कला अकादमीच्या कृष्ण कक्षाला विष्णू सुर्या वाघांचे नाव

कला अकादमीच्या कृष्ण कक्षाला विष्णू सुर्या वाघांचे नाव

>> कला संस्कृती मंत्र्यांची घोषणा

>> विष्णूंच्या नावे दरवर्षी महोत्सव

५५ वर्षांपूर्वी डोंगरीला सूर्यपुत्र जन्माला आला व पुढे त्याने गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही विष्णुमय जग पसरवले. त्यांच्या साहित्यातून, कर्तृत्वातून युवकांनी प्रेरणा घ्यावी म्हणून विष्णूच्या नावाने दरवर्षी एक महोत्सव कला अकादमी साजरा करणार असून कला अकादमीचे कृष्णकक्ष यापुढे विष्णू सुर्या वाघ कृष्णकक्ष म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल येथे केली.
प्रतिभाशाली साहित्यिक, नाटककार, कवी, वक्ता, निर्भीड पत्रकार, राजकारणी असे अष्टपैलू, लाडके व्यक्तिमत्त्व स्व. विष्णू सुर्या वाघ यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कला अकादमीतर्फे मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित ‘विष्णुमय जग’ या कार्यक्रमात मंत्री गावडे बोलत होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नामवंत गझलाकार तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, अकादमीचे प्रशासकीय संचालक प्रवीण बरड उपस्थित होते.

विष्णू सूर्या वाघ यांच्यात बहुमुखी प्रतिभा होती जी एका व्यक्तीत क्वचितच आढळते. त्यांचा साहित्य, कला, राजकारण अशा सर्व क्षेत्रात संचार होता. एक मनुष्य एका आयुष्यात एवढं करू शकतो का असा प्रश्‍न पडावा असे त्यांचे कर्तृत्व होते. या व्यक्तीला मर्यादित शब्दात मांडता येणार नाही असे नमूद करून नामवंत गझलकार तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, विष्णू वाघ रांगडा साहित्यिक होता व आहे ते सांगणारा होता. त्यांची प्रतिभा, त्यांच्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

दिगंबर कामत म्हणाले, विष्णू म्हणजे ‘झंझावात’ होते. त्याने ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले तिथे तिथे आपल्या पाऊलखुणा उमटविल्या. त्याचे राजकारणात काहीही असो पण मैत्रीचे बंध कधी तुटू दिले नाहीत. तो खूप दिलदार माणूस होता.
दुसर्‍या सत्रात विष्णू वाघ यांच्या निवडक कवितांचे निमंत्रित कवींनी सादरीकरण करून आठवणींना उजाळा दिला. तिसर्‍या सत्रात विष्णू वाघ यांच्या गीतांवरील ‘भावरंगी विष्णू’ हा कार्यक्रम झाला. चौथ्या सत्रात विष्णू वाघ यांनी शब्दबद्ध केलेल्या गोमंतकाच्या तांबड्या मातीचा गंध असलेल्या गीतांचा ‘माझ्या मातीचे गायन’ हा कार्यक्रम झाला. शेवटच्या सत्रात विष्णू वाघ यांच्या निवडक नाटकातील पात्रांचे सादरीकरण झाले. डॉ. अजय वैद्य यांचे सूत्रनिवेदन लाभले.