एसपीजी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मिळाली मंजुरी

>> सूडाच्या राजकारणाचा आरोप शहांनी फेटाळला

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तथा एसपीजी कायद्यात सुधारणा करणार्‍या विधेयकाला राज्यसभेत काल मंजुरी मिळाली. एसपीजी हा पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आहे. या सुधारणा विधेयकाद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सूड भावनेचे राजकारण करीत आहेत हा विरोधकांचा आरोप काल शहा यांनी संसदेत फेटाळून लावला.

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा मागे घेण्यात आल्याच्या विषयावरून सध्या सत्ताधारी विरोधी कॉंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या विषयावर संसदेतील चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी स्पष्ट केले की केवळ गांधी कुटुंबाचीच नव्हे तर सरकारला १३० कोटी भारतीयांच्या सुरक्षेची काळजी आहे. भाजपने सूड बुद्धीने कोणतीही गोष्ट केलेली नाही. याआधी कॉंग्रेसने आपल्या सत्ताकाळात अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले होते. सूडाचे राजकारण हा भाजपच्या संस्कृतीचा भाग नाही असेही शहा यांनी सुनावले.

नियमानुसार एसपीजी सुरक्षा देशाच्या सर्वोच्च नेत्यांसाठी आहे. फक्त एका कुटुंबासाठी आधीच्या सरकारांनी या नियमात बदल केला असा दावा याआधी शहा यांनी केला होता.

मात्र राजकीय कारणांमुळे भाजप सरकार आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल व कन्या प्रियंका यांना लक्ष्य करत असल्याचा कॉंग्रेसने आरोप केला आहे.