कवळेकरांनी आता ‘ते’ अध्यादेश मागे घेऊन लोकांना न्याय द्यावा

>> कॉंग्रेस ः टीसीपीतील दुरूस्त्यांचे प्रकरण

राज्याचे विद्यमान नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी विरोधी कॉँग्रेस पक्षात असताना नगर नियोजन खात्याच्या टीडीआर, १६ बी, भूखंड विक्रीसाठी ना हरकत दाखला या दुरुस्त्यांना विरोध करून या दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी केली होती. आता, कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन खात्याचा कारभार असल्याने त्यांनी टीडीआर, १६ बी या दुरूस्त्यांच्या अंमलबजावणीचा अध्यादेश मागे घेऊन लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

भाजपने पैसा आणि सत्तेच्या बळावर गोवा आणि राष्ट्रीय पातळीवर लोकशाहीची थट्टा चालविली आहे. भाजप हा नीतिमत्ता पाळणारा पक्ष म्हणून जाहिरातबाजी केली जात होती. परंतु, भाजपने नीतिमत्तेची थट्टा चालविली आहे. घोडेबाजार मांडून लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, अशी टिका चोडणकर यांनी केली. गोव्यात भाजपने आत्तापर्यंत अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांचा विश्वासघात केलेला आहे. भाजप गोव्यात सिंहाच्या पाठीवर बसून आला. त्यांनी मगो पक्षाचा विश्वासघात केला आहे.