कर्नाटक : कॉंग्रेस-जेडीएसची सरकार वाचविण्यासाठी धडपड

कर्नाटकात सत्ताधारी कॉंग्रेस – जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्याने धोक्यात आलेले १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेस – जेडीएसची धडपड सुरू आहे. परदेश दौर्‍यावरून मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांसाठी परिपत्रक काढले असून उद्या ९ जुलै रोजी होणार्‍या आमदारांच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपाने देखील त्यांच्या आमदारांसाठी बंगळुरातील रामदा हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी ३० खोल्या आरक्षित केल्या आहेत.

कर्नाटक कॉंग्रेसच्या बैठकीत कर्नाटक कॉंग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि कर्नाटक कॉंग्रेस प्रमुख दिनेश गुंडू हे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जे आमदार उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कॉंग्रेसने आमदारांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात दिला आहे.

सत्ताधारी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी काल सरकारवरील संकट टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. राजीनामे दिलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न संपर्क होऊ न शकल्याने निष्फळ ठरले. कॉंग्रेस पक्षाचे राज्यप्रमुख के. सी. वेणुगोपाळ यांनी कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. जलस्रोत मंत्री डी. के. शिवकुमार यांनी जेडीएसचे सुप्रिमो एच. डी. देवेगौडा, जेडीएसचे अध्यक्ष के. के. कुमारस्वामी आणि साबांखामंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या चर्चा केली.

वेणुगोपाल यांनी राजीनामा दिलेले ज्येष्ठ आमदार रामलिंग रेड्डी यांच्याशी संपर्क साधून असंतुष्ट आमदारांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. रेड्डी यांनी स्वत: राजीनामा मागे घ्यावा तसेच त्यांनी इतर राजीनामा दिलेल्या आमदारांची समजूत काढण्यावर चर्चा झाली. मात्र, मोठ्या धडपडीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

राजीनामे मागे घेण्यास
सर्व आमदारांचा नकार

कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमधील राजीनामा दिलेले १० आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये डेरेदाखल झाले आहेत. या आमदारांनी राजीनामे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘आम्ही दहा आमदार इथे आहोत. राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या १३ असून आम्ही सभापती आणि राज्यपालांना कळविले आहे.
आम्ही १३ आमदारांनी मिळून राजीनामा दिला असून ते मागे घेण्याचा प्रश्‍नच नसल्याचे एक बंडखोर आमदार एस. टी. सोमशेखर यांनी काल मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राजीनामा दिलेले रामलिंग रेड्डी, मुनीरत्ना आणि आनंद सिंग हे आज गोटात सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राजीनामा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील हॉटेलबाहेर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांनी भाजप विरोधी घोषणाही दिल्या.