ऑनलाइन कोलाहल!

कोणतेही तंत्रज्ञान जेवढे चांगल्या गोष्टींसाठी वापरता येते, तेवढाच त्याचा गैरवापरही होऊ शकतो. सध्या बोलबाला असलेल्या सोशल मीडियाला आता एका विकृतीने ग्रासले आहे. कर्नाटकच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ट्वीटरवरून उमटलेल्या अत्यंत द्वेषपूर्ण प्रतिक्रिया अथवा काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेली अभद्र टिप्पणी ही या विकृतीची अत्यंत ताजी उदाहरणे आहेत. सोशल मीडियासंदर्भात अलीकडे एक शब्द नित्य कानी पडतो, तो म्हणजे ‘ट्रोल’. ब्रिटीश इंग्लीशमध्ये या शब्दाचा अर्थ ‘मजेत गाणे गुणगुणत जाणे’ असा जरी असला, तरी आजच्या इंटरनेटच्या जमान्यात हा शब्द जाणूनबुजून एखाद्याविरुद्ध प्रक्षोभक वा चिथावणीखोर ऑनलाइन टिप्पणी करणार्‍याला उद्देशून वापरला जातो. सोेशल मीडियाला या ‘ट्रोल विकृती’ने पुरते ग्रासलेले दिसते आहे आणि त्यावर जर नियंत्रण आणता आले नाही, तर या माध्यमाची आजची लोकप्रियता घसरायलाही फार वेळ लागणार नाही. त्याचे समाजावर दूरगामी विपरीत परिणाम होतील ते वेगळेच. गौरी लंकेश यांच्या विचारधारेशी कोणाची असहमती असू शकते, परंतु त्यांच्याविषयी, तेही त्यांच्या मृत्युपश्‍चात् अत्यंत अभद्र भाषेचा वापर करणे हे भारतीय सुसंस्कृततेला लांच्छनास्पद होते. यात एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे सोशल मीडिया इंग्रजी मजकुरातील अशा प्रकारच्या असभ्य भाषेला गाळणी लावते, त्यामुळे अलीकडे देशी भाषांतून अशी शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, ज्यावर माहिती तंत्रज्ञान अद्याप नियंत्रण आणू शकलेले नाही. आपल्या देशात इंटरनेटचे आगमन झाले तेव्हापासून त्याचे फायदे जसे जाणवू लागले, तसेच धोकेही दिसू लागले. त्यामुळे सतरा वर्षांपूर्वी आपण आपल्या देशात माहिती तंत्रज्ञान कायदा संमत केला गेला. त्यात पुढे दुरुस्तीही केली गेली. मध्यंतरी त्या कायद्याच्या कलम ६६ अ वरून रणकंदनही माजले. ‘आक्षेपार्ह’ मजकूर पाठवणार्‍यावर कारवाईची तरतूद त्यात होती. ‘आक्षेपार्ह’ कशाला मानावे हा वादाचा मुद्दा ठरला. या कलमाचा गैरवापर करून धडाधड आपल्या विरोधकांना धडा शिकवण्याचा सिलसिला देशात सुरू झाला. जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला ममता बॅनर्जींनी गजांआड टाकले, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर बंदबद्दल निषेध नोंदवणार्‍या दोन मुलींना महाराष्ट्रात अटक झाली, असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकाराविरुद्ध कारवाई झाली. गोव्यातही अशा घटना घडल्या. त्यामुळे सोशल मीडियावर सरकारी निर्बंध योग्य आहेत का या विषयाकडे ही सारी चर्चा वळली आणि मूळ प्रश्न तेथेच उरला. सोशल मीडिया हे ‘रिअल टाइम’ म्हणजे ताजेतवाने माध्यम असल्याने ते अत्यंत प्रभावी आहे. ‘व्हॉटस्‌ऍप’ आज जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे ते यामुळेच. परंतु याचा दुरुपयोग वार्‍याच्या वेगाने अफवा पसरवण्यासाठीही कसा होतो आणि हिंसाचाराची राळ कशी उडवून दिली जाते हेही आपण पाहिले आहे. काश्मीरमध्ये संवेदनशील घटना घडली की तेथील इंटरनेट आज बंद पाडावे लागते. गुजरातमध्ये पटिदारांचे आंदोलन झाले तेव्हा त्याचा वणवा पसरू नये म्हणून इंटरनेट बंद करावे लागले होते. नुकतेच डेरा सच्चा सौदाच्या आंदोलनावेळीही हेच करणे भाग पडले. ही झाली विशेष प्रसंगी घेतलेली खबरदारी. पण रोजचे काय? या माध्यमांवरून जी गरळ अहोरात्र समाजामध्ये ओतली जाते आहे त्याची दखल आपण घेणार आहोत की नाही? गोवाही याला मुळीच अपवाद नाही. सोशल मीडियाच्या पडद्याआड राहून खर्‍या – खोट्या नावांनी समाजामध्ये अखंड ओतले जाणारे हे विष समाजात खोलवर भिनत चालले आहे. विवेकाला येथे थारा नाही. समतोल, तारतम्य, विरोधी मताचा आदर या गोष्टींना येथे जागा नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मंडळी तावातावाने, आक्रस्ताळ्या चर्चांमध्ये रंगलेली दिसते तेव्हा या सार्‍या मंथनातून मौलिक विचारांचे अमृत निपजण्याऐवजी हलाहलच बाहेर येणार! आजकाल तर आपल्या विरोधकांच्या मानहानीसाठी पगारी फौजा नेमल्या गेल्या आहेत. सोशल मीडिया जशी एखाद्याला लोकप्रियतेच्या शिखरावर चढवते, तशीच एखाद्याला बदनामीच्या दलदलीतही फेकून देते, कारण शेवटी हे तंत्रज्ञान कितीही जरी प्रगत असले, तरी त्याच्या मागे उभी आहेत ती माणसे. नाना विचारांची, नाना विकृतींची, षड्‌रिपूंनी ग्रासलेली हाडामासाची माणसे. आपल्या सार्‍या विकृतींसह ती तेथे आहेत. त्याचे प्रतिबिंब अर्थातच त्यांच्या टिप्पण्यांमध्ये, चर्चांमध्ये उमटत असते. प्रक्षोभक, सनसनाटी, अफवापेरणी करणार्‍या मजकुराची मग वाण राहात नाही. आपल्या हाती नवनवी माध्यमे येत राहिली, परंतु ती कशी वापरावीत याची संस्कृती मात्र आपल्यात भिनली नाही याची ही दारूण परिणती आहे. या सार्‍या ऑनलाइन कोलाहलातून शेवटी हाती काय येते हा मात्र विचार करण्यासारखा प्रश्न आहे!