही होऊ शकतो असा आहे. पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्याच्या संपर्काने हा आजार पावसाळ्यात त्वरित पसरतो.

पावसाळ्यात पाणी हे जीवजंतुयुक्त, दूषित, ज्यामध्ये प्राण्यांचे मल-मूत्रादी घटक झिरपतात, कुजके गवत, केरकचरा, शेवाळ असलेले, किडे पडलेले पावसाचे पाणी, गटार ज्यात वाहून येते असे गढूळ, रंगीत, फेसाळ, दुर्गंधीयुक्त, वाईट चवीचे, अति शीत अशा प्रकारांनी दूषित होते.

लहान बालकांमध्ये अतिसार झाला असता रसक्षय होऊ नये म्हणून तसेच तो झाल्यास त्वरेने कमी व्हावा यासाठी मोरट वापरणे फायद्याचे ठरते. ‘मोरट’ म्हणजे दूध नासवून तयार होणारे पाणी. हे मोरट लिंबुमुळे थोडेसे आंबट होते म्हणून थोडीशी साखर वापरावी.

‘अतिसार’ हा आजार वरवर साधा वाटणारा पण योग्य उपचाराअभावी मृत्यूही होऊ शकतो असा आहे. पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्याच्या संपर्काने हा आजार पावसाळ्यात त्वरित पसरतो. पूरग्रस्त भागात ज्याठिकाणी पाणी उकळण्याची सोय नसते, अस्वच्छ, गढूळ, घाणेरड्या पदार्थांनी मिश्रित, अनेक प्रकारच्या जंतू मिश्रित, डासांचा, माश्यांचा व इतर किटाणूंचा फैलाव झालेला आहे अशा वातावरणात जेव्हा पाण्याचा उपयोग करावा लागतो तेव्हा अतिसारासारखे रोग उत्पन्न होतात.
ज्या आजारांमध्ये गुद्मार्गाने द्रवाचे अतिप्रमाणात निःसारण होते त्या आजारास ‘अतिसार’ असे म्हणतात. हा एक आभ्यंतर मार्गातील रोग असून अत्यंत आशुकारी प्रकारचा आहे. व्याधीचे स्वरूप अत्यंत गंभीर व शरीरावर तत्काळ परिणाम करणारे आहे.
पावसाळ्यात वाताचा प्रकोप असतो. तसेच दूषित पाण्याच्या सेवनाने अपधातूचीही स्वतंत्रपणे दुष्टी होते. प्रकूपित वायू दुष्ट अशा अपधातूला स्वस्थानातून खेचून कोष्ठामध्ये आणतो. कोष्ठात असणार्‍या अग्नीशी या उदकधातूचा संपर्क आल्याने अग्नी मंद होतो. तसेच निसर्गतः पावसाळ्यात अग्निमांद्य असतेच. त्यामुळे पुरीषाला द्रवता येते. द्रवमिश्रित पुरीष वायूच्या प्रेरणेने गुदावाटे वारंवार व अधिक प्रमाणात बाहेर पडतो व अतिसाराची उत्पत्ती होते.
पावसाळ्यात आहार-विहाराला विशेष महत्त्व आहे. कारण अतिसार हा एक अत्यंत आसुकारी असा व्याधी आहे. त्यामुळे या व्याधीची संप्राप्ती ही फार चटकन पुरी होते व लक्षणेही लगेच व्यक्त होत असतात.

पावसाळ्यातील अतिसाराची विशेष कारणे ः-
– दूषित जलाचे सेवन. विविध स्वरूपांचे आंत्रकृमी मुख्यतः दूषित जलाच्या माध्यमातूनच फैलावत असतात.
– वाळू, चुनखडी, माती इत्यादींचे कण व इतर अविद्राव्य खनिजे इत्यादींनी मिश्रित पाणी प्यायल्यास आंत्रक्षोभ होऊन अतिसार होतो.
– औद्योगिक टाकाऊ द्रव्यांचे दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यामध्ये मिसळत राहिल्याने पाणी अजूनच दूषित होऊन अतिसार होतो.
– पावसाळ्यात पाणी हे जीवजंतुयुक्त, दूषित, ज्यामध्ये प्राण्यांचे मल-मूत्रादी घटक झिरपतात, कुजके गवत, केरकचरा, शेवाळ असलेले, किडे पडलेले पावसाचे पाणी, गटार ज्यात वाहून येते असे गढूळ, रंगीत, फेसाळ, दुर्गंधीयुक्त, वाईट चवीचे, अति शीत अशा प्रकारांनी दूषित होते. हे अशुद्ध पाणी न उकळता वापरले जाते. त्याचप्रमाणे हेच पाणी न गाळता, न शुद्ध करता जेवणासाठीही वापरले जाते. तसेच बाहेर हॉटेलमध्ये, गाड्यांवर खाणार्‍यांना अतिसाराचा जास्त त्रास होतो.
पावसाळा तसाही कृमींसाठी व इतर प्राण्यांसाठी अंडी घालण्यासाठी हितकर – माश्यांसारखे जलचर प्राणी या ऋतूत अहितकर आहेत. त्यांच्या सेवनाने अतिसार होऊ शकतो.
* पावसाळा म्हटला की बाहेरचे गाड्यावरचे पदार्थ, तळलेले पदार्थ अधिक चवीष्ट लागतात. पण मुळातच अग्निमांद्य असल्याने या प्रकारच्या- भजी, बटाटवडे, समोसे, मिरची अशा पदार्थांनी अतिसाराचा त्रास बळावतो.
* अति चमचमीत, पचायला जड असा आहार म्हणजेच अतिसाराला निमंत्रण.
* विरुद्धाशन, अघ्यशन, अजीर्ण, विषमाशन असा आहार म्हणजे अतिसार होणारच.
* पाण्यात फार काळ पोहण्यानेही अतिसार होतो.
* आहारामध्ये कृश प्राण्यांचे किंवा शुष्क मांस, मासे (वाळलेले) यांच्या अतिसेवनाने अतिसार होतो.
* संक्षेपतः कृमींमुळे साक्षात कोष्ठाची विकृती घडते. अग्निमांद्य अधिक वाढते व त्यामुळे अतिसार उत्पन्न होतो.

अतिसाराची लक्षणे ः-

* ‘बहुद्रवसरण’ – पातळ द्रव गुदावाटे बाहेर पडणे हे अतिसाराचे प्रमुख लक्षण होय. सुरुवातीस द्रवाबरोबर घन मलाचा काही अंश असतो पण नंतर मात्र ‘द्रवमात्रनिःसारणम्’ अशी स्थिती उत्पन्न होते.
* प्रत्येक वेळा मलाचे वेग अधिक असतात व मलाची मात्राही अधिक असते.
* अत्यंत आशुकारित्व, द्रवमात्रीतःसारण ही स्थिती, मलाचे वेग अधिक व मलाची मात्राही अधिक या सर्वांच्या परिणामस्वरूप रसक्षयाची लक्षणेही उत्पन्न होतात.
* श्रम, क्लम, पिंडिकोद्वेष्टन (पायात गोळा येणे), मुख-तालु सुकल्यासारखे होणे, तहान लागणे, छातीत दुखणे, रौक्ष्य, शब्दासहिष्णुता (कुणाचेही बोलणे सहन न होणे) अशी लक्षणे आढळतात.
* मलाचे वेग अनियंत्रित होतात.
* वेग आवरून धरता येत नाही. मूत्र किंवा वायूच्या प्रवृत्तीच्या वेळेसही मलप्रवृत्ती होणे हे लक्षणही उत्पन्न होते.
* उदरशूल, गुदभागी शूल, गुदभागी दाह अशी लक्षणे दिसतात.
* अत्याधिक वेग आल्यास रुग्णास मूर्च्छाही येऊ शकते.
* शोथ, शूल, ज्वर, तृष्णा, श्‍वास, कास, आहमान, पार्श्‍वशूल, मूर्च्छा हे अतिसाराचे उपद्रव आहेत.

अतिसाराची चिकित्सा ः-

अतिसाराच्या आमावस्थेत सुरवातीस लंघन द्यावे. तीव्र स्वरूपाचे अग्निमांद्य असल्याने लंघन महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा जास्त करून लहान मुलांना जेव्हा अतिसार होतो तेव्हा पालक बालकाने नेहमीसारखा आहार घ्यावा, म्हणून आग्रह धरतात व त्यांना बळेबळेच खायला देतात… जे अत्यंत चुकीचे आहे. अतिसारामध्ये लंघन न केल्यास अग्निमांद्य जास्त होते व अतिसार आटोक्यात येत नाही.
– लंघनाने थोडासा अग्नि वाढला की नंतर पाचन चिकित्सा करावी.
– आमावस्थेत स्तंभन कधीही करू नये. स्तंभनाने आमजनित अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात.
– सुरवातीस स्तंभन नकोच, उलट आमयुक्त दोषांना बाहेर पडू द्यावे.
– आमावस्थेत स्तंभन औषधांचा प्रयोग करू नये, असे जरी असले तरी बाल, वृद्ध व्यक्तींमध्ये बलहीन, धातुक्षीण, रसक्षीण असता आमावस्थेतही स्तंभन देणे आवश्यक असते.
– जर स्तंभन केले गेले नाही तर मृत्यूही येऊ शकतो.
– अतिसारात पाचन, दीपन, ग्राही औषधांचा वापर करावा.
– ग्राही औषधे पक्वाशयातील जलाचे शोषण करतात. शंखभस्म, शुंठी, बालबिल्व व पर्पटी कल्प ही ग्राही औषधे अतिसारात उपयोगी पडतात.
– संजीवनी गुटी, बिल्वादि चूर्ण, बालबिल्वावलेह, शुंठीपाकही या अवस्थेत उपयुक्त ठरणारी औषधे.
– अतिसाराच्या पक्वावस्थेत वरचेवर मलप्रवृत्ती होत असताना, स्तंभन औषधांचा वापर करावा.
– स्तंभनासाठी कुटज, मोचरस, जातिफल, भंगा, कापूर ही द्रव्ये महत्त्वाची.
– कल्पांपैकी गंगाधर चूर्ण, कूटजादि चूर्ण, शंखोदर, कूडाकल्प, कर्पूरेश्‍वर रस हे स्तंभनासाठी अत्यंत उपयुक्त कल्प होत. या सर्व कल्पांना अनुपानासाठी तक्र वापरणे अधिक फायद्याचे ठरते. मुस्ता सिद्धजल पानासाठी वापरावे.

आत्यधिक चिकित्सा ः-

आयुर्वेद शास्त्रात आत्यधिक चिकित्सा नाही असा बर्‍याच जणांचा समज आहे, पण अतिसारात जेव्हा आत्यधिक अवस्था उत्पन्न होते तेव्हा त्या गंभीर स्वरूपाच्या लक्षणांचीही चिकित्सा आयुर्वेदीय पद्धतीने करता येते. गरज आहे ती आयुर्वेद शास्त्रावर विश्‍वास ठेवण्याची.

१) रसक्षय (डिहायड्रेशन) –
उदक धातूचे शरीराबाहेर होणारे निःसरण, मलाचे वेग अधिक असणे आणि त्याचे प्रमाणही फार असणे या सर्वांच्या परिणामस्वरूप अतिसारात रसक्षय फार त्वरेने उत्पन्न होतो. खरे पाहता हा रसक्षय येऊच नये यासाठी सुरवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे. यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.
– उकळून गार केलेले पाणी द्यावे किंवा सिद्ध जलाचा उपयोग करावा.
– लाजामंड, खर्जुरमंथ हेही उपयुक्त ठरतात.
– साळीच्या लाह्या या उत्तम संतर्पण करणार्‍या आहेत.
– अतिसारात होणारी बलहानी टाळण्यासाठी लाजामंड उपयोगी पडतो.
– लिंबू सरबत, नारळाचे पाणी, अगदी थोडे लवण मिसळून तयार केलेले लवणजल हेही रसक्षयासाठी उपयुक्त ठरते.
– लहान बालकांमध्ये अतिसार झाला असता रसक्षय होऊ नये म्हणून तसेच तो झाल्यास त्वरेने कमी व्हावा यासाठी मोरट वापरणे फायद्याचे ठरते. ‘मोरट’ म्हणजे दूध नासवून तयार होणारे पाणी. हे मोरट लिंबुमुळे थोडेसे आंबट होते म्हणून थोडीशी साखर वापरावी.
– सर्व प्रकारची काळजी घेऊनही रसक्षय झालाच तर त्याच्या प्रतिकारासाठी सिरेतून लवणजल किंवा शर्करोदक वापरावे.
२) गुदभ्रंश –
वारंवार मलाचे वेग येणे यामुळे गुदप्रदेशी शैथिल्य निर्माण होते. चांगेरी सिद्ध तेलाने गुदप्रदेशी स्नेहन करून मृदु स्वेदन करावे. स्नेहस्वेदनानंतर बाहेर आलेला गुदाचा भाग हलकेच आत ढकलावा. त्यावर तेलाचा पिचू ठेवून गोफणी बंध बांधावा.
३) गुदपाक –
लहान मुलांमधील अतिसारात हे जास्त प्रमाणात दिसते. यासाठी पित्तहर द्रव्यांनी सिद्ध केलेल्या क्वाथाने किंवा सिद्ध दुधाने गुदप्रदेशी परिषेक करावा. अवगाह स्वेद द्यावा. शतधौत घृत लावावे.
४) मूत्राघात –
अति प्रमाणात होणार्‍या अतिसारातून मूत्राघात होतो. यासाठी नारिकेल जल द्यावे.

अतिसारामधील पथ्यापथ्य ः-
– आहार अत्यंत लघू
– सुरवातीला केवळ द्रवाहार द्यावा. यामध्ये लाजामंड, खर्जुरमंथ.
– जसजशी भूक वाढत जाईल तसतसा घन आहार द्यावा.
– ताक, दाडिम, स्वरस
– मूग, मसूर, मटकी यांचे यूष.
– जीर्ण शालिषष्टीक, बकरीचे दूध, षंडगोदक हितकर.
– विहारात पूर्ण विश्राम.
– त्याचबरोबर बाहेरचे खाऊ नये व खाण्यापूर्वी हातांची स्वच्छता राखावी,
– अपूर्णभवासाठी बलहानी टाळण्यासाठी शतावरीचा रसायन स्वरूप वापर करावा.