ब्रेकिंग न्यूज़

ऐतिहासिक विधेयक लोकसभेतही मंजूर

जम्मू – काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम ३७० रद्द करणारे विधेयक काल लोकसभेतही ३५१ विरुद्ध ७२ अशा मत फरकाने मंजूर करण्यात आले. हे ऐतिहासिक विधेयक सोमवारी राज्यसभेत संमत झाले होते. यावेळी जम्मू – काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही ३७० विरुद्ध ७० अशा फरकाने संमत झाले. यामुळे राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

कलम ३७० रद्द करण्याचा तसेच ३७० नुसार केलेल्या सर्व अन्य दुरुस्त्या गैरलागू करण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला होता. मात्र त्याआधीच राष्ट्रपतींनी अधिसूचना जारी केली. त्यामुळे या प्रस्तावावरील चर्चा केवळ औपचारिकता ठरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सोमवारी विधेयक सादर करीत कलम ३७० रद्द करत असल्याची माहिती दिली होती. राज्यसभेत विधेयकाला मान्यता मिळाल्यानंतर काल हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आणि ते अपेक्षेप्रमाणे प्रचंड बहुमताने मंजूर झाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी सकाळी अधिसूचना जारी करीत कलम ३७० रद्द केले. तथापि कलम ३७० पूर्णपणे संपुष्टात आणलेले नाही. त्यातील उपकलम १ कायम ठेवले असून त्यातील अन्य सर्व विशेष लाभ राष्ट्रपतींनी विशेषाधिकारानुसार रद्द केले आहेत. याच कलमाचा आधार घेऊन १९५४ मध्ये लागू केलेले ३५-अ हे कलमही आता घटनाबाह्य झाले आहे. सध्या जम्मू-काश्मीरात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने हे विधेयक तेथील विधानसभेऐवजी संसदेत मांडण्यात आले.

३७० कलम रद्द करणार्‍या प्रस्तावाबरोबरच जम्मू – काश्मीरचे विभाजन आणि हा संपूर्ण प्रदेश केंद्रशासित प्रदेश बनविणारे विधेयकही अमित शहा यांनी काल लोकसभेत मांडून त्याला मंजुरी मिळवली. जम्मू – काश्मीर तसेच लडाखला दहा टक्के आर्थिक आरक्षण लागू करणारे विधेयकही आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.

अधीर रंजन चौधरींच्या
विधानामुळे कॉंग्रेस अडचडणीत
कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी ३७० कलम रद्द प्रश्‍नावर लोकसभेत केलेल्या एका विधानामुळे कॉंग्रेसची विचित्र स्थिती निर्माण झाली. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रे देखरेख ठेवून असल्याने हा मुद्दा (जम्मू-काश्मीर) हा भारताचा अंतर्गत विषय आहे काय असा सवाल चौधरी यांनी केला होता.
मोदी सरकारच्या या निर्णयाचे मिलिंद देवरा, दीपेंद्र हुडा, अनिल शास्त्री या नेत्यांनीही स्वागत केले आहे.

आमच्या हत्येचा मोदी सरकारचा कट ः फारूख
श्रीनगर : मोदी सरकारने आमच्या हत्येचा कट रचला आहे असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे. सरकारने बळाचा वापर करून काश्मीरच्या नेत्यांना अटक केली. ज्या भारतावर माझा विश्‍वास आहे तो हा भारत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मोदी सरकारच्या निर्णयाला न्यायालयीन आव्हान देण्याचे सुतोवाच त्यांनी केले. आपल्याला आपल्या घरात स्थानबद्ध केल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला. मात्र संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी हा दावा फेटाळला.