ब्रेकिंग न्यूज़

कर्नाटक : येडियुरप्पांचा आज शपथविधी

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वाधिक १०४ जागा जिंकणार्‍या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, बी. एस. येडियुरप्पा आज सकाळी ९ वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शपथविधीला स्थगिती देण्यासाठी कॉंग्रेस-जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून काल रात्रीच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेस – जेडीएसने निकालानंतर एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सत्तास्थापनेचा दावा केला होता.

राज्यपालांवर राजकीय दबाव : कॉंग्रेस
कर्नाटकात राज्यपाल ज्या पद्धतीने वागले त्यावरून त्यांच्यावर राजकीय दबाव आहे असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत केला. गोव्यात कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष होता. पण तरीही भाजपने अपक्षांची मोट बांधून कॉंग्रेसच्या आधी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. हे भाजपने आता विसरायला नको अशी आठवण त्यांनी करून दिली.