एलईडी दिवे बसविताना पडून बाळ्‌ळी येथे ४ कामगार जखमी

बेनोडे, बाळ्ळी येथे रस्त्यावरील वीज खांबावर एलईडी दिवे बसविताना विद्युतभारीत वीजतारांचा स्पर्श झाल्याने चार कामगार खांबावरून खाली पडून जखमी झाले. सर्व कामगार विजेच्या धक्क्याने बरेच भाजले. चारही कामगार अमृतसर, पंजाब येथील आहेत. वीज खाते व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.

कुंकळ्ळी, बाळ्ळी येथे एलईडी पथदीप बसवण्याचे काम चालू आहे. हा ठेका भारत विकास ग्रुप कंपनीला देण्यात आला आहे. काल कामगार खांबांवर चढले असता गुरुप्रीत सिंग (२२), विकीकुमार (२३), सिमरजीत सिंग (२३), लवू प्रेम सिंग (२३) हे खाली पडून जखमी झाले. विजेच्या स्पर्शाने भाजले व खाली पडल्याने डोके व अंगाला मार लागला. त्यांना तात्काळ बाळ्ळी आरोग्य केंद्रात व त्यानंतर हॉस्पिसियु इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. भारत विकास कंपनीचे सलीम खान व्यवस्थापक असून कुंकळ्ळी पोलीस स्टेशनवर या घटनेबद्दल तक्रार नोंदविण्यात आली आहे.