‘करोना’बाबत सरकार गंभीर ः आरोग्यमंत्री

राज्य सरकार करोनाबाबत गंभीर असून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारकडे थर्मल स्कॅनर उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. करोनाबाबत जनजागृतीसाठी शिक्षण खाते, अंगणवाडी कर्मचार्‍यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतरांच्या एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना विधानसभेत काल दिली.

केरळमध्ये करोनाचे रूग्ण आढळून आल्याने जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. केरळमधून रेल्वेतून गोव्यात येणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. रेल्वेतून येणार्‍या प्रवाशांची तपासणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

राज्यातील नागरिकांमध्ये करोनाबाबत जागृती करण्याची गरज आहे, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी करोना तपासणीसाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. रेल्वेतून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी तूर्त उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली जलद कृती दल करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी स्पष्ट केले. चीनमधून आलेल्या १४ जणांना आरोग्यखात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जीएमसीच्या करोना खास विभागात ३ संशयास्पद रूग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. एकूण ५ संशयास्पद रूग्णांपैकी दोघांचा अहवाल नकारात्मक आला असून तिघांचे अहवाल मिळाले नसल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
करोनाबाबत जनजागृतीसाठी डिचोली येथे एक कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर इतर ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करावे, अशी सूचना सभापती राजेश पाटणेकर यांनी केली.

विदेशी महिलेचा अहवाल नकारात्मक
गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलच्या करोना खास कक्षात दाखल विदेशी संशयित महिला आणि तिच्या निकटच्या साथीदारांचे रक्त तपासणी अहवाल नकारात्मक आले आहे. इस्पितळामधून सदर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. सदर महिलेला दोन दिवसांपासून करोना संशयावरून इस्पितळामध्ये दाखल करण्यात आली होती. सदर विदेशी महिला चीनमध्ये नोकरीला आहे. ती महिला साथीदारांसह बंगलोर येथून गोव्यात आली होती.
दाबोली येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरी वाहतूक मंत्रालयाने विमानतळ आरोग्य अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. गोव्यातील विमानतळ आणि बंदरावर आरोग्य अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विमानतळावर स्क्रिनिंगसाठी दोन आयुष डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी स्किनिंगसाठी पॅरामेडिक यांची नियुक्ती करण्यात आली होती, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.