ब्रेकिंग न्यूज़

कर्नाटकात सत्तेचा चेंडू राज्यपालांच्या रिंगणात

>> भाजप सर्वांत मोठा पक्ष

>> भाजप तसेच कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. २२२ पैकी १०४ जागा पटकावीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. सत्ताधारी कॉंग्रेसला ७८ जागा मिळाल्या असून जनता दल (एस)ने ३८ जागी विजय मिळवून एक्झिट पोलनुसार किंगमेकर ठरणार असल्याची भाकिते खरी ठरविली आहेत. दरम्यान, भाजपने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून आठ दिवसांचा अवधी मागितला आहे. तर कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी एकत्र येत भाजपाला कात्रीत पकडले असून त्यांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील नव्या सरकारचा चेंडू तूर्त राज्यपालांच्या कोर्टात आहे.

काल सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला टपाल मतांची मोजणी झाली. यामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत चित्र पालटले. भाजपने जोरदार मुसंडी मारत बहुमताच्या दिशेने कूच केली होती. मात्र, त्यांना १०४ जागांपर्यंत मजल मारता आली. बहुमतासाठी भाजपला ८ जागा कमी पडल्या. मात्र, सत्ताधारी कॉंग्रेसवर वरचढ होत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. कॉंग्रेसची १२२ जागांवरून ७८ जागांवर घसरण झाली. तर किंममेकरच्या भूमिकेत समोर आलेल्या जेडीएसने ३८ जागा पटकाविल्या. दोन जागी अपक्षांनी बाजी मारली.

कॉंग्रेसच्या हातून कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य निसटल्या दिसताच मतमोजणीपूर्वीच बेंगळुरूत तळ ठोकून असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी देवेगौडा यांच्याशी बोलणी करून जेडीएससोबत युतीचा प्रस्ताव ठेवला. जेडीएसने हा प्रस्ताव स्वीकारल्याने सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरेच कठीण जाणार आहे.
सर्वाधिक जागा पटकावून भाजपने दक्षिणेत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे. कॉंग्रेसच्या हातून मात्र कर्नाटक गेले असून आता पंजाब हे एकमेव मोठे राज्य बाकी आहे. त्यासोबत मिझोराम व पुड्डुचेरी येथे कॉंग्रेसची सत्ता आहे. दुसरीकरडे, देशातील ३१ राज्यांपैकी २० राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे.
गेल्या १२ मे रोजी कर्नाटकात विधानसभेसाठी २२४ पैकी २२२ जागांसाठी मतदान झाले होते. आर. आर. नगर मतदारसंघातील मतपत्रिकांचे घोटाळे आणि जयनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या निधनामुळे या दोन जागांसाठी मतदान झाले नाही.

कॉंग्रेस-जेडीएस आघाडी
मणिपूर आणि गोव्यात आघाडी करून सत्ता स्थापनेची खेळी करणार्‍या भाजपवर त्यांचेच तंत्र उलटले आहे. कॉंग्रेसने भाजपच्या याच तंत्राचा वापर करत कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी केली या दोन्ही पक्षांंनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचे भाजपचं स्वप्न भंगण्याची शक्यता असून भाजपला हा मोठा हादरा ठरणार आहे.

सोनिया गांधी व कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्यात जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. जेडीएसनेही ही ऑफर स्वीकारली असून कॉंग्रेसबरोबर आघाडी केल्याचे जाहीर केले आहे. काल सायंकाळी कॉंग्रेस आणि जेडीएसचे नेत्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या १८ मे रोजी जेडीएस नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जेडीएसने स्पष्ट केले आहे. गोव्याच्या धर्तीवरच राज्यपालांनी आम्हांलाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे, अशी मागणीही जेडीएसने केली आहे.

कार्यकर्त्यांच्या घामामुळेच कमळ फुलले : मोदी
कर्नाटकचा विजय असामान्य असून कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या घामामुळेच कमळ फुलले अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कर्नाटकात पक्षाला सर्वाधिक जागा दिल्याने त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे तसेच भाजप कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत. कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना नाव न घेता काही लोक उत्तर आणि दक्षिणेतील जनतेत भांडणे लावून देशाच्या मूल्यांवर हल्ला करतात असा आरोप त्यांनी केला. कर्नाटकचे निकाल समोर आल्याने राजकारणाला विकृत स्वरूप देणार्‍यांना चपराक बसली आहे. भाजपावर हिंदी भाषिक पक्ष असा शिक्का बसला होता. मात्र, आज तुम्हांला मी विचारू इच्छितो कर्नाटकात कोण हिंदी भाषिक आहे? गुजरात हिंदी भाषिक नाही, महाराष्ट्र हिंदी भाषिक राज्य नाही, आसाम, गोवा किंवा उत्तर पूर्वेतील राज्येही हिंदी भाषिक नाहीत. तरीही आमच्याविरोधात एक पक्ष जाणीवपूर्वक अपप्रचार करतो. मात्र, त्या पक्षाला जनतेनेच उत्तर दिले आहे. फक्त उत्तरच नाही तर सणसणीत चपराकच दिली आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.