ब्रेकिंग न्यूज़

ऑक्टोबर नंतर सोनसडो येथील कचर्‍याची विल्हेवाट लावणार

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

सोनसडो मडगाव येथील कचर्‍याच्या प्रश्‍नावरून विधानसभेत गरमा गरम चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कचरा विल्हेवाटीस आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ ऑक्टोबर महिन्यानंतर सोनसडोवरील कचरा डंपच्या विल्हेवाटीला सुरुवात करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चर्चेच्या वेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
सोनसडो कचरा प्रकल्पातील दुर्गंधीमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विहिरी प्रदूषित झाल्या आहे, अशी लक्षवेधी सूचना कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मांडली.

मडगाव नगरपालिका, फोमेंतो कंपनी आणि कचरा व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी यांच्या बैठकीत सोनसडो प्रश्‍नी योग्य निर्णय घेतला जाणार आहे. सोनसडो येथील प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारची मान्यता घेण्यात आलेली नाही. हा प्रकल्प बेकायदेशीरपणे चालविण्यात येत होता, असे एकंदर दिसून येत आहे. सोनसडो येथे कचरा प्रक्रिया करण्याचे काम करणार्‍या फोमेंतो कंपनीने येत्या १० ऑगस्टपासून काम सोडणार असल्याचे मडगाव नगरपालिकेला कळविले आहे. विभक्त केलेल्या चाळीस टन कचर्‍यावर सनसडो प्रकल्पात प्रक्रिया केली जाऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. कचरा विल्हेवाटीसाठी मशीन खरेदीचा पर्याय खुला आहे. उघड्यावर कचरा टाकण्यात येणार्‍या जागांबाबत योग्य तोडगा काढला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात विविध ठिकाणी कचर्‍याची समस्या भेडसावत आहे. कचरा विल्हेवाटीवर तोडगा काढण्यासाठी सिंगापूर येथील कचरा आयलॅण्ड पाहणी करण्याची गरज आहे, असे मत मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.
सोनसडो येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्याची मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोनसडो येथील हवेबाबत दिलेल्या अहवालाबाबत आमदार रेजिनाल्ड यांनी संशय व्यक्त केला. विजय सरदेसाई, लुईझीन फालेरो, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, मंत्री नीलेश काब्राल यांनी लक्षवेधी सूचनेवर विचार मांडले.