कला अकादमी जपूया

गोव्याची शान असलेली गोवा कला अकादमीची वास्तू जर्जर झाली असून एक तर तिची संपूर्ण डागडुजी करावी लागेल, किंवा सध्याचे संकुल पाडून पूर्णतः नवीन इमारत उभारावी लागेल ही वार्ता प्रत्येक गोमंतकीयाच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. सध्याची इमारत पाडावी लागेल असे आपण कधी म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण कला व संस्कृतीमंत्र्यांनी राज्य विधानसभेत दिले असले, तरी येत्या महिन्यात पुढील तीन – चार महिन्यांसाठी तरी कला अकादमीतील सर्व नियोजित कार्यक्रम अन्यत्र हलविण्याची पाळी आलेली आहे, हेही तितकेच खरे आहे. विशेषतः कला अकादमीची दरवर्षी १५ ऑगस्टला भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर यांच्या नावे होणारी शानदार भजनी स्पर्धा या वर्षी फोंडा येथील राजीव कलामंदिरात स्थलांतरित केली जाणार आहे आणि दुरुस्तीचे काम लांबले तर बहुधा ‘इफ्फी’च्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठीही यंदा कला अकादमी उपलब्ध असणार नाही. कला अकादमीची सध्याची वास्तू ही कालांतराने धोकादायक बनलेली असून तिचे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आता पुन्हा एकवार नव्याने गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे तिचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल व त्या अहवालातील शिफारशीनुसार तिची दुरुस्ती करायची की पुनर्बांधणी याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. येथे प्रश्न असा पडतो की जर कला अकादमीची वास्तूची संपूर्ण दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीच करायची असेल तर कृष्णकक्षाला स्व. विष्णू सूर्या वाघ यांचे नाव देण्याची घाई कशाकरता करण्यात आली? कला अकादमीची वास्तू ही नुसती एखादी सरकारी वास्तू नाही. प्रत्येक गोमंतकीयाच्या ह्रदयामध्ये तिला स्थान आहे. गोव्याची ती शान आहे. चार्ल्स कुरैय्या यांच्यासारख्या जगद्विख्यात वास्तुविशारदाच्या कल्पनेतून हे सुंदर संकुल मांडवीच्या तीरी साकारलेले आहे. त्या परिसराचा, तेथील निसर्गाचा पूर्ण विचार करून आणि त्याला सामावून घेऊनच ती वास्तू उभारण्यात आलेली आहे. वरवर पाहता त्या वास्तूचा काही भाग खुला जरी वाटत असला, तरी त्यामागेही कलात्मक दृष्टी होती. तेथे येणारा ऊन – पाऊस हा देखील त्या वास्तूचा अविभाज्य भाग आहे आणि तिच्या सौंदर्यामध्ये भरच टाकत आलेला आहे. चार भिंतींच्या बंदिस्त वास्तू न बांधता निसर्गाशी एकरूप होणारे हे संकुल उभारून पद्मविभूषण चार्ल्स कुरैय्या यांनी गोमंतकाच्या वैभवामध्ये एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. कुरैय्या यांच्या उत्तुंग प्रतिभेची आणि कल्पनाशक्तीची साक्ष देत अगणित इमारती आज देश विदेशात ठायी ठायी उभ्या आहेत. अहमदाबादेतील साबरमतीचे गांधी संग्रहालय असेल, जयपूरचे जवाहर कला केंद्र असेल, भोपाळचे भारतभवन असेल, दिल्लीचे हस्तकला संग्रहालय असेल, त्या प्रत्येक इमारतीच्या रचनेमागे एक दृष्टी दिसते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सरकारी पठडीतल्या त्या इमारती नव्हेत. कला अकादमीची वास्तू, त्यातील मारिओ मिरांडांच्या व्यंगचित्रांपासून बाह्य भिंतींवरील दृष्टिभ्रमांपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे काही विचार आहे, काही दृष्टी आहे. गोमंतकीय अस्मितेचे प्रकटन त्यातून घडविले गेले आहे. त्यामुळे अशा या इमारतीशी कोणतीही छेडछाड करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार झालाच पाहिजे. दुर्दैवाने मध्यंतरी ‘इफ्फी’च्या निमित्ताने कला अकादमीच्या वास्तूशी वाट्टेल तशी छेडछाड करण्यात आली. इमारतीची गळती तेव्हापासून सुरू झाली. काही दीडशहाण्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भलता सल्ला देऊन कला अकादमीची शान असलेले भारतीय बैठकीचे ब्लॅक बॉक्स उद्ध्वस्त करून टाकले. ते पूर्वस्थितीला आणण्याचे आश्वासन सरकारने नंतर दिले होते, परंतु ते कधीच घडले नाही. असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. मध्यंतरी कला अकादमी संकुल अपुरे पडत असल्याचा बहाणा करून दर्यासंगमावर नवी बांधकामे करण्याचा घाट काही दीडशहाण्यांनी घातला होता. सुदैवाने त्यात होणार्‍या वृक्षतोडीमुळे त्याला आपसूक पायबंद बसला, अन्यथा जिथे तिथे बंदिस्त दगडी इमारती उभारल्या गेल्या असत्या आणि अकादमीची शान हरवून गेली असती. जनतेच्या मनामध्ये ही भीती आजही कायम आहे. मूळ वास्तूचे संकल्पक चार्ल्स कुरैय्या आज हयात नाहीत, परंतु त्यांच्या नावे चालणारे फौंडेशन आहे. विधानसभेत राणे म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या तज्ज्ञ वास्तुविशारदांचा सल्ला घेणे शक्य आहे. या संकुलाच्या उभारणीमागे जी कलात्मक दृष्टी होती, तिच्याकडे तीळमात्रही कानाडोळा होणार नाही याची खबरदारी कला व संस्कृतिमंत्र्यांनी घ्यावी. ते स्वतःच कलाकार आहेत, त्यामुळे हे भान त्यांना असेल अशी अपेक्षा आहे. कला अकादमीला जागा अपुरी पडत असेल तर आतील काही विभाग अन्यत्र स्थलांतरित करता येण्यासारखे आहेत. दुरुस्ती करायची असो अथवा पुनर्बांधणी, सध्याची वास्तू अधिक शानदार स्वरूपात आणि आधुनिक सुविधांनिशी, परंतु भोवतीच्या निसर्गाशी तिची असलेली समरसता टिकवूनच उभी राहील हे सरकारने कसोशीने पाहावे!