ब्रेकिंग न्यूज़

कर्तव्याची जाग असावी

समाजाप्रति असलेली जबाबदारी, कर्तव्य भावनेची जाग माणसाच्या जीवनाला सार्थकी लावण्यास सहकारी बनते. आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजाने आपल्याला घडवले आहे त्या समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो, हे भान जर माणसाला असले म्हणजे मग ती व्यक्ती समाजात गणली जाऊ लागते, नावारूपाला येते. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच मग पुढची पिढी आपले भवितव्य घडवत असते. आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा, जे संस्कार आपल्यापर्यंत पोचवले, तो केवळ दिखावा नसून यातून आपण घडत असतो, याचीही तेवढीच जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पावसाळा ओसरून निसर्गाने कूस बदलताच शरद ऋतू दिमाखाने सजलेला असतो. अगणित रंगांच्या फुलांफुलांमधून दरवळणारा गंध मनाला जेवढा तजेला आणतो, तेवढाच हा फुलांचा रंगभार आपल्या आयुष्यात नवीन रंग भरत असतो. दरवळणारी शुभ्र चमेली साद घालते मनाला, चला रंग उधळा, गंध उधळा माझ्यासारखेच असे जणू ती सांगत असते. रानगुलाबांनी निसर्गावर सांडलेला अत्तर मनसुख भरभरून देत असतो. अशातच शारदीय नवरात्री संपल्यावर नवतेजाने झळाळणारी पौर्णिमा आपल्या आयुष्यात शारदीय चांदणे घेऊन येते. नुकताच ओसरलेला पाऊस. त्यामुळे निरभ्र आकाश जणू आरसा बनून आपल्याला आपलेच प्रतिबिंब पाहायला लावते की काय असा भास होत असतो. परंतु या आभासी प्रतिबिंबाचे पडसाद म्हणून कोजागरीला चंद्र आपल्याला सोळा कलांचे दर्शन देतो की काय. काय म्हणू या कोजागरीच्या चांदव्याला. प्रेयसीच्या प्रेमाने न्हाऊन गेलेेला वेडा प्रियकर की प्रेमीजनांच्या सहवासाने स्वत:च बेभान होऊन चांदणे शिंपत असतो हा. असं म्हणतात कोजागरीची रात्र ही मोठी असते. वर्षातून एकदा चंद्र अगदी पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे आपल्याला हा चंद्र सोळा कलांचे दर्शन देतो. परंतु मला तर हा चांदवा प्रेमाचे उधाण आल्यामुळे अमृत सिंचन करणारा अमृतघटच भासतो.
ही कोजागरी पौर्णिमा, रास पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. अशाच एका शारदीय पौर्णिमेच्या रात्री कृष्णाला आठवण होते की आपण जीवनसाथी म्हणून लाभावा यासाठी व्रजगोपींनी देवीची आराधना केली होती. त्या वैश्‍विक प्रेमाचे भरते आल्याने कृष्ण आपल्या मुरलीने स्वरांचा प्रेमवर्षाव करत बेभान होतो. त्याचा परिणाम म्हणजे समस्त गोपी कृष्णाकडे धावतात. असं म्हणतात, अगणित गोपी आणि त्यांच्यासंगे अगणित कृष्ण असा तो सोहळा पाहण्याजोगा होता. त्यातील प्रत्येक गोपीला भासत होते की कृष्ण आपल्याच सोबतीत रास खेळतो आहे. असा हा महारास याच शारदीय पौर्णिमेला घडला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही वृंदावनात महारास होतो. शारदीय नवरात्रांमध्ये देवीची आराधना केल्यावर पौर्णिमेला महारास होतो. कल्पना करा कसा असेल तो सोहळा. आत्मिक सुखाचे भरते आल्यानंतर देहभान उरते का मग? राधेसहित सार्‍या गोपी कृष्णाच्या आलिंगनाने भारावून गेल्या असतील. असे वैश्‍विक प्रेम आणि त्या प्रेमाची जाणीव झाल्यावर मग कुठले उरणार भान? या रासपौर्णिमेचे वर्णन जयदेवादी संत महंतांनी आपल्या साहित्यातून केले आहे. कृष्णाने व्रजगोपींची इच्छा या महारासाद्वारे पूर्ण केली होती. या रासपौर्णिमेला जो वैश्‍विक आनंद सोहळा झाला त्यालाच कौमुदी पौर्णिमाही म्हटले जाते. ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेला चंद्र सोळा कलांचे दर्शन देतो, त्याचप्रमाणेे भगवान श्रीकृष्णाकडेही सोळा कला होत्या. या दोन्हीची सांगड घालत आजही आपण आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या सण-उत्सवांचे संवर्धन करतो.
कोजागरीची रात्र ही जागवायची रात्र असते म्हणतात. एरवी पूजनात आपण महालक्ष्मीचे आवाहन करीत असतो. परंतु कोजागरीला स्वत:हून महालक्ष्मीचे आगमन होते. म्हणूनच ही रात्र जागवायची असते, असे म्हणतात. केवळ धन, संपत्ती, ऐश्‍वर्य, वैभव एवढेच नव्हे तर, जबाबदारी, कर्तव्य, माया, ममता, करुणा याचीही जाग असली पाहिजे. याचाच पडताळा घेण्यासाठी लक्ष्मी या दिवशी आपल्याकडे येते. ‘कोण जागतो आहे रे’ असे म्हणत ती प्रत्येकाला जागी करते. आपण युगानुयुगे या संस्कारांचे, परंपरांचे संवर्धन करतो ही देखील जागच नव्हे का? आपण या परंपरा जपतो म्हणूनच तर आपली भावी पिढी त्यांचे संरक्षण करू शकतात. माणूस या गोष्टींची जाणीव ठेवून असतो तेव्हाच त्याला महालक्ष्मी प्रसन्न होते. मग विचारांचा, सद्बुद्धीचा, सद्विचारांचा महाप्रसाद, कृपाशिर्वाद देऊन आपले आयुष्य सार्थकी लावते. केवळ धन दौलत, ऐश्‍वर्य असले म्हणून भागत नाही. तर त्या ऐश्‍वर्याची वृद्धी होण्यासाठी आपल्याकडे सुविचारांची, सदाचरणाची गरज असते. अशा उत्सवातून ती आपल्याला मिळत असते. आपले सण, उत्सव जवळ आले की आपण घर, आजूबाजूचा परिसर नितळ, निवळ, स्वच्छ करतो की नाही. मग मनाची झाडणीही व्हायला हवी. आपण आपले सण साजरे करत असताना, आपल्या अवतीभवती शेजारी कुणी दुःखी असेल तर आपण आवर्जून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतो आणि घेतलेच पाहिजे. ही परंपरा आपल्याला आपल्या पूर्वजांनी राखून ठेवण्यासाठी दिली आहे. ज्या कुटुंबात कुणी गेला असेल तर त्या घरात वर्षभर सण साजरा केला जात नाही. आनंद साजरा केला जात नाही. अशावेळी दिवाळी, चतुर्थी या प्रमुख सणांमध्ये त्या घरात खाद्यपदार्थ बनवण्याचे जिन्नस देण्याची रीत आहे. जसे दिवाळीला पोहे, गूळ, नारळ वगैरे. आजही गावामध्ये ही परंपरा जपली जाते. ही माणुसकीची जाणीव जिथे, तिथे नक्कीच महालक्ष्मी आपुलकीने भेट देऊन जाईल हे नक्की. म्हणूनच कोजागरीला ती येते जाणून घ्यायला की आहे नं या सार्‍यांची जाणीव. आहे ना जाग माणुसकीची, संवेदनांची, आपुलकीची, कर्तव्यांची…!!