कर्करोगासाठी तीन प्रकारचे विमा संरक्षण

  •  शशांक गुळगुळे

भारतात दरवर्षी कितीतरी व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. कर्करोगाच्या उपचारासाठी येथे प्रचंड खर्च येतो व तो सर्वांनाच परवडत नाही. परिणामी, भविष्य आपल्याला जरी माहीत नसले तरी प्रत्येकाने कर्करोगासाठीचे विमा संरक्षण अवश्य घ्यावे.

२०१८ मध्ये सुमारे ७ लाख ८० हजार व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडल्या. यांपैकी ४ लाख १ हजार पुरुष होते, तर ३ लाख ७ हजार महिला होत्या, अशी माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन ऍण्ड रिसर्च’ या संस्थेने जाहीर केली आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी भारतात प्रचंड खर्च येतो व तो सर्वांनाच परवडत नाही. परिणामी, भविष्य आपल्याला जरी माहीत नसले तरी प्रत्येकाने कर्करोगासाठीचे विमा संरक्षण अवश्य घ्यावे.

तीन प्रकारच्या पॉलिसी
पहिला प्रकार म्हणजे सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसी (कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल पॉलिसी). विमाधारकाने ही जितक्या रकमेची उतरवलेली असेल त्या रकमेपर्यंत एकूण दाव्याची रक्कम त्यासाठी असलेल्या नियमांनुसार संमत होऊ शकते. कर्करोगासाठीच असलेल्या मेडिक्लेम पॉलिसीत सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसीपेक्षा जास्त फायदे मिळू शकतात. आणि तिसरी गंभीर आजारांसाठीची (क्रिटिकल इलनेस) पॉलिसी. यात कर्करोगाशिवाय अन्य गंभीर आजारांचा दावाही संमत होऊ शकतो.

सध्या देशात आरोग्य विमा पॉलिसी (मेडिक्लेम) विकणार्‍या सार्वजनिक उद्योगातील आणि खाजगी उद्योगातील मिळून एकूण १६ कंपन्या आहेत. यांपैकी नऊ कंपन्यांकडे फक्त कर्करोगाला संरक्षण देणार्‍या पॉलिसी आहेत, तर पाच कंपन्यांकडे गंभीर स्वरुपाच्या आजारांना संरक्षण देणार्‍या पॉलिसी असून या पॉलिसींत कर्करोगाचे संरक्षण समाविष्ट आहे.

३० वर्षांच्या व्यक्तीने जर १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण घेतले तर त्याला सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसीसाठी सुमारे ११ हजार रुपये इतकी रक्कम विम्याचा ‘प्रिमियम’ म्हणून भरावी लागते. फक्त कर्करोगाला संरक्षण देणार्‍या पॉलिसीसाठी रुपये तीन हजार ५०० रुपयांपर्यंत ‘प्रिमियम’ भरावा लागेल. तर गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी असलेल्या पॉलिसीसाठी सुमारे ४ हजार रुपये प्रिमियम भरावा लागेल. विमा उतरविताना जेवढे वय जास्त तेवढी ‘प्रिमियम’ची रक्कम जास्त.

नियमित आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीवर हॉस्पिटलात खर्च झालेल्या रकमेपैकी नियमांप्रमाणे काही रक्कमेचा दावा संमत केला जातो. ज्या आजारासाठी हॉस्पिटलात दाखल केले आहे त्या आजारासाठी हॉस्पिटलात भरती होण्यापूर्वी उपचारावर झालेला खर्च, तसेच हॉस्पिटलातून घरी आल्यावर ठराविक दिवसांसाठी उपचारावर झालेला खर्च, या सर्व खर्चाचा दावा संमत होऊ शकतो. गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी असलेल्या पॉलिसीत तज्ज्ञ डॉक्टरांकडून गंभीर स्वरूपाच्या आजाराचे निदान झाले की रुग्णाला उतरविलेली विम्याची रक्कम पूर्ण दिली जाते. विशिष्ट आजारांसाठीची पॉलिसी घेतानाच ती कोणत्या गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी घेत आहोत ते फॉर्मवर स्पष्ट करावे लागते. जर हृदयरोगासाठी पॉलिसी घेतलेली असेल तर कर्करोगासाठी संरक्षण मिळणार नाही. यासाठी सर्व प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आजार पॉलिसी घेतानाच पॉलिसीत समाविष्ट करून घ्यावेत. यात रोगाचे निदान झाल्यावर दावा म्हणून एकदाच पूर्ण रक्कम मिळते.

‘अपोलो मुनीच हेल्थ इन्शुरन्स कंपनी’ची ‘आयकॅन’ ही पॉलिसी आहे. यात नियमित आरोग्य विमा तसेच गंभीर स्वरूपाच्या आजारांना संरक्षण हे दोन्ही समाविष्ट करण्यात आले आहे. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागत नाही. पॉलिसीचा कालावधी तहहयात असतो. परिणामी प्रिमियम अधिक भरावा लागतो.

टीयर २ शहरांत स्तनाच्या कर्करोगासाठी सुरुवातीस तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो व पुढील उपचारांसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचाराच्या प्रत्येक सायकलसाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो.

फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी सुरुवातीला महिन्याला चार ते सहा हजार रुपये खर्च येतो. नंतर पुढील उपचारांसाठी तीन ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तोंडाच्या कर्करोगासाठी तीन ते चार लाख रु. खर्च येतो, तर शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी या उपचारांसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. रोग वाढलेला असेल तर केमोथेरपीच्या सहा सायकलींसाठी साठ हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एवढा खर्च करणे सामान्यांना शक्य होऊ शकते का? त्यामुळे विमा संरक्षण घेण्याला काहीही पर्याय नाही.
भारतात होणार्‍या कर्करोगांपैकी ४७.२ टक्के कर्करोग पुरुषांना तोंडाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, आतड्याचा व अन्ननलिकेचा होतो, तर महिलांना तोंडाचा (ग्रामीण भारतात महिलांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण फार मोठे आहे), गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा व गॅस्ट्रोक होतो.
गंभीर स्वरूपाच्या आजाराची पॉलिसी कर्करोगाच्या पुढील पातळ्यांसाठी योग्य ठरते. कर्करोगासाठी विशिष्ट असलेली पॉलिसी आजाराच्या सर्व पातळ्यांवर योग्य ठरते. जर कुटुंबात कर्करोग (हा संसर्गजन्य नाही), हृदयरोग, मेंदूचा आजार असा इतिहास असेल अशांनी गंभीर स्वरूपाच्या आजारासाठीची पॉलिसी घ्यावयास हवी. चाळिशी ओलांडलेल्या महिलांनी व पंचेचाळिशी ओलांडलेल्या पुरुषांनी फक्त कर्करोगासाठी असलेली पॉलिसी घ्यायला प्राधान्य द्यायला हरकत नाही. नेहमीच्या सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीत कर्करोगासाठी काही ‘एक्सक्लुजन क्लॉज’ असतात (म्हणजे त्यात नमूद केलेल्या कारणांसाठी दावा संमत होणार नाही) म्हणून ही पॉलिसी उतरविताना हे ‘एक्सल्युजन क्लॉज’ समजून घ्यावेत, नाहीतर दावा दाखल केल्यावर अपेक्षाभंग होऊ नये. उदाहरणच द्यायचे तर स्टार हेल्थ ऍण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी त्यांच्या स्टार हेल्थ गेन इन्शुरन्स पॉलिसीत ओरल केमोथेरपीचा खर्च देत नाही. त्यामुळे पॉलिसी निवडताना ज्या कंपनीच्या पॉलिसीत कमीत कमी एक्सक्लुजन क्लॉज असतील अशा कंपनीचीच पॉलिसी विकत घ्यावी. जर परदेशात उपचार घ्यावयाचे असतील तर गंभीर स्वरूपाच्या आजाराची पॉलिसी घ्यावी. कारण यात एकदम रक्कम हातात मिळते. ती परदेशी चलनात रूपांतरित करून, परदेशात उपचार घेताना उपयोगी पडू शकते.

आरोग्य विमा पॉलिसीची मुदत एक वर्ष असते. मुदतपूर्तीपूर्वीच काही दिवस पॉलिसीचे नूतनीकरण करावे. नियमाने मुदतपूर्तीनंतर एक महिन्याच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण करण्यात येते. पण या मुदतपूर्तीनंतर व नूतनीकरणापर्यंतच्या कालावधीत आजार उद्भवला तर त्या खर्चाचा दावा संमत होणार नाही. कारण त्या कालावधीत पॉलिसी कार्यरत नव्हती. मुदतपूर्तीनंतर एक महिन्यानंतर पॉलिसीचे नूतनीकरण होत नाही. नवी पॉलिसी काढावी लागते व जुन्या पॉलिसीचे काहीही फायदे मिळत नाहीत. हॉस्पिटलात दाखल झालेल्या वेळेपासून २४ तासांच्या आत विमा कंपनी व टीपीए यंत्रणेला कळवायला हवे. ऑनलाईनही कळविता येते. हॉस्पिटलात भरती होण्याचे अगोदर ठरले असेल, अकस्मात हॉस्पिटलात दाखल व्हावे लागले नसल्यास विमा कंपनी व टीपीएला आगावू कळवावे. याला ‘इंटिमेशन नोटीस’ देणे असे म्हणतात. या नोटिशीमध्ये काय काय तपशील द्यावा लागतो याची माहिती पॉलिसी डॉक्युमेन्टमध्ये दिलेली असते. नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या वेळेत न कळविल्यास तांत्रिक मुद्यावर दावा असंमत होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. हॉस्पिटलातून घरी आल्यावर नियमाप्रमाणे ठरलेल्या दिवसांच्या आतच (किती दिवसांच्या आत ते पॉलिसी डॉक्युमेन्टमध्ये नमूद केलेले असते) दाव्याचे पेपर्स टीपीएला सादर करावयास हवेत, नाहीतर तांत्रिक मुद्यावर विम्याचा दावा असंमत होऊ शकतो. आरोग्य विमा ही बाब संवेदनशील आह हे नेहमी ध्यानात ठेवून कुठलाही नियम न तोडता कार्यवाही करत राहावे हेच पॉलिसीधारकाच्या हिताचे असते.
भारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोना उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त आहे, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे.

उतारवयातील बर्‍याच व्यक्तींचे उत्पन्नाचे मार्गही नसतात. म्हणून मध्यम वयातच किंवा तरुणपणापासूनच योग्य रकमेचा आरोग्य विमा उतरवावा. भारतात कर्करोगांवरील उपचार महाग आहेत. येथील राजकारणी (शरद पवार, सेलिब्रिटी ऋषी कपूर) परदेशात जाऊन कर्करोगावर उपचार घेतात. त्यांना किती खर्च येत असेल याची कल्पनाही करवत नाही. आरोग्य विम्याची जी ‘प्रिमियम’ रक्कम भरली जाते ती रक्कम आयकर सवलतीसही पात्र असते.