कर्नाटकी स्थलांतरितांची नोंदणी सेवा सिंधू ऍपवर सुरू

लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेल्या कर्नाटकमधील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी परत जाणे शक्य व्हावे व त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी गोवा सरकारने त्यांची कर्नाटक सरकारच्या सेवा सिंधू ऍपवर नोंदणी करण्याचे काम हाती घेतले आहे.

या कामगारांची कर्नाटक सरकारच्या सेवा सिंधू ऍपवर नोंदणी न झाल्याने व हे लोक मूळ कर्नाटकातील असल्याचे गोवा सरकार सिद्ध करू न शकल्याने कर्नाटक सरकारने या कामगारांना कर्नाटकात प्रवेश देण्यास नकार दिला होता. परिणामी हे कामगार गोवा-कर्नाटक सीमेवर अडकून पडल्याने त्यांची स्थिती ‘त्रिशंकू’ झाली होती.

दरम्यान, कर्नाटकातील काही कामगार सत्तरीतील केरी या गावात अन्न व निवार्‍याशिवाय अडकून पडल्याचे वृत्त आल्यानंतर सरकार दरबारी सूत्रे हलू लागली होती. आता या लोकांच्या नोंदणीचे काम सुरू झाले आहे. आता ही नोंदणी झाल्यानंतर या कामगारांना कर्नाटकात प्रवेश घेण्यास पास मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या गावी जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.