ब्रेकिंग न्यूज़

कलियुग

  •  दत्ताराम प्रभू साळगावकर

तो मनुष्य म्हणजे कलियुगाचा अधिपती कली. तो जोपर्यंत बांधून घातलेला होता तोपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होतं. पण सुटल्यावर त्यानं आपला प्रताप दाखवला. त्या सासू-सुनेच्या समजूतदारपणात तो घुसला व त्याचं पर्यावसान त्यांच्या हमरी-तुमरीमध्ये झालं!’’

सध्या चालू असलेलं युग हे कलियुग आहे असं म्हटलं जातं. या युगाचा अधिपती कली आहे. मला वाटतं की कली हा कोणी सूत्रधार नसून ती एक वृत्ती आहे. दुष्ट वृत्ती व नष्ट वृत्ती. या वृत्तीचा अनुभव आपणा सर्वांना कुठे ना कुठेतरी किंवा प्रत्येक ठिकाणी पावलोपावली येतच असतो. देशा-देशात, राष्ट्रा-राष्ट्रात, राज्या-राज्यात, धर्मा-धर्मात याचा प्रत्यय येत असतो. गाव, समाज, जातीपाती याही या वृत्तीतून सुटलेल्या नाहीत.
यावरून लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते. लहानपणी ती खरी वाटली असावी. त्या वयात सर्वच गोष्टी खर्‍या वाटतात. ही गोष्ट कपोलकल्पित आहे. शंकर-पार्वती म्हणे पृथ्वितलावर आली होती. येथील हालहवाल कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ती दोघं फिरायला गेली. वाटेत पार्वतीला एक मनुष्य दिसला. त्याला एका खांबाला करकचून बांधण्यात आलं होतं. तो आपल्याला ‘सोडवा सोडवा’ म्हणून गयावया करत होता. पार्वतीनं शंकराला विचारलं, ‘‘कोण तो व त्याला असं बांधून का ठेवलं आहे? त्याला सोडवा, मला त्याची दया येते.’’

शंकर म्हणाले, ‘‘थांब, तुला सांगतो… जरा आपण पुढे जाऊ.’’
पुढे गेल्यावर त्यांना आणखी एक दृश्य दिसले. एका विहिरीवर एक वयस्क व एक तरुण अशा दोन बाया एकमेकांना उद्देशून बोलत होत्या. पार्वतीला वाटलं की त्या भांडत असाव्यात. पण तसं नव्हतं. वयस्क स्त्री ही सासू होती व तरुणी तिची सून होती. सुनेनं विहिरीतलं पाणी काढलं होतं व घडा सासूकडे देताना जमिनीवर पडून फुटला होता. सून सासूला म्हणत होती की, ‘‘माझीच चूक झाली. तू घडा व्यवस्थित पकडला आहेस की नाही याची खात्री न करता मी तो हातातून सोडून दिला. मीच चुकले.’’ सासू सुनेला म्हणत होती, ‘‘तुझं चुकलं नाही. मीच तो घडा व्यवस्थितपणे हातात पकडला नाही म्हणून पडून फुटला. चूक माझीच आहे.’’ असंच ते बोलणं चाललं होतं.
शंकर पार्वतीला म्हणाले, ‘‘- नीट ऐकलंस ना हे बोलणं? मग आता मजा बघू!’’
शंकर त्या बांधून घातलेल्या माणसाकडे गेले. त्या माणसाने साहजिकच गयावया करून शंकराना सोडवण्याची विनंती केली. शंकरानी त्याला बंधनातून सोडवले मात्र… आतापर्यंत त्या दुसर्‍या ठिकाणी विहिरीवर ‘माझी चूक, माझी चूक’ अशा सासू-सुनेच्या चाललेल्या संवादाचं रूपांतर भांडणात झाले. सून सासूला म्हणत होती, ‘‘मी घडा व्यवस्थितपणे तुझ्या हाती दिला होता, तूच तो खाली पाडून फोडलास.’’ सासू सुनेला म्हणत होती, ‘‘मी व्यवस्थित पकडण्यापूर्वी तू तो घडा तुझ्या हातातून सोडलास म्हणून फुटला.’’

शंकरानी पार्वतीला म्हटलं, ‘‘त्या बांधलेल्या माणसाला सोडण्याचा परिणाम बघितलास? तो मनुष्य म्हणजे कलियुगाचा अधिपती कली. तो जोपर्यंत बांधून घातलेला होता तोपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होतं. पण सुटल्यावर त्यानं आपला प्रताप दाखवला. त्या सासू-सुनेच्या समजूतदारपणात तो घुसला व त्याचं पर्यावसान त्यांच्या हमरी-तुमरीमध्ये झालं!’’
अशी ही कलीची महती!!
एखाद्या चांगुलपणातही कली कसा घुसतो याचा मलाही अनुभव आलेला आहे. मे महिना म्हटला की शाळा-कॉलेजांना सुटी असतेच. एरव्ही कधी बाहेर न पडणारी मंडळी याचा फायदा घेऊन मुलाबाळांना घेऊन पर्यटनास निघतात. बाहेरगावी जातात. कारण इतर वेळी मुलांच्या शाळा चुकवून फिरायला जाणं रास्त नसतं. साहजिकच मे महिन्यात ऑफिसमध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती रोडावलेली असते. अशा परिस्थितीमध्ये काही वेळा ऑफिसचं कामकाज सुरळीत चालवणं बर्‍याच अंशी कठीण बनतं! अशीच एका वर्षी मे महिन्यात आमच्या ऑफिसमध्ये परिस्थिती उद्भवली. जवळ जवळ पन्नास टक्के कर्मचारी रजेवर. थोडे मंजूर झालेल्या रजेवर तर थोडे अकस्मात न कळवता गैरहजर. मी कामकाज कसंबसं रेटत होतो. अशाच एका दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद करायला थोडाच वेळ असताना एक महिला कर्मचारी माझ्याकडे आली व तिने माझ्यासमोर रजेचा अर्ज ठेवला. अर्ज वाचून मी चकित झालो. सबंध दिवसाच्या ताणतणावाने मी थोडा कावलो होतो.

‘‘कशाला रजा हवी?’’- मी.
‘‘महत्त्वाचं काम आहे!’’- ती.
‘‘तू असं कर. काम कर व उशिरा ऑफिसला ये. नपेक्षा सकाळी ऑफिसला ये व अर्धा दिवस काम करून लवकर जा. पण रजा मात्र घेऊ नकोस.’’
‘‘नाही, मला सबंध दिवस रजा पाहिजे!’’- ती.
‘‘ऑफिसमधली परिस्थिती बघ व निर्णय घे,’’ माझी विनंती.
‘‘नाही जमणार, मला रजाच पाहिजे!’’- ती.
‘‘मग मी तुला रजा मंजूर करत नाही. तुझ्या अर्जावर पाहिजे तर तसा रिमार्क मारतो,’’ मीही ठाम राहिलो.
‘‘बाकी सर्वांना रजा मिळते; मला मात्र नाही. तुम्हाला न सांगता- कळवता गैरहजर राहिले असते तर तुम्ही काय केलं असतं?’’
या प्रश्‍नानं मला सणक भरली. माझी सामंजसपणाची विनंती तिने धुडकावली होती व वर मला प्रश्‍न विचारायची हिम्मत?
‘‘या प्रश्‍नाचं उत्तर मी देणार नाही व ते द्यायची गरजही नाही. उद्या मी काय केलं असतं ते मी ती वेळ आल्यावर ठरवेन. उद्याचा निर्णय उद्या; आज नाही,’’ मी गरजलो.
तिने माझ्यासमोरचा रजेचा अर्ज घेतला, फाडला अन् माझ्या समोरच डस्टबिनमध्ये टाकला व निघून गेली.
दुसर्‍या दिवशी सकाळी वेळेवर कामाला आली.
‘‘तू लवकर जाऊ शकतेस,’’ मी मुद्दामच तिला सांगितलं.
ती काहीच बोलली नाही. मख्ख राहिली. ऑफिसची वेळ संपल्यावर घरी गेली.
प्रश्‍न असा उद्भवतो की तिला महत्त्वाचं जे काम होतं ते कुठं गेलं? की माझी परीक्षाच घ्यायची होती? कदाचित तिला पुढे काढून शिकवणारा कोणीतरी कली, छुपारुस्तम ऑफिसमध्ये असावा! माझ्या ठामपणाचा मला पश्‍चात्ताप बिलकूल नव्हता; कारण असल्या कलीच्या कारस्थानाला बळी पडणार्‍यांपैकी मी नव्हतो!