ब्रेकिंग न्यूज़
एटीएममधून २८ लाख उकळणार्‍या एटीएम कर्मचार्‍याला वास्कोत अटक

एटीएममधून २८ लाख उकळणार्‍या एटीएम कर्मचार्‍याला वास्कोत अटक

एटीएम मशीनमध्ये पैसे भरणार्‍या ‘लॉजीकॅश’ सोलूशन प्रा. लि. व्यवस्थापनात काम करणार्‍या २६ वर्षीय शिवानंद मस्तोली याने व्यवस्थापनाला २८ लाख रुपयांना गंडवल्याने त्याला अटक करण्यात आली. शिवानंदने २८ लाख रुपये लुटल्याची तक्रार ३ मे रोजी वास्को पोलीस स्थानकात करण्यात आली होती.

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०१८ रोजी लॉजीकॅश सोलूशन प्रा. लि. व्यवस्थापनाने केलेल्या तक्रारीला अनुसरून शिवानंदच्या मोबाईल क्रमांकावरून तो वाडे परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त होताच वास्को पोलिसांनी या भागात तपासकार्य सुरू केले. मेर्सीसवाडे येथे एका घरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे समजताच त्याला काल रात्री मंगळवारी सापळा रचून अटक करण्यात आली. मूळ कर्नाटक येथील शिवानंदचे कुटुंब ड्रायव्हरहील, वास्को येथे राहते.

आरोपी शिवानंद मस्तोली हा लॉजीकॅश सोलूशन प्रा. लि. व्यवस्थापनात कामाला होता. एटीएममध्ये पैसे घालणे हे त्याचे काम होते. याचा फायदा उठवून त्याने नुवे व वास्को येथील एटीएम मधील २८ लाख रुपये उकळले. त्यानुसार व्यवस्थापनाने वास्को पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. काल रात्री त्याला वास्को पोलिसांनी अटक करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही सापडू शकले नाही. वास्को पोलीस याविषयी अधिक तपास करीत आहेत. काल त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.