ब्रेकिंग न्यूज़

कर्नाटकचा कौल

सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेचा ऐतिहासिक निकाल आज लागणार आहे. आजचा निकाल ऐतिहासिक असेल कारण या निवडणुकीतून शतकोत्तर वाटचाल करणार्‍या या देशातील सर्वांत जुन्याजाणत्या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य मुक्रर होणार आहे. कॉंग्रेस पक्षाची चाललेली घसरण थांबवणारा आणि नवी ऊर्जा देणारा निकाल कर्नाटक देणार का की, भारतीय जनता पक्षाची दक्षिण दिग्विजयाची आजवर मतदारांनी रोखून धरलेली वाट कर्नाटकची जनता पुन्हा मोकळी करून देणार आहे ते आजचा निकाल सांगणार आहे. कर्नाटकच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रचारा दरम्यान आपली सर्व शस्त्रे – अस्त्रे पणाला लावली होती. शेतकर्‍यांना कर्जमाङ्गी, सिंचनासाठी पाणी येथपासून लिंगायत पंथाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यापर्यंत आटोकाट प्रयत्न राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिकेतून केले आहेत. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. एकमेकांची उणीदुणी सार्वजनिक व्यासपीठांवर धुतली गेली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यामुळे मोदींनी आपल्या नियोजित जाहीरसभांपेक्षा अधिक सभा घेऊन आपला प्रचाराचा धडाका वाढवला. दुसरीकडे राहुल गांधींनी कॉंग्रेसची खिंड बाजी प्रभूच्या आवेशात लढवली. कर्नाटक त्यांनी पिंजून काढला. या सार्‍या धुमश्चक्रीनंतर मतदारांनी आपला कौल दिलेला आहे. आपण सत्तेवर आलो तर शेतकर्‍यांना १ लाखांपर्यंतची कर्जमाङ्गी भाजपाने घोषित केली आहे. शेती बाजारभावांतील चढउताराला नियंत्रित करण्यासाठी पाच हजार कोटींचा बाजारपेठ हस्तक्षेप निधी उभारण्याची घोषणाही भाजपाने प्रचारादरम्यान केली होती. शिवाय म्हादईचे पाणी तुमच्या दारी आणू असेही भाजपा नेत्यांनी कर्नाटकला सांगितलेले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसनेही १० जिल्ह्यांमध्ये कृषी कॉरिडॉर व शेतकरी उत्पन्न आयोगासारख्या कल्पना मांडल्या आहेत. दारिद्य्ररेषेखालील महिलांना भाजप मोङ्गत स्मार्टङ्गोन द्यायला निघाला आहे, तर कॉंग्रेस सरकारी नोकर्‍यांतील महिला कर्मचार्‍यांचे प्रमाण पन्नास टक्के करणार आहे. एकूण सर्व क्षेत्रांसाठी यंव करू, त्यंव करू अशी उदंड आश्वासने दोन्ही पक्षांनी दिलेली आहेत. मतदारांची कोणाला भुरळ पडते ते आज स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसच्या पारड्यात हा निकाल गेला तर पक्षाची घसरण थांबण्याचे ते सुचिन्ह ठरेल व नेते व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा प्राप्त होईल. कर्नाटक भाजपाला हिसकावून घेता आले, तर भाजपाच्या दक्षिण दिग्विजयाचा तो पुनश्च हरि ओम् ठरेल. गेल्यावेळी हाती आलेले कर्नाटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे पुढच्या वेळी हातून निसटले. यावेळी पुन्हा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या त्याच नेत्यांच्या पाठबळावर भाजपा निवडणुकीचा जुगार खेळला आहे. यावेळी केंद्रात भरभक्कम सत्ता असल्याने त्याचा ङ्गायदा पक्षाला कर्नाटकमध्ये जनता मिळवून देणार की नाही हे आजचा निकाल सांगणार आहे. या निवडणुकीकडे आम्ही दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणूनच पाहतो हे स्वतः अमित शहा यांनी जाहीर मुलाखतींमधून सांगून टाकलेले आहे. देशाच्या विकासयात्रेत कर्नाटक मागे राहिला आहे, त्यामुळे त्याला त्यात सामावून घेण्यासाठी जनता भाजपाला साथ देईल अशी त्यांना अपेक्षा आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत आजवर जात पात पंथ यांचा प्रभाव मोठा असे. यावेळीही ते दिसून आले. जाती उपजातींबरोबरच या वेळी धर्म हा विषयही चर्चेत राहिला. धर्माचा वापर निवडणुकीत जरी प्रत्यक्ष करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केलेली असली तरी अप्रत्यक्षपणे धर्माचा वापर आपापल्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी केलेला दिसून येतो. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कराव्या लागलेल्या मठ – मंदिरांच्या यात्रा, पंथ – संप्रदायांना जवळ करण्यासाठी उमेदवार निवडीमध्ये विचारात घ्यावी लागलेली विविध समीकरणे यातून कर्नाटकच्या निवडणुकीचा एकूण रागरंग स्पष्ट झालेलाच आहे. कॉंग्रेसचे सिद्धरामय्या यांची गेल्या पाच वर्षांची राजवट आणि तिची कामगिरी याचा कस या निवडणुकीत तर लागलेला आहेच, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण धोरणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर पडलेले त्यांचे प्रतिबिंब यांचेही मोजमाप मतदार करणार आहेत. या निवडणुकीचा कौल कॉंग्रेस – भाजपा यांच्यात सरळ असेल की त्रिशंकू असेल याबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. अशा वेळी तिसर्‍या आघाडीची काय भूमिका असेल हेही महत्त्वाचे ठरणार आहे. आजवरच्या सर्व जनमत कौलांमध्ये कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती उद्भवणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. खरोखरच तसे झाले तर त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जनता दल (एस) ला राहुल गांधींनी भाजपची ‘बी’ टीम ठरवले होते हेही नमूद करण्यासारखे आहे. एकूण कर्नाटकचा निकाल चुरशीचा असणार आहे. मध्यंतरी देशाच्या काही राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांतून भाजपाच्या विरोधात गेलेला कौल कर्नाटक अवलंबिणार की तो डाग पुसून टाकणार हे आज कळणार आहे.