कर्नाटकातील सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकातील सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात

>> सभापतींकडून राजीनामा स्वीकारण्यास उशीर

>> बंडखोर जेडीएस – कॉंग्रेस आमदारांचा आरोप

कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला असून कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये असलेले कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आणखी चार आमदार मुंबईत पोहोचतील असा दावा केला आहे. जारकीहोळी यांच्या दाव्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र, हे आमदार कोण त्याची बंगळुरूत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेले कर्नाटकमधील जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकार अधिक संकटात येण्याची शक्यता आहे.

बंडखोरांना भेटण्यास
शिवकुमार यांना मज्जाव
तर दुसरीकडे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना कर्नाटकमधून भेटायला आलेले कॉंग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी ‘शिवकुमार परत जा’च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने शिवकुमार यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश दिला जातो, असा सवाल शिवकुमार यांनी केला आहे.

आणखी दोघा कॉंग्रेस
आमदारांचे राजीनामे
सलाईनवर असलेले कुमारस्वामी सरकार वाचविण्यासाठी धडपड चालू असताना काल कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी सभापतींकडे राजीनामे सादर केल्याने कॉंग्रेसला पुन्हा जबर धक्का बसला आहे. गृहनिर्माणमंत्री एम. टी. बी. नागराज आणि के. सुधाकर या कॉंग्रेसच्या दोघा आमदारांनी राजीनामा दिल्याने आतापर्यंत राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या १६ झाली आहे. बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यास कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. काल दोन आमदारांनी राजीनामा दिल्याचे सभापती रमेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सभापतींच्या कार्यालयात त्यांनी राजीनामा पत्र दिल्याचे सभापती म्हणाले.