‘कन्कशन सबस्टिट्यूट’ला मान्यता

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय

गंभीर जखमी खेळाडूंऐवजी ‘कन्कशन सबस्ट्यिट्यूट’ ठेवण्याची मुभा संघांना मिळणार आहे. एखादा क्रिकेटपटू डोक्यावर अथवा शरीरावर चेंडू लागून गंभीर जखमी झाल्यास आणि तो पुढे खेळणे शक्य नसल्यास त्याच्याऐवजी कन्कशन बदली खेळाडू मैदानात जायबंदी खेळाडूची जागा घेऊ शकेल.

वेगवान गोलंदाज जायबंदी झाल्यास त्याची जागा बदली गोलंदाज घेईल आणि फलंदाज जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली (कन्कशन) खेळाडू मैदानात येईल. या बदली खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजी अथवा यष्टीरक्षण करता येणार आहे. मात्र अशा खेळाडूच्या समावेशासाठी डॉक्टरांनी जखमी क्रिकेटपटूंच्या गंभीर दुखापतीने प्रमाणपत्र संघांना द्यावे लागणार आहे. तसेच सामनाधिकार्‍यांची मान्यता देखील ‘त्या’ खेळाडूला घ्यावी लागणार आहे. यंदाच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत डोक्यावर अथवा शरीरावर चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक आलेक्स केरी आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला गंभीर जखमी झाले होते. केरीने बँडेज बांधून फलंदाजी केली, पण आमला मात्र मैदानात पुन्हा फलंदाजीला उतरू शकला नव्हता.

आयसीसीच्या वार्षिक बैठकीत क्रिकेटपटूंच्या जीविताची काळजी घेऊन क्रिकेट अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा नवा ‘बदली खेळाडू’चा नियम मंजूर करण्यात आला आहे. एजबेस्टन येथे १ ऑगस्टपासून इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यापासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. २०१६-१७ मोसमापासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये या नियमाची यशस्वी चाचपणी सुरू झाली होती. तर मागील २०१८ मोसमापासून इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या चार स्पर्धांसाठी हा नियम लागू केला होता.

‘स्लो ओव्हर रेट’च्या कचाट्यातून कर्णधार सुटले
निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याचा फटका केवळ कर्णधाराला बसत असे, परंतु, आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून नवीन नियम अंमलात आणण्याचे ठरविल्याने कर्णधारांनी सुस्कारा सोडला आहे. नवीन नियमामुळे संघांचे धाबे मात्र दणाणले आहेत. १ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या ऍशेस मालिकेपासून आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदापासून सुरू होणारी ही अजिंक्यपद स्पर्धा २०२१ पर्यंत चालणार आहे. एक षटक कमी टाकल्यास (निर्धारित वेळेत) दोन गुण याप्रमाणे षटकांच्या संख्येनुसार गुण संघाला गमवावे लागणार आहेत. सामन्याच्या अंती हे गुण वजा केले जातील. या नवीन नियमामुळे कर्णधारांचे षटकांच्या संथ गतीमुळे होणारे निलंबन टळणार आहे.