कदंबला ५० विद्युत बसेस मंजूर

केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेखाली कदंब महामंडळाला ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यानी काल पत्रकार परिषदेत दिली.

वरील योजनेखाली कदंब महामंडळाला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत या बसेससाठी निविदा काढावी लागणार आहे. या बसेसची किंमत (प्रत्येकी) २.३० कोटी रुपये एवढी असेल व त्या भारतीय बनावटीच्या असाव्या लागतील.
सरकार लवकरच इलेक्ट्रिक वाहने धोरण तयार करणार असून त्यानंतर ह्या बसेस खरेदी करण्यासाठी निविदा काढणार आहे, असे आल्मेदा यानी स्पष्ट केले. ह्या बसेससाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत निविदा काढावी लागणार आहे.

कंडक्टर कदंबचा, ड्रायव्हर कंपनीचा
पीपीपी तत्त्वावर ह्या बसेस खरेदी करण्यात येणार असून केंद्राच्या ‘फेम’ योजनेखाली ह्या बसेस खरेदी करण्यास २५ टक्के एवढा निधी मिळणार आहे. उर्वरित निधी जी कंपनी ह्या बसेस पुरवतील त्यांना खर्च करावा लागणार आहे. या बसेसचा कंडक्टर हा कदंब महामंडळाचा असेल व ड्रायव्हर हा बस कंपनीचा असेल.
ह्या बसेस पुरवण्याचा आदेश मिळाल्यापासून वर्षभरात ह्या बसेस पुरवाव्या लागतील, असे आल्मेदा यांनी सांगितले.

या इलेक्ट्रिक बसेस असल्याने त्यांचे चार्जिंग करण्यासाठीची सगळी साधनसुविधा, चार्जिंगसाठीचा खर्च, ट्रान्स्फॉर्मर आदीची सगळी जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असे आल्मेदा यानी स्पष्ट केले.

प्रती कि. मी. खर्च कमी होणार
डिझेलवर चालणार्‍या बसेसवर प्रती कि. मी. १८ ते २२ रुपये एवढा खर्च कदंब महामंडळाला येत असतो. शिवाय डिझेलवर चालणार्‍या बसेसमुळे वायू प्रदूषणही होत असतो. इलेक्ट्रिक बसेसवर प्रती कि. मी. ८ ते ११ रुपये एवढा खर्च होणार असल्याने महामंडळाला फायदा होणार आहे. शिवाय ह्या बसेसमुळे कोणतेही वायू प्रदूषण होत नसते, असे आल्मेदा यानी सांगितले.