कर्नाटकात सत्तेसाठी भाजपची सावध पावले

कर्नाटकमध्ये कॉंग्रेस – जेडीएस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग झाला आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जपून पावले टाकण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा तूर्त सत्तेपासून दूरच राहणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काही काळ तरी राजकीय अस्थिरता राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप नेत्याची निवड करणे तसेच सरकार स्थापन होईपर्यंत सर्व प्रक्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतून कर्नाटकात पर्यवेक्षक पाठवण्यात येणार असल्याचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची भीती असल्याने भाजपने सावध पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजप विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असला तरी २२५ सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे बहुमत नाही. कुमारस्वामी यांना विश्वासमतावेळी ९९ मते पडली तर विरोधात १०५ मते पडली. यावेळी १५ बंडखोर आमदार, ३ अपक्ष आमदार आणि कॉंग्रेसचे दोन आमदार गैरहजर राहिले. गैरहजर राहिलेल्या आमदारांना अपात्र घोषित करण्यात आलेले नाही, तसेच त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आलेला नाही, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे आमदारही सभागृहाचे अजूनही सदस्य आहेत.